Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· औद्योगिक विकासासाठीचे सामंजस्य करार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याकरता उद्योग
विभाग कार्यरत-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
· रिझर्व्ह बँकेतर्फे ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान आर्थिक साक्षरता सप्ताहाचं आयोजन
· छत्रपती संभाजीनगर इथं आयुष तसंच सीजीएचएस वेलनेस सेंटरचं उद्घाटन
· जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची उद्या मतमोजणी
आणि
· प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा १ हजार १११ किलो नाचणी शिऱ्याचा जागतिक विक्रम
****
औद्योगिक विकासासाठीचे सामंजस्य करार प्रत्यक्षात अस्तित्वात
आणण्याकरता उद्योग विभाग कार्यरत असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज अहिल्यानगरमध्ये एका ॲल्युमिनियम कास्टिंग कंपनीनं
आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कंपनीचे
कार्यकारी संचालक भरत गीते यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्याच्या
सर्व भागातल्या उद्योग क्षेत्राची प्रगती होण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या गुंतवणूक करारांमधून उत्तर
महाराष्ट्रातल्या ५ जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या ७५ हजार संधी उपलब्ध झाल्या असल्याचं
फडणवीस यांनी सांगितलं. या करारांच्या माध्यमातून होणार असलेल्या ५० हजार कोटी रुपयांच्या
गुंतवणुकी पैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात ११ हजार ५१९ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार
असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत ताज पॅलेस हॉटेल
इथे सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये या भेटीत किनारपट्टी व्यवस्थापन, बंदरांवर
केंद्रित विकास तसंच, महाराष्ट्र आणि सेशेल्समध्ये सहकार्य वाढीच्या
संधी या विषयांवर चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. या दरम्यान, फडणवीस यांनी हर्मिनी आणि सेशेल्सच्या नागरिकांना त्यांच्या ५०व्या स्वातंत्र्यदिनाच्या
शुभेच्छाही दिल्या.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान आर्थिक
साक्षरता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘केवायसी – सुरक्षित बँकिंगकडे जाण्याचे
पहिले पाऊल’ अशी या वर्षाची संकल्पना आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबई
इथं या सप्ताहाचे उद्घाटन केलं. दरम्यान, आरबीआय कडून केवायसी पालनाचं महत्त्व आणि सुलभता, केंद्रीय
केवायसी चे फायदे तसंच, केवायसी संदर्भातील फसवे दूरध्वनी, संदेश आणि लिंकपासून सावध राहण्याबाबत
जनजागृती करण्यात येणार आहे.
****
आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून ती एक संपूर्ण जीवनशैली
असल्याचं,
केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण
मंत्रालयांतर्गत आयुष तसंच सीजीएचएस वेलनेस सेंटरचं उद्घाटन जाधव यांच्या हस्ते आज
झालं,
त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि आरोग्यविषयक
गरजा लक्षात घेऊन सन २०२४ मध्ये
सीजीएचएस अंतर्गत आयुष विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची आज
प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याचं समाधान जाधव यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव
सीजीएचएस अंतर्गत लाभार्थ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार
मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनांमुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या
कुटुंबीयांचा आर्थिक भार कमी झाला असून, खासगी रुग्णालयांवरील
अवलंबित्व घटले आहे, असेही त्यांनी सांगितले.
****
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांसाठी
काल झालेल्या मतदानाची उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी राज्य
निवडणूक आयोगानं सुरक्षेसह सर्व व्यवस्था केली आहे. या निवडणुकीसाठी काल एकूण ६८ पूर्णांक
२८ शतांश टक्के मतदान झालं. सर्वाधिक सुमारे ७५ टक्के मतदान परभणी इथं तर रत्नागिरीत
सर्वात कमी सुमारे ५६ टक्के मतदान झालं.
****
केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्य मंत्री रक्षा खडसे आज
छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया - साई च्या
परिसरात यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन होणार आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या कोया कृषी कुंभात प्रसिद्ध
शेफ विष्णू मनोहर यांनी १ हजार १११ किलोचा नाचणी शिरा करुन जागतिक विक्रम केला. कृषी
संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं गडचिरोली
इथं हा कृषी कुंभ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भरडधान्ये, विशेषतः नाचणी पिकाचे पोषणमूल्य आणि महत्त्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित
झाले. नाचणीपासून तयार करण्यात आलेल्या या महाकाय शिऱ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये घेण्यात आली आहे.
या विक्रमासाठी वापरण्यात आलेली नाचणी ही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शाश्वत
पद्धतीनं उत्पादित करण्यात आली होती.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात आज संत गजानन महाराज यांच्या प्रकट
दिनानिमित्त महापौर पदाचे उमेदवार समीर राजूरकर तसेच उपमहापौर पदाचे उमेदवार राजेंद्र
जंजाळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी
रांगा लावत दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात
आले. तसेच कीर्तन महोत्सव देखील घेण्यात
आला.
****
बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या चंपावती महोत्सवातून, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांचे कलाकारप्रेम जिवंत ठेवण्याचं काम, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप करतं असल्याचं प्रतिपादन, शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांनी केलं आहे. या महोत्सवाच्या उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे महाकरंडक समूह गीत गायन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. कलेचे
संस्कार रुजवण्याचं काम या महोत्सवातून होत असल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं.
****
बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी
नागरिकांना आज मुंबईतल्या कुरार गावातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बांगलादेशी
नागरिकत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची
कायदेशीर कारवाई सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
आयसीसी क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज चेन्नई इथं
झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर ५ गडी राखून विजय मिळवला. दुसरा सामना
ग्रुप सी मधील इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु झाला असून, इंग्लडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयर्लंड आणि
श्रीलंका यांच्यातला ग्रुप बी चा सामना कोलंबो इथं संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
****
वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी नाशिकच्या चिमुकल्यांची किड्स
सायक्लोथॉन आज उत्साहात पार पडली. नाशिक इथल्या सायकलिस्ट फाउंडेशन, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या उपक्रमाच्या सहकार्यातून
हा उपक्रम राबवण्यात आला.
****
बीड जिल्ह्यात शिवजयंती तसंच रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष
स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज आमदार
विजयसिंह पंडित यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. या मोहिमेसंदर्भात त्यांनी पालिका प्रशासनाला
आवश्यक सूचना दिल्या.
****
केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पंचायत
पुरस्कार २०२५ साठीची नामांकन प्रक्रिया अधिकृतपणे
सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची नामांकनं सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं
आहे. या पुरस्कारांतर्गत दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार देण्यात येणार
आहे.
****
No comments:
Post a Comment