Saturday, 7 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान

·      छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच नांदेड इथं महापौर पदासाठी अर्ज दाखल

·      छत्रपती संभाजीनगरच्या वाहन उद्योगासाठी राज्य सरकारचं पूर्ण पाठबळ –मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू-परीक्षा पे चर्चा मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन

आणि

·      १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अजिंक्य

****

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी, नऊ फेब्रुवारीला होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी दोन हजार ६२४ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समित्यांच्या एक हजार ४६२ जागांसाठी ४ हजार ८१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी एक आणि पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी एक, अशी दोन मतं द्यायची आहेत. जिल्हा परिषद गटासाठी पांढऱ्या रंगाची, तर पंचायत समिती गणासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल.

**

मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदा आणि या जिल्ह्यातल्या ३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणांमध्ये निवडणूक होणार आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गट आणि आठ पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात तेराशे आठ मतदान केंद्रावर अकरा लाख ४५ हजार ८८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर ११८ पंचायत समिती गणांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातले एकूण १४ लाख ९१ हजार १४९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ गट तर पंचायत समितीच्या १०८ गणांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातल्या एकूण एक हजार २७८ मतदान केंद्रावर सुमारे दहा लाख ४५ हजार ८५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर यांनी, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी काल अर्ज दाखल केले. भाजप नेते, बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गट नेते पदी गणेश लोखंडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

**

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी भाजपच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदासाठी भाजपाचे राजेश राऊत यांनी काल अर्ज दाखल केले. या पदासाठी एकच अर्ज आल्यानं ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

**

नांदेड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, एमआयएम आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी काल उमेदवारी दाखल केली. भाजपकडून महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दीपकसिंह रावत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एम आय एम कडून महापौर पदासाठी अश्विनी दशरथ धोंगडे आणि काँग्रेस –वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महेजबीन अब्दुल फहीम यांनी अर्ज भरला आहे. नांदेड महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

**

लातूर महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित लढलेल्या काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षात वाद निर्माण झाला आहे. सत्तेत वाटा नाकारून फसवणूक केल्याचा आरोप वंचितचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी यांनी केला आहे. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळत, एकजूट अभेद्य असल्याचं प्रसिद्धपत्रकाद्वारे म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथं वाहन उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस असून, २०२८ पर्यंत उत्पादन सुरू करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल नागपुरात ॲडव्हांटेज विदर्भ २०२६ या खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, ते अत्यंत चुकीचं आणि खालच्या स्तराचं असल्याची तीव्र प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. हे प्रकार तात्काळ थांबवावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सरकारनं ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती, त्यावेळी काही लाभार्थ्यांनी कुटुंबातला सदस्य सरकारी नोकरीत असल्यासंदर्भात चुकीच्या पर्यायाची निवड केली होती. या लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम राहणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल हा निर्णय जाहीर केले. सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे किरकोळ चलनवाढीचा दर आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चार टक्के राहील, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.

****

परीक्षेमधले गुण हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नसून, संपूर्ण जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. परीक्षा पे चर्चा या नवव्या आवृत्तीत काल ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. जीवन हे केवळ परीक्षांसाठी नसून आयुष्य सर्वोत्तम बनवण्यासाठी शिक्षण हे एक माध्यम आहे. व्यावसायिक कौशल्ये आणि जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्ये या दोन्हींमध्ये संतुलन असणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ज्ञान प्राप्तीसाठी नेहमी जिज्ञासू राहणं, शिक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन विचार करण्याची सवय लावणं, तसंच उद्दिष्टे आव्हानात्मक पण साध्य असावीत, हा मंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्यावं, त्यावर विचार करावा आणि स्वतःचे अनुभव आणि आकलन यांची सांगड घालून आत्मविश्वासानं परीक्षांना सामोरं जावं, असा सल्ला त्यांनी दिला. योग्य अभ्यास, निरीक्षण आणि ज्ञानाचा वापर केल्याशिवाय कोणतंही कौशल्य मिळवता येत नाही यावर त्यांनी भर दिला.

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं झालेल्या काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी  पराभव करत सहाव्यांदा हा विश्वचषक जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं ५० षटकांत ९ बाद ४११ धावा केल्या. ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. वैभव सूर्यवंशीने दमदार खेळी करत ८० चेंडूत १७५ धावा केल्या तर कर्णधार आयुष म्हात्रेनं ५३ धावा करत इंग्लंड समोर ४१२ धावांचं आव्हान ठेवलं. मात्र भारतीय गोलंदाजीच्या प्रभावी माऱ्यामुळे इंग्लंडचा संघ ४१ व्या षटकात ३११ धावांवर सर्वबाद झाला. वैभव सूर्यवंशी सामनावीर आणि मालिकावीर ठरला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...