Friday, 20 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      कृत्रीम बुद्धिमत्तेच्या बळावर सर्वांगीण समृध्दीसाठी राज्य शासन प्रयत्नरत- इंडिया एआय इम्पँक्ट समिटध्से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

·      भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी भाजप बंडखोर नारायण चौधरी विजयी

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच एका ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर

·      राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला प्रारंभ

आणि

·      महिला आशिया चषक रायझिंग स्टार क्रिकेट स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल

****

कृत्रीम बुद्धिमत्तेच्या बळावर सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथं सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पँक्ट समिट -२०२६ मधे एआय इन ग्रिकल्चरया विषयावरच्या चर्चासत्रात फडणवीस बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी राज्य सरकार सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रातल्या विविध समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने मात करू शकतो, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारी २३ तारखेपासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार असून, त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

****

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे बंडखोर आणि धर्मनिरपेक्ष आघाडीचे नारायण चौधरी विजयी झाले तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारीक मोमीन हे निवडून आले आहेत. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं ही निवडणुक चुरशीची ठरली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नारायण चौधरी यांना भिवंडी धर्मनिरपेक्ष आघाडीतर्फे महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली. चौधरी यांना ४८ तर उपमहापौर मोमीन यांना ४३ मतं पडली. दरम्यान, भाजपाच्या पक्षादेशा विरोधात बंडखोरी करणारे नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी या कारवाईचा स्पष्ट इशारा दिला आहे.

****

राज्यातल्या चित्रकथी जातपंचायत बरखास्त करण्यात आल्या आहेत. राज्यभरातून नाशिक इथं आलेल्या चित्रकथी समाजबांधव, भटके विमुक्त समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. जातपंचायत बरखास्तीसह आंतरजातीय विवाहास मान्यता देण्यात आली आहे. बाल विवाहास बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही कारणाने वाळीत टाकणे, आर्थिक दंड करणे यावर प्रतिबंध करण्यात आला. भटके विमुक्त समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धा या विरोधात एकत्रितपणे काम करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या सर्व निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर यांच्या हस्ते जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि एका ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, पैठण तालुक्यातल्या बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करमाडचं ग्रामीण रुग्णालय यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान २०२६ हे पुरस्कार पटकावले आहेत. येत्या २२ फेब्रुवारी रोजी मुंबई इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. या गौरवाबद्दल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागात १ लाख ९१ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्याच पेपरला कडक तपासणी करून विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा कालावधीत गैरप्रकारांना बळी न पडता, कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षेला सामोरं जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसच संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि हिंदयान यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या हिंदयान दिल्ली ते पुणे वार्षिक सायकल मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याची काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांगता झाली, शनिवारवाडा ते सिंहगड किल्ला ही सायकल आणि चढाई मोहीम यशस्वी झाली आहे. या उपक्रमाद्वारे तंदुरुस्ती, सहनशक्ती आणि भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा उत्सव साजरा करण्यात आला.

****

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट गटाचे सामने उद्यापासून सुरु होतील. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान कोलंबो इथं होईल. भारत, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बॉब्वे, आणि पाकिस्तान हे देश सुपर एटमधे पोहोचले आहेत. भारताचा सामना येत्या रविवारी दक्षिण आफ्रिकेबरोबर अहमदाबाद इथं होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या साखळी सामन्यांचा अखेरचा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि ओमान संघात होणार आहे.

****

महिला क्रिकेटमधे, भारतानं आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेच्या उपांत्य सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज बँकॉक इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ५ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेचा डाव २ चेंडू बाकी असतानाच ११८ धावात आटोपला. भारतानं ११९ धावांचं विजयी लक्ष्य ५ खेळाडूंच्या मोबदल्यात १४ व्या षटकातच पूर्ण केलं. राधा यादवनं नाबाद ३१ धावा करत फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. परवा रविवारी भारताची बांगलादेशसोबत अंतिम लढत होणार आहे.

****

अनुभवाचं शहाणपण सर्वात महत्त्वाचं असून आपल्याकडे एक समृद्ध भाषा असली पाहिजे, असं प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ दासू वैद्य यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या 'विद्यार्थी समुपदेशन आणि व्यवसाय मार्गदर्शन' या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाषा आणि विचाराने माणूस प्रगत झाला आहे, जगातील यशस्वी माणसे भाषेमुळेच मोठी झाली आहेत, असं वैद्य यांनी सांगितलं. विभागाचे संचालक डॉ सुधाकर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेचा उद्या समारोप होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या रिक्त असलेल्या १ हजार १७९ जागांसाठी येत्या २२ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. बीड, आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, या शहरातल्या एकूण ३३ परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी साडेबारा या वेळेत ही लेखी परीक्षा होणार आहे. एकूण ११ हजार ३२५ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा कालावधीत केंद्रावर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही या दृष्टीकोनातून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने देण्यात येणारे प्राचार्य रां रं बोराडे शेतकरी साहित्य पुरस्कार आणि संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कारांचं उद्या शनिवार २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीनगर इथं वितरण होणार आहे. संगमनेरचे कवी श्रीकांत ढेरंगे आणि छत्रपती संभाजीनगर इथले विशाल तायडे यांचा यावेळी सन्मान होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉक्टर ना गो नांदापूरकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या पक्षी प्रेमींसाठी एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमीच्या वतीने ११ वा पक्षी महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...