Saturday, 21 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोचा आज समारोप

·      माझी वसुंधरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा

·      इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या शिष्यवृत्ती परीक्षा

आणि

·      ॲडलेड टी ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकत भारतीय महिला संघाचा मालिका विजय

****

नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोचा आज समारोप होत आहे.

या परिषदेत तंत्रज्ञानातल्या वेगवेगळ्या अडचणींवरचे उपाय मांडण्यात आल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. वैष्णव यांनी आज सकाळी भारत मंडपम् इथं जाऊन सहभागी नवोन्मेषकर्मींबरोबर संवाद साधला. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव

****

राज्यातील महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना करण्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केली आहे. ते आज पुणे इथं इनोव्हेशन फाउंडेशनच्या इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० च्या उद्घटनाप्रसंगी बोलत होते. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची संधी आणि व्यासपीठ मिळावं यासाठी या लॅबची स्थापना करण्यात येणार आहे.

****

राष्ट्रीय बांबू महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. नागपूर इथं येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात “बॅम्बू बीट्स अँड बिर्याणी” या उद्घाटन सोहळ्यात बांबू ऑर्केस्ट्रा आणि बांबू फूड शो सादर केला जाणार आहे. या महोत्सवात बांबू बांधकाम, उत्पादन डिझाईन, दागिने निर्मिती अशा विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच शाश्वत बांबू शेती, कार्बन ऑफसेट आणि पाच दिवसांचा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमही होणार आहे.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज ठाणे जिल्ह्यातल्या दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार सभेत राहुल गांधी यांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दाखल झालेल्या खटल्यात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील जामीन होते. मात्र, गेल्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे नवा जामीन सादर करण्याचे निर्देश भिवंडी दंडाधिकारी न्यायालयाने दिले. त्यानुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जामीन म्हणून अर्ज दिला.

****

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी, मंत्री दादा भुसे यांच्यावर केलेल्या आरोपाबद्दल माफीनामा सादर केल्यानं, भुसे यांनी मालेगाव न्यायालयातला बदनामीचा खटला मागे घेतला आहे. राऊत यांनी, मालेगाव तालुक्यातल्या गिरणा साखर कारखान्याच्या भागधारकाकडून जमा केलेल्या १७८ कोटी रूपयांच्या अपहाराचा आरोप दादा भुसे यांच्यावर केल्यानं भुसे यांनी हा खटला दाखल केला होता.

****

माझी वसुंधरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. माझी वसुंधरा मिशन 4 आणि मिशन 5 अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विविध गटातल्या सुमारे शंभरावर पुरस्कारांचा समावेश आहे.

****

ऑपरेशन सिंदूरमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांना भारतीय लष्कर प्रमुखांचं प्रशंसा पदक मिळालं आहे. २०२५ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत गायकवाड यांनी दळणवळण व्यवस्थापनात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयात झालेल्या एका सोहळ्यात लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांच्या हस्ते गायकवाड यांना हे पदक प्रदान करण्यात आलं.

****

देशातून येत्या ३१ मार्चपर्यंत नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ते आज गुवाहाटी इथं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ८७ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पोलीस दलाच्या संचलनाचं निरीक्षण करत सीआरपीएफच्या कार्याची प्रशंसा केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम शृंखलेचा १३१वा भाग असेल. सकाळी ११ वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप वरुन ऐकता येईल.

****

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा उद्या घेण्यात येणार आहे. या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरातून पाचवी आणि आठवीचे एकूण ५३ हजार १०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. प्रत्येकी १५० गुणांचे दोन पेपर होणार आहेत. पाचवीच्या परीक्षेसाठी १८८ केंद्रांमध्ये ३१ हजार ५९३ विद्यार्थी तर आठवीसाठी १४३ केंद्रांत २१ हजार ५१२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

****

बीड जिल्ह्याची ऊसतोड कामगारांची ओळख पुसून टाकण्यासाठी माता-भगिनींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. पाटोदा तालुक्यात अमळनेर आणि डोंगरकिन्ही इथं उमेदअंतर्गत बँक कर्ज मंजुरी पत्र आणि कर्ज वितरणाच्या कार्यक्रमात सोनवणे बोलत होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना स्वावलंबी करणं, लघुउद्योगांना चालना देणं आणि आर्थिक बळकटी प्रदान करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं खासदार सोनवणे यावेळी म्हणाले. या मेळाव्यात विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून मंजूर कर्जांचं वितरण आज करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा “छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय एकांकिका करंडक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाच्या द लास्ट बॅटलया एकांकिकेने पटकावला. २१ संघानी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत दर्जेदार एकांकिका सादर झाल्या. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं. पुढील वर्षीपासून या स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकाची रक्कम दोन लाख रुपये करण्याची घोषणा जंजाळ यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील वर्षी पासून स्वतंत्र एकांकिका करंडक स्पर्धा घेण्याची घोषणाही जंजाळ यांनी केली

****

हिंगोली इथं आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोटोकॉल डिझाइनिंग आणि एक्स्ट्राम्युरल फंडिंग संधी विषयक राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. हिंगोलीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत आयोजित या परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनाची जाणीव आणि दिशा दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशभरातून ५०० पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनवृत्तीला चालना देण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

****

परळी वैजनाथ इथं नुकत्याच पार पडलेल्या महा पशुधन प्रदर्शनात पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरुपाचा हा पुरस्कार राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते देऊन या केंद्राला गौरवण्यात आलं. देशी गोवंश जतन, संवर्धन, संशोधन, प्रशिक्षण आणि शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रात सातत्यानं केलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

****

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठ गटाचे सामने आजपासून सुरु होत आहेत. आज पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान कोलंबो इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरु होईल. या फेरीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर उद्या भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव करत तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका दोन – एक अशा गुण फरकाने जिंकली. ॲडलेड इथं झालेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आणि निर्धारीत षटकांत सहा बाद १७६ धावा केल्या. स्मृती मंधनानं ८२ तर जेमिमाह रॉड्रीक्सनं ५९ धावा केल्या. उत्तरादाखल खेळण्यास उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारीत षटकांत नऊ बाद १५९ धावाच करू शकला. दरम्यान, या दोन्ही संघांतील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका मंगळवारपासून खेळवली जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात अनधिकृत बॅनर हटवताना दोन कामगारांना वीजेच्या तारेचा धक्का बसला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मुकुंदवाडी परिसरात आज सकाळी ही घटना घडली. अमोल दिनकर जाधव असे मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराला घाटी रुग्णालयात दाखल केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात लोहमार्ग पोलिस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना एका तरूणाचा मृत्यू झाला. संग्राम शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो सांगली जिल्ह्यातला रहिवासी आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...