Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 24 February 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित
करणारं राज्य- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन
·
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिवंगत सदस्यांना
विधीमंडळात श्रद्धांजली
·
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
·
“शेतकरी” व्याख्येत महिलांचा समावेश करावा-कृषी एआय परिषदेची शिफारस
आणि
·
मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका, लातूर आणि
नांदेड जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू
****
स्थूल राष्ट्रीय
उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान साडेतेरा टक्के असून, देशात महाराष्ट्र
हे सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल
आचार्य देवव्रत यांनी केलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल सुरुवात
झाली. यावेळी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या अभिभाषणात राज्यपालांनी,
राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत
९१ हजार ३२७ कोटींची गुंतवणूक राज्यात आली, त्यामुळे महाराष्ट्र
हे उद्योगधंद्यात अग्रगण्य राज्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या महिन्यात दावोस
इथं झालेल्या जागतिक परिषदेत राज्य सरकारनं विविध देशांमधल्या १८ कंपन्यांसोबत तीस
लाख कोटी रुपयांचे करार केले, यामुळे ४० लाख रोजगार निर्माण होणार
आहेत, असं त्यांनी सांगितलं. उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी
सरकारनं आखलेल्या विविध धोरणांची, तसंच राज्यात झालेल्या परकीय
गुंतवणुकीबद्दल राज्यपालांनी माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट - राज्यपाल आचार्य देवव्रत
राज्यातल्या
कृषी क्षेत्राच्या विकासालाही सरकारनं प्राधान्य दिलं आहे, त्यासाठी
मागेल त्याला सौरपंप, मोफत वीज आदी योजना राबवल्या जात आहेत,
असं राज्यपाल म्हणाले. महिला, आदिवासी,
मागास समूहाच्या प्रगतीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत, या सर्व घटकांसाठी सरकार राबवत असलेल्या धोरणांची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र
कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देत, राज्याच्या
सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या
प्रयत्नांची देखील राज्यपालांनी माहिती दिली.
**
या अभिभाषणानंतर
विधानसभेचं कामकाज सुरू झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा
राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. अजित पवार यांच्यासारख्या
सहकाऱ्याचं निधन होणं ही बाब केवळ राजकीयच नव्हे तर व्यक्तिशः प्रचंड वेदनादायक असल्याची
भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा
दिला. अजित पवार हे महाराष्ट्राला न लाभलेले सक्षम मुख्यमंत्री होते, असं फडणवीस
यांनी नमूद केलं. ते म्हणाले…
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गुणगौरव केला. दादांनी पाहिलेलं विकासाचं
स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं शिंदे
यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे यांनी विधान परिषदेत तर मंत्री छगन भुजबळ, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनीही विधानसभेत अजित
पवार यांच्या आठवणी जागवल्या. विधीमंडळाच्या इतर दिवंगत सदस्यांनाही काल श्रद्धांजली
अर्पण करण्यात आली.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत लोकभवन इथं जीवरक्षण
आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन त्या करणार आहेत. तर
उद्या बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं केंद्रीय आय़ुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय
आरोग्य मेळ्यालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. तसंच नागपुरात आयोजित ‘एकता आणि
विश्वासातून महाराष्ट्राचं सुवर्णयुग’ या उपक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.
****
‘‘शेतकरी” या
व्याख्येत महिलांचा समावेश करून, समान वेतन, अनुकूल कर्ज आणि विस्तार सेवा उपलब्ध करून द्यावी अशी शिफारस कृषी तज्ज्ञांनी
केली आहे. मुंबई इथं सुरू असलेल्या जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार
शिखर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, 'समतेसाठी कोडिंग: लिंग-संवेदनशील
कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय' या विषयावर समांतर सत्र
पार पडले. महिला स्वयंसाहाय्य गट आणि स्थानिक संस्थांचा उपयोग करून महिलांना डिजिटल
प्रशिक्षण आणि साधने देण्याची शिफारस यावेळी करण्यात आली.
****
मराठवाड्यात
अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला.
लातूर शहरासह
जिल्ह्यात अहमदपूर, निलंगा, औसा आणि उदगीर तालुक्यातल्या अनेक
भागात पाऊस पडला. रेणापूर तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. पानगाव
इथल्या शेतकर्यांनी नुकसानीची माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट – लातूर शेतकरी
हवामान
विभागाने आगामी काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती
खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे
तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिल्या
आहेत.
दरम्यान, उदगीर तालुक्यातल्या
वायगाव इथं शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
दिगंबर बेलकुंडे असं या साठ वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे.
बीड जिल्ह्यात
अंबाजोगाई तालुक्यात मुडेगाव इथं काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा,
ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानाचा तहसील
कार्यालयाकडून पंचनामा करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
धाराशिव
आणि तुळजापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तुळजापूरमध्ये
वार्याचा जोर असल्याने काही ठिकाणी गहू आडवा झाला.
नांदेड
शहरासह जिल्हयात किनवट, देगलूर, नायगाव बाजार, कंधार, बिलोली, भोकर या भागात पाऊस
पडला. हिमायतनगर तालुक्यातल्या पार्डी इथं विशाखा येलकेवाड या शेतकरी महिलेचा अंगावर
वीज पडून मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यातही
अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला, रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
झालं.
मध्य महाराष्ट्रात
किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा आणि वाङ्गमय विभागात आजपासून मायमराठी गौरव
महोत्सवाला सुरूवात होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन नरहर कुरुंदकर
व्याख्यानमालेनं होणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त
काल निबंध स्पर्धा घेण्यात आली.
****
राज्यात
जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण
करण्यात येत आहे. त्यानुसार काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात
रिधोरा देवी या गावात पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचं ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण
करण्यात आलं.
****
जालना इथं
काल पाच बालकामगारांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आस्थापना मालकावर गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार, जिल्हा बालकामगार
अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाद्वारे शहरातली विविध दुकाने, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक छापे टाकण्यात आले. जिल्ह्यात बालकामगार
आढळल्यास नागरिकांनी तत्काळ १०९८ या चाईल्डलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन
जिल्हाधिकारी मित्तल यांनी केलं आहे.
****
धाराशिव
इथं महिला जिल्हा संनियंत्रण समितीची बैठक काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या
अध्यक्षतेखाली झाली. सखी वन स्टॉप सेंटर, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम,
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, बेटी बचाव
बेटी पढाव अभियान या मुद्यांवर या बैठकीथ चर्चा करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment