Sunday, 15 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 15 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

मुंबईत काल मेट्रोलाईन वर झालेल्या अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. दुर्घटनेसंदर्भात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून संबंधित कंत्राटदारावर पाच कोटी रुपये दंड आकारणी केली जाणार आहे. मुंबईत मुलुंड इथं वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गिका क्रमांक चारवर निर्माणाधीन छज्जाचं बांधकाम कोसळून एक जणाचा मृत्यू तर अन्य तिघं जखमी झाले होते. अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण-एम.एम.आर.डी.ए. करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

****

महाशिवरात्रीचा उत्सव अर्थात शिवपार्वतीच्या आराधनेचा पवित्र सण आज देशभरात मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहेत. भगवान शंकर आणि महादेवी पार्वती यांच्या विवाहाची आख्यायिका असलेल्या या उत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध शिवमंदीरांमध्ये आकर्षक फुलांसह सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. शिवभक्त आज दिवसभर उपवास करतात, तसंच उत्तररात्रीपर्यंत जागरण आणि महादेवाची आराधना करतात. तसंच, पवित्र नद्यांच्या ठिकाणी भाविक स्नान करण्यासाठी गर्दी करत असल्याचं वृत्त आहे. माघ मेळ्यातील आजचं हे अंतिम विशेष स्नानही आहे. देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणांसह प्रमुख पुरातन शिव मंदीरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक-महापूजा करण्यात येत असून भाविक मोठ्या संख्येनं हर हर महादेवच्या गजरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ या आठव्या ज्योतिर्लिंगाची मध्यरात्री प्रशासकीय पूजा झाल्यानंतर रात्री दोन वाजताच मंदिर भाविकांसाठी खुलं झालं. छत्रपती सांभाजीनगर नजिकच्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात काल महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. परळी-वैजनाथ इथं पहाटेपूर्वीपासूनच दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं दर्शन घेत आहेत. गोंदिया नजिक असलेल्या अडीचशे वर्षांहून अधिक प्राचीन अशा नागराधाम पंचमुखी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी राज्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातूनही भाविक येत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर महादेव मंदीरातही भाविकांच्या सोयीसह विशेष चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सिडको एन-वन मधील नर्मदेश्वर मंदिरात आज सायंकाळी भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. लातूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेला आज प्रारंभ झाला. यानिमित्त देवस्थान परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून रक्तदात्याला थेट दर्शनाचा लाभ मिळत आहे. जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. राज्यासह देशभरातून हजारो भक्त ‘त्र्यंबक राजा’च्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले असून पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातलं भीमाशंकर मंदिर दुरुस्तीच्या कारणास्तव दर्शनासाठी बंद असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त वाशीमच्या एका इंग्रजी शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात बेलवृक्षांची लागवड केली. पर्यावरण संरक्षणासाठी बेलवृक्षांचं जतन- संवर्धनाचं आवाहन विद्यार्थ्यांनी केलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा संदेश दिला आहे.

****

थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचं आराध्य दैवत, श्री संत सेवालाल महाराज यांची आज जयंती. राज्यभरात यानिमित्त विविध धार्मिक-सांस्कृतीक कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं त्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं.

****

वाशीमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय-महाविद्यालयाचं नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम असं करण्यात आलं आहे. राज्य शासनानं याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी केला. शंभर विद्यार्थी क्षमतेसह संलग्न असं ४३० खाटांचं रुग्णालय सुरू करण्यासाठी याआधीच मान्यता मिळालेली आहे.

****

राज्यात बहुतांश ठिकाणी आता किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत थोडी वाढ होताना दिसून येत आहे. आगामी २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

****

पुरुषांच्या टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढत होणार आहे. श्रीलंकेत कोलंबो इथं सायंकाळी सात वाजता सामना सुरू होईल. आज मुंबई इथं सुरू असलेल्या सामन्यात नेपाळनं वेस्ट इंडीज संघासमोर विजयासाठी १३४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुपारी तीन वाजता अमेरिका - नामिबिया सामना चेन्नई इथं खेळला जाईल.

दरम्यान, महिला क्रिकेटमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला प्रारंभ होत आहे. आज पहिला सामना सिडनी इथं थोड्याच वेळात पावणे तीन वाजता सुरु होत आहे.

****

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर यांना भारतीय गुणवत्ता परिषद अंतर्गत रुग्णालये आणि आरोग्यसेवा प्रदाते यांच्यासाठी राष्ट्रीय मानांकन मंडळाकडून (एनएबीएच) पूर्ण मानांकन प्रदान करण्यात आलं आहे. संस्थात्मक गुणवत्ता हमीच्या दृष्टीनं हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...