Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेत आज केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविय यांनी
औद्योगिक संबंध संहिता सुधारणा विधेयक, २०२६ सादर केलं. त्यावर सदनात चर्चा सुरु आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत
स्थगित झालं होतं. पीठासीन अधिकारी कृष्णप्रसाद टेनेटी यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच, विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
या गदारोळातच कामकाज काही वेळ सुरु राहीलं.
**
आर्थिक शिस्तीद्वारे वीज वितरण क्षेत्राला बळकटी देण्याच्या
उद्देशानं लवकरच वीज दुरुस्ती विधेयक सादर केलं जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आज लोकसभेत
दिली. भारत वीज कमतरतेच्या देशापासून वीज अधिशेष असलेल्या देशाकडे वळला असल्याचं ते
म्हणाले.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत अर्थसंकल्पावर
केलेल्या भाषणात, हा अर्थसंकल्प देशाच्या
आर्थिक परिवर्तनाला कसा गती देईल याचं सर्वंकष चित्र मांडलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ‘रिफॉर्म एक्सप्रेस’, एमएसएमईंना पाठिंबा, कौशल्य विकास, पुढील पिढीची पायाभूत सुविधा तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला
चालना यावर त्यांनी भर दिल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला
उत्तर देणार आहेत.
****
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र या अभियानात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्ह्यासाठी सामंजस्य
करार करण्यात आला असून, लवकरच जिल्ह्यात अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार
आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी ‘क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण’ या संस्थेने आपल्या सामाजिक
दायित्व उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी दोन हजार ४५० एचपीव्ही लसींचं प्रायोजन केलं आहे.
या अभियानाच्या माध्यमातून सरकार किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत असून, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल
याची खात्री करत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या महपौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे सय्यद इकबाल यांची निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत सय्यद इकबाल
यांना ३९ मतं, तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना
२६ मतं मिळाली. एकूण ६५ सदस्य संख्या असलेल्या परभणी महानगरपालिकेत ठाकरे गटाने २५, भाजप आणि काँग्रेसनं प्रत्येकी १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ११ जागा जिंकल्या.
****
अखिल भारतीय संघटना एफएमआरएआय आणि सीटू संघटनेनं आज देशव्यापी
संप पुकारला आहे. कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करणं, सेल्स प्रमोशन एम्प्लॉय पुनर्जीवित करणं तसंच आठ तासाच्या कामासाठी
३० हजार रुपये किमान मासिक वेतन आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन यांसारख्या इतर मागण्यांसाठी
हा संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय विक्री प्रतिनिधी संघटनेच्या
जळगाव शाखेतर्फे संप पाळण्यात येत असून, कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन
दिलं.
या संपाला पाठींबा देत आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत
कामकाज बंद ठेवत हमाल मापाडी कामगारांनी रास्तारोको आंदोलन केलं. यामुळे बाजार समिती
ठप्प होवून शुकशुकाट पसरला आहे.
****
राज्यातल्या ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत
झालेल्या मूल्यमापनात निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालयांचा
निकाल काल जाहीर करण्यात आला. १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात सोलापूर जिल्हा
परिषद कार्यालयाने पहिला क्रमांक मिळवला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयाने
राज्यात तिसरा, तर हिंगोली कार्यालयाने सहावा क्रमांक
पटकावला आहे.
****
पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त
विद्यमाने परळी इथं आयोजित करण्यात आलेल्या महा पशुधन एक्स्पो २०२६ अंतर्गत आयोजित
प्रदर्शन स्थळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१४ तारखेला भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधणार आहेत. १३ फेब्रुवारीला पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते
या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे.
****
१३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा
केला जातो. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर इथले रेडिओ प्रेमी संजय पवार यांनी उद्या
रेडिओ प्रदर्शन आयोजित केलं आहे. एन आठ परिसरात वेणुताई चव्हाण शाळेजवळ आयोजित हे प्रदर्शन
सर्वांसाठी खुलं आहे. सुमारे चारशेहून अधिक विविध प्रकारचे रेडिओ या प्रदर्शनात पाहता
येणार आहेत.
****
आयसीसी टी–ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज दिल्लीत भारत
आणि नामिबिया यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment