Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 February
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
प्रत्येक गोष्टीत संतुलन असणं आवश्यक आहे. एका बाजूला जास्त
झुकाल,
तर पडणं अपरिहार्य आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
व्यक्त केलं आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज पंतप्रधानांनी
विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जीवन कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्य, या दोन्हींवर
विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं, असा सल्ला पंतप्रधानांनी
यावेळी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांची गती जितकी आहे, त्यापेक्षा एक पाऊल पुढे स्वतःची गती ठेवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा अशा
सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला. मनाला आधी शिस्त लावा, मग त्याला एकाग्र करा आणि
त्यानंतर अभ्यासाचे विषय समोर ठेवा. असं केल्यास नेहमीच यशस्वी व्हाल, असा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या
अध्यक्षतेखालील पतधोरण समिती आज चालू आर्थिक वर्षाचा अंतिम द्वैमासिक आढावा जाहीर
करणार आहे. गेल्या बुधवारपासून समितीची भारतीय अर्थव्यवस्था, महागाई आणि जागतिक आर्थिक स्थितीवर सखोल चर्चा सुरू आहे. २०२५-२०२६ या आर्थिक
वर्षासाठीचा हा अंतिम पतधोरण आढावा आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी
फेब्रुवारीमध्ये रेपो दरात १२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. स्टेट बँक ऑफ
इंडियाच्या मते,
रेपो दरात कोणताही बदल अपेक्षित नाही, तर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात करण्याचे कोणतेही संकेत नाहीत, असं बँक ऑफ अमेरिकाच्या जागतिक संशोधन अहवालात म्हटलं
आहे.
****
शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा-डी.एल.एड परीक्षेचा निकाल
जाहीर झाला असून यामध्ये ७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य परीक्षा
परिषदेतर्फे गेल्या डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
****
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथं बेकायदेशीररीत्या वास्तव्य
करणाऱ्या एका इराणी महिलेला आज इराणला पाठवलं जाणार आहे. ही महिला गेल्या
वर्षभरापासून जळगावमध्ये मुलासह वास्तव्य करीत असल्याची माहिती
मिळाल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर
तिला जळगावच्या शासकीय आशादीप महिला वसतिगृहात ठेवण्यात आलं. इराण
दूतावासाने महिलेला परत बोलविण्याविषयी सकारात्मकता दर्शविल्यानंतर तिला आज दिल्लीहून विमानाने इराणला
पाठवले जात आहे.
****
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या
निवडणुकीचा प्रचार काल संपला. या सर्व ठिकाणी उद्या मतदान होणार असून, नऊ तारखेला मतमोजणी होईल. या निवडणुकांसाठी मतदारांना आपलं नाव आणि मतदान
केंद्र सहज शोधता यावं, यासाठी राज्य निवडणूक
आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे. या
निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांमधले १५ आठवडी बाजार
उद्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
****
लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या
प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आणि पंचायत
समितीच्या ११८ गणांसाठी उद्या मतदान होणार आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या
रिंगणात एकूण २४२ उमेदवार आहेत, तर पंचायत समितीच्या ११८
जागांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि
पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. संपूर्ण
जिल्ह्यात एकूण १ हजार ७४७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या प्रक्रियेसाठी ८हजार ४१४ मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव इथं
रात्री एका अस्वलानं घरात शिरकाव केल्याची घटना घडली. यानंतर, लाखांदूर वनविभागानं अत्यंत संयम आणि चतुराईने राबवलेल्या तीन तासांच्या
मोहिमेत अस्वलाला जेरबंद केलं. पिंपळगाव कोहळी हा परिसर घनदाट जंगलानं व्यापलेला
असून इथं हिंस्त्र श्वापदांचा वावर मोठा आहे. रात्रीच्या सुमारास जंगलातून
भरकटलेलं हे पूर्ण वाढलेलं अस्वल गावात शिरलं आणि गल्लीतून धावताना अचानक स्थानिक
रहिवासी इंदु बारसागडे यांच्या घरात शिरलं होतं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली
नाही. अस्वलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे
सोडण्यात आलं आहे.
****
हवामान - उत्तर कोकणात तापमानातात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ
झाली असून दक्षिण कोकण आणि मध्य हवामान तापमानात किंचित वाढ झाली. राज्यात सर्वत्र
हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
क्रिकेट -१९ वर्षांखालील खेळाडू विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेतील अंतिम सामना आज भारत आणि इंग्लड दरम्यान झिंबाब्वेमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी एक वाजता सुरु होईल. भारतानं काल हरारे इथं उपांत्य फेरीत
अफगाणिस्तानचा सात गडी राखून दणदणित पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यंदा
भारताला सहाव्यांदा विश्वचषक
जिंकण्याची संधी आहे.
****
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं महिला प्रीमियर लीगचे
विजेतेपद जिंकलं आहे. कालच्या अंतिम सामन्यात, बंगळुरूनं
दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून त्यांचं दुसरं विजेतेपद पटकावलं. प्रथम फलंदाजी
करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं निर्धारित २० षटकांत २०३ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स
बंगळुरूनं दोन चेंडू शिल्लक असताना चार विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. कर्णधार
स्मृती मानधनानं ८७ आणि जॉर्जिया वॉलनं ७९ धावा केल्या. स्मृती मानधनाला सामनावीर
आणि गुजरात जायंट्सची अष्टपैलू सोफी डेव्हिनला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment