Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 10 February 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीची सरशी-काँग्रेस
आघाडीची पिछेहाट
·
छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदासाठी आज निवडणूक-जालना
तसंच लातूरचं महापौरपद बिनविरोध
·
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून
सुरुवात
·
व्यावहारिक अनुभवासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिकांशी
संपर्क साधावा-परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधानांचा सल्ला
आणि
·
टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतासोबत सामन्याला
पाकिस्तानची सहमती
****
राज्यातल्या
जिल्हा परिषदेच्या एकूण ७३१ जागांपैकी भाजपनं सर्वाधिक २२५ जागा जिंकल्या आहे. राष्ट्रवादी
काँग्रेसनं १६५ तर शिवसेनेनं १६२ जागा जिंकल्या. महाविकास आघाडीत काँग्रेसनं ५५, शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाने ४३, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाने २६ आणि २० जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या.
राज्यात
१२५ पंचायत समित्यांमध्ये एकूण एक हजार ४६२ जागांवर ही निवडणूक झाली. यामध्ये देखील
भाजपने सर्वाधिक ४५९ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं ३०६, तर शिवसेनेनं
३०२ जागा मिळवल्या. काँग्रेसनं ९७, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्ष ८९, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ४६,
मनसेनं दोन तर ३१ जागांवर अपक्ष उमेदवारांनी जागांवर विजय मिळवला.
मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत
या निवडणुका झाल्या, चारही जिल्ह्यांच्या निवडणूक निकालाबाबत
अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…
बाईट-जिल्हा परिषद, पंचायत समिती रिझल्ट
“छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या एकूण
६३ जागांपैकी भाजपनं २३, शिवसेनेनं २०, राष्ट्रवादी काँग्रेसनं चार, शिवसेनेच्या ठाकरे गटानं
नऊ, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने प्रत्येकी
एक, तर अपक्षांनी पाच जागा जिंकल्या.
परभणी जिल्हा परिषदेच्या ५४
जागांपैकी भाजपनं २४, राष्ट्रवादी काँग्रेस १५, शिवसेना पाच, ठाकरे गट सहा, काँग्रेस
तीन तर अपक्ष उमेदवारानं एक जागा जिंकली.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या
५५ जागांपैकी भाजपनं १९, शिवसेना १५, राष्ट्रवादी
काँग्रेस सहा, ठाकरे गट सात, काँग्रेस तीन,
तर अपक्षांनी चार जागा जिंकल्या.
लातूर जिल्हा परिषदेत ५९ जागांपैकी
काँग्रेसनं सर्वाधिक २३ जागा जिंकल्या. भाजपनं १८, राष्ट्रवादी
काँग्रेसनं १२, तर शिवसेना, ठाकरे गट,
पवार गट आणि मनसेनं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला.
पंचायत समितीच्या निवडणुकीत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या १२६ जागांपैकी भाजपनं ३८, शिवसेनेनं
४७, राष्ट्रवादी काँग्रेसनं १६, शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं १४, काँग्रेसनं चार, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन जागा जिंकल्या.
धाराशिव जिल्ह्यात एकूण ११०
जागांपैकी भाजपनं ४१, शिवसेनेनं ३१, राष्ट्रवादी
काँग्रेसनं नऊ, ठाकरे पक्षानं १९, काँग्रेसनं
पाच, शरद पवार गटाने एक, तर दोन जागा अपक्ष
उमेदवारांनी जिंकल्या.
परभणी जिल्ह्यातल्या एकूण
१०८ जागांपैकी भाजपनं ४७, राष्ट्रवादी काँग्रेसनं ३३, शिवसेनेनं सात, ठाकरे गटानं नऊ, काँग्रेसनं सहा, तर चार जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या.
लातूर जिल्ह्यात पंचायत समितीच्या
एकूण ११८ जागांपैकी भाजपनं ४४, राष्ट्रवादी काँग्रेसनं २५, शिवसनेनं एक, काँग्रेसनं ३९, शरद
पवार गटाने दोन, उद्धव ठाकरे गटानं एक तर अपक्ष उमेदवारांनी चार
जागा जिंकल्या आहेत.’’
****
जिल्हा
परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रातल्या लोकांना सुशासन
आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीला अनुसरून काम करणारी युती हवी असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, तळागाळातल्या
पक्ष कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचं कौतुक केलं.
****
छत्रपती
संभाजीनगरच्या महापौर तसंच उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे. महायुतीकडून महापौर
पदासाठी भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज भरला आहे, तर एमआयएमने
महापौर पदासाठी अशोक हिवराळे यांना रिंगणात उतरवलं आहे.
****
जालन्याच्या
पहिल्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदी भाजपाचे राजेश
राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे
यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
****
लातूर महानगरपालिकेच्या
महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे स्नेहल उटगे
यांनी काल बिनविरोध निवड झाली. वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही
उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरु होत आहे. या
परीक्षेसाठी राज्यातून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
कोणतेही
दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
आहेत.
छत्रपती
संभाजीनगर विभागात ४४९ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. विभागातून एक
लाख ९० हजार ५९२ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आहे.
या परीक्षेच्या
दरम्यान राज्यभरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याकरता आणि विद्यार्थ्यांमध्ये
गुणवत्ता वाढवण्याकरता राज्यस्तरीय दक्षता समिती नेमण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी परीक्षार्थ्यांना
कॉपीमुक्त वातावरणात निर्भयतेने परीक्षा देण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले…
बाईट- जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड
लातूर विभागातील
लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील २५६ परीक्षा केंद्रावर
९६ हजार ५४२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून जय्यत तयारी करण्यात
आली आहे. कोणत्याही केंद्रावर कॉपी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी
दिला.
बाईट- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
****
राज्यातल्या
शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबवण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या
समितीनं आपला अहवाल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. लवकरच हा अहवाल
मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.
****
राज्यातील
प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय
विभागांनी समन्वयाने तसंच प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान,
राज्यात येत्या काळात टप्प्याटप्प्याने ७० हजारांहून अधिक पदांची भरती
केली जाणार असून, ही प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही भरती प्रक्रिया राबवतांना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय
घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. भरती प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी
ऑनलाईन तसेच डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी
प्रशासनाला केल्या.
****
लोकसभा
अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी प्रस्ताव मांडण्याचा निर्णय विरोधकांनी
घेतला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांना बोलू न दिल्याबद्दल, संविधानाच्या कलम ९४ क अन्वये हा ठराव
मांडण्यात येणार आहे.
दरम्यान, संसदेत विरोधी
पक्षांना बोलू दिलं जात नाही, असा आरोप करत कालही विरोधकांनी
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ केला. या गदारोळामुळे लोकसभेचं
कामकाज प्रथम दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. राज्यसभेतही विरोधी
पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी द्यावी, या
मागणीसाठी विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
****
पाठ्यपुस्तकांच्या
पलिकडे व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी
संपर्क साधण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. परीक्षा पे चर्चा २०२६
च्या नवव्या आवृत्तीच्या कालच्या दुसऱ्या भागात त्यांनी लहान स्टार्टअप्सद्वारे उद्योजकतेचा
प्रवास सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं.
दहावी, बारावीच्या
परीक्षा जवळ येत असल्यानं, परीक्षेचा ताण, परीक्षेची तयारी, वेळ व्यवस्थापन यासोबतच, या परीक्षांना आत्मविश्वासानं कसं सामोरं जावं यावर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी
चर्चा केली. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि आवड यामध्ये संतुलन राखावं, असं सांगतानाच, पंतप्रधानांनी नागरी जबाबदारीच्या महत्त्वावरही
भर दिला.
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
टी ट्वेंटी
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारतासोबत सामना खेळण्यास सहमती दर्शवल्याचं
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीने सांगितलं आहे. या स्पर्धेत भारत पाक सामना येत्या
१५ तारखेला कोलंबो इथं होणार आहे.
****
No comments:
Post a Comment