Monday, 16 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीर, ईशान्य भागातला आणि नक्षलग्रस्त भागातला हिंसाचार ८० टक्क्यांनी कमी झाला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांच्या ७९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. ११ राज्यांमधला नक्षलवादी दहशतवाद हा नेहमीच देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक मोठं आव्हान राहिला असून, या भागातला हिंसाचार लवकरच पूर्णपणे संपुष्टात येईल, असं शहा यावेळी म्हणाले.

बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

यावेळी शहा यांच्या हस्ते केंद्रीय पोलीस दलाच्या विशेष मुख्यालयाच्या इमारतीचं भूमीपूजन आणि सेफ सिटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं.

****

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध क्षेत्रात होणारा वाढता वापर आणि उपयोग लक्षात घेऊन आजपासून नवी दिल्लीत भारत एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन सुरु झालं. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्यापक चर्चा घडवून आणणारं आणि विकसनशील देशात होणारं, हे जगातलं पहिलंच संमेलन आहे. २० देशांच्या प्रमुख नेत्यांसह, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, अनेक जागतिक संघटनांचे पदाधिकारी आणि ४५ देशांच्या मंत्र्यांचं प्रतिनिधी मंडळ या संमेलनात सहभागी होत आहे.

भारत एआय इम्पॅक्ट संमेलन हे लोक, ग्रह आणि प्रगती या तीन मूलभूत स्तंभ किंवा तत्त्वांवर आधारित आहे. मानवी भांडवल, सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेश, सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय, विज्ञान, लवचिकता, नवोन्मेष आणि कार्यक्षमता, एआय संसाधनांचं लोकशाहीकरण आणि आर्थिक वाढ तसंच सामाजिक कल्याणासाठी एआय आदी विषयांवर या संमेलनात चर्चासत्र होणार आहेत.

या परिषदेच्या माध्यमातून एआयवर चर्चा करण्यासाठी जगाला एकत्र आणत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. यानिमित्त आपण जगभरातले नेते, उद्योग क्षेत्रातले दिग्गज, नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधक आणि तंत्रज्ञानप्रेमींचं भारतात स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ए आय एक्सपो २०२६ चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभाव आणि नागरिकांना त्यातून होणारा फायदा विषद करणारी ५०० पेक्षा जास्त विशेष सत्र, थेट प्रत्यक्षिकं यांचा यात समावेश असेल. जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे ६०० पेक्षा जास्त स्टार्ट अप यात सहभागी होतील.

****

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नैतिक, सर्वसमावेशक आणि जबाबदारीनं व्हावा यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इंटेल इंडियासोबत मिळून आजपासून देशभरात मोहिम राबवत आहे. विश्वासार्ह आणि मानव केंद्रित एआय परिसंस्था तयार करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. यावेळी लोकांना एआयचा जबाबदार वापर करण्याबद्दल प्रतिज्ञा दिली जाईल, त्याआधी त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली जाईल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहे. या भेटी दरम्यान भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीत झालेल्या प्रगतीचा आढावा आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष २०२६चे उद्घाटन आणि दोन्ही देशांतील व्यावसायिक, स्टार्टअप्स, संशोधक आणि नवोन्मेषकांच्या मेळाव्याला फ्रान्सचे अध्यक्ष संबोधित करतील.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेवकांच्या स्वागत समारंभात आज महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सिंफनी बँडने सादरीकरण केलं. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हा बँड साकारण्यात आला असून, या पथकाच्या सादरीकरणानं मनपा शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळालं.

****

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या कदमापूर प्राथमिक शाळेतले शिक्षक राजेश कोकदे यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे शिकवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात शिकवताना आवाजाची नक्कल, अ‍ॅनिमेशन, संवादात्मक डिजिटल साधनांचा वापर करण्यात येत आहे.

****

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दिल्ली इथं अफगाणिस्तान – संयुक्त अरब अमिरात यांच्यात सामना सुरु आहे. संयुक्त अरब अमिरातीने प्रथम फलंदाजी करत १६१ धावांचं लक्ष्य दिलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...