Wednesday, 11 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 11 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

आयुर्वेदाला मुख्य प्रवाहातल्या आरोग्य विमा व्यवस्थेशी जोडण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि जनरल इन्शुरन्स कौन्सिल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे पात्र रुग्णांना आता आयुर्वेद आधारित उपचारांसाठी रोखविरहित सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. नवी दिल्ली इथं झालेल्या या कराराला जनरल इन्शुरन्स कौन्सिलअंतर्गत असलेल्या सर्व ३२ विमा कंपन्यांची मान्यता मिळाली आहे. यासोबतच मंत्रालयाने आयुष आरोग्य विमा हेल्पलाईन सुरू केली असून, विमासंबंधी प्रश्न सोडवणं आणि आयुष विमा योजनांबाबत जनजागृती करणं, हे या हेल्पलाईनचं उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे आयुर्वेदिक उपचारांकडे रुग्णांचा कल वाढेल, सेवांचा अधिक वापर होईल आणि संस्थेच्या शाश्वत प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

****

भारताने युनायटेड किंग्डम आणि उत्तर आयर्लंडसोबत सामाजिक सुरक्षा योगदानाशी संबंधित महत्त्वाचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, दोन्ही देशातल्या कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या देशात तात्पुरत्या स्वरूपात कमाल ३६ महिन्यांपर्यंतच्या नियुक्तीदरम्यान दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदान भरण्यापासून सूट मिळणार आहे.

****

देशाच्या विविध भागातून लहान मुलं बेपत्ता होण्यामागे देशव्यापी जाळं आहे की राज्यनिहाय गट कार्यरत आहेत, हे तपासण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिल्या आहेत. या घटनांमागे काही ठरविक पद्धत आहे का, हे तपासण्याची गरजही न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि उज्जल भुयान यांच्या पीठानं अधोरेखित केली. या घटनांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी सुटका झालेल्या मुलांची मुलाखत घ्यावी अशी सूचनाही न्यायालयानं दिली आहे. देशभरात बेपत्ता होणाऱ्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या एका जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं या सूचना दिल्या.

****

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेच्या बोधचिन्हाचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. ‘माझी वसुंधरा’ योजना हा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. निसर्गातले पंचमहाभूत – भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांचं संवर्धन आणि संरक्षण करणं, हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

****

विकसित भारतासाठी २०४७ पर्यंत न थांबता, त्याआधीच नव्या पिढीनं पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात ते काल बोलत होते. या कार्यक्रमात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी डॉक्टर अशोक खाडे, सहकार क्षेत्रासाठी अप्पासाहेब राजळे, शिक्षण क्षेत्रासाठी डॉ. पंडित विद्यासागर तसंच कला क्षेत्रातील योगदानासाठी शमा भाटे यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

राज्यातल्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत बालकांच्या लसीकरणाचं ७५ टक्के उद्दिष्ट डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण झाल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली पोर्टलवरील आकडेवारीनुसार ही नोंद करण्यात आली आहे.

****

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर इथं दर्शन पथाचं नियोजन, विकास आणि संवर्धनासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल नाशिक इथं पार पडली. ३९० कोटी खर्चाच्या या कामांद्वारे यात्रेकरूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणं, गर्दी व्यवस्थापन सुधारणं दर्शन पथ आणि घाटांचा विकास, शाही मार्गाचं पुनर्विकास आणि सौंदर्यीकरण करण्यावर भर देऊन ही कामं तातडीने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आलं.

दरम्यान, तेलंगणा इथं कुंभमेळ्याप्रमाणेच गोदावरी पुष्करम २०२७ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर तेलंगणा शासनाचं वरिष्ठ प्रतिनिधी मंडळ नाशिक इथं दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर आलं आहे. या अधिकाऱ्यांनी रामकुंड आणि गोदावरी नदीकाठ परिसरात घाट क्षमता, नदीकाठावरील पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, तसंच धार्मिक विधी याचा आढावा घेतला.

****

नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने काल आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात प्राची गायकवाड हिने, तर २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आदर्श सिंह याने सुवर्ण पदक जिंकलं. पदक तालिकेत भारत सध्या ३९ सुवर्ण, १५ रौप्य आणि १२ कांस्य पदकांसह अव्वल स्थानावर आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...