Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 06
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपल्या चालू आर्थिक वर्षाच्या
शेवटच्या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे
रेपो दर ५ पुर्णांक २५ टक्क्यांवर स्थिर राहणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. या
निर्णयामुळे गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. आरबीआयने
देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढेल असा विश्वास व्यक्त केला असून २०२६-२७ च्या
पहिल्या सहामाहीसाठी विकासदराचा अंदाज ६ पुर्णांक ९ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात
आला आहे. मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याने महागाईच्या अंदाजात किंचित वाढ
करण्यात आली असून ती ४ ते ४.२ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
****
बँकेच्या ग्राहकांसाठी आरबीआयने काही महत्त्वाचे निर्णय
घेतले आहेत. अनधिकृत किंवा फसव्या डिजिटल व्यवहारांमुळे नुकसान झाल्यास, ग्राहकांना २५ हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची योजना आरबीआय आखत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन पैसे पाठवल्यानंतर विलंबाने ते समोरच्या खात्यात जमा
होण्याची सुविधा आणि अतिरिक्त सुरक्षा उपायांवर विचार सुरू आहे. यासह वसुली एजंटवर
लगाम,
आर्थिक उत्पादनांच्या चुकीच्या जाहिराती आणि माहिती
रोखण्यासाठी बँकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील.
****
शिक्षण कधीही ओझं किंवा सक्तीचं वाटू नये, त्यामध्ये आपला संपूर्ण सहभाग असायला हवा, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून आज
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुणांबाबत अति आसक्ती ठेवू नये, गुणांचं महत्त्व फार काळ टिकत नाही, म्हणूनच आपलं मन
केवळ गुण आणि आकड्यांपुरतं मर्यादित ठेवू नका असं सल्ला त्यांनी दिला. शिक्षण आणि
परीक्षा यावर मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जीवन कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्यावर भर देताना पंतप्रधान
म्हणाले..
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत अर्थसंकल्पावर
चर्चा होत आहे. यासोबतच संसदेतल्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध महत्त्वाची विधेयके
सादर केली जाणार आहेत. दरम्यान, लोकसभेचं कामकाज सुरू होताच
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी आजही
गदारोळ कायम ठेवत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत
तहकूब करण्यात आलं होतं.
****
नाशिकच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या हिमगौरी आडके तर
उपमहापौरपदी शिवसेनेच्या विलास शिंदे यांची आज बिनविरोध निवड झाली. महापालिकेत
भाजपचे ७२ तर शिवसेनेचे २६ नगरसेवक निवडून आले आहेत. हिमगौरी आडके यांच्या विरोधात
अर्ज दाखल करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सीमा पवार यांनी माघार
घेतल्याने हिमगौरी आडके यांची बिनविरोध निवड झाली, तर
उपमहापौर पदासाठी भाजपच्या चार नगरसेवकांनी माघार घेतल्याने विलास शिंदेंची निवड
झाली.
****
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज
पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांना जाहीर झाला आहे, तर लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार कवियत्री योगिनी सातारकर-पांडे यांना
दिला जाणार आहे. आज ‘मसाप’तर्फे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर विभागात २०२५-२६ चा साखर गाळप हंगाम सुरू
असून,
साखर कारखान्यांमधील सर्व वजन काट्यांची पडताळणी आणि
मुद्रांकन पूर्ण झाले आहे. जिल्हास्तरावर तपासणीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली
असून ऊसाच्या वजनाबाबत शंका असल्यास शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेरील अधिकृत काट्यावर
वजन करून रितसर पावती घ्यावी. बाहेरील वजन आणि कारखान्यातील वजन यात तफावत
आढळल्यास,
वैध मापनशास्त्र विभागाकडे त्वरित तक्रार करावी. त्यासाठी
विभागीय कार्यालयाच्या ०२४०, २९ ५२ ६५६ या क्रमांकावर
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
****
अकोला जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये राष्ट्र
प्रथम अभियानांतर्गत मुलींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिलं जात आहे. गेल्या २०
जानेवारीपासून सुरु झालेला हा उपक्रम येत्या २० मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.
शिक्षण विभाग राज्यातील २९ हजार २७९ शाळांमधील मुलींना सक्षम बनवण्यासाठी आणि
आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे
प्रशिक्षण दिलं जात आहे.
****
No comments:
Post a Comment