Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 February
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
नक्षलग्रस्त भागात विकासाची
नवी पहाट उजाडल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
·
जिल्हा परिषदा आणि पंचायत
समित्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण; उद्या मतमोजणी
·
मराठवाड्यातल्या चार
जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज
·
छत्रपती संभाजीनगर इथं
संवर्धन प्रयोगशाळा उभारणीसाठी सामंजस्य करार
·
जालना जिल्ह्यात बनावट
नोटांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आणि
·
आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक
स्पर्धेत भारताची विजयी सलामी
****
नक्षलग्रस्त भागात विकासाची नवी पहाट उजाडली असल्याचं
प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल छत्तीसगडमध्ये जगदलपूर
इथं बस्तर पंडुम उत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सरकारच्या
नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलग्रस्त भागात भीतीचं वातावरण संपल्याचं
राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या...
बाईट- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा
दलांबरोबर झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी मारले गेले. या भागात आता फक्त सात
नक्षलवादी असल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. ते काल पत्रकार
परिषदेत बोलत होते. ३१ मार्चपर्यंत गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईल, असा
विश्वास निलोत्पल यांनी व्यक्त केला.
****
राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठीची
मतदान प्रक्रिया काल शांततेत पूर्ण झाली. या मतदानाची उद्या नऊ तारखेला मतमोजणी
होणार आहे
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर
तसंच धाराशिव या चार जिल्हा परिषदा आणि ३६ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६७ टक्के
मतदान झालं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७२ पूर्णांक ६९ टक्के मतदानाची
नोंद झाली असून,
परभणी जिल्ह्यात ५५ पूर्णांक ७१ टक्के, लातूर
जिल्ह्यात सुमारे ७५ टक्के,
तर धाराशिव जिल्ह्यात जवळपास ६५ टक्के मतदान झाल्याचा
प्राथमिक अंदाज जिल्हा निवडणूक प्रशासनाने कळवला आहे. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा
तालुक्यातील गौर,
कातनेश्वर, एरंडेश्वर इथं काल मतदानाची वेळ
संपण्यापूर्वी मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पात्र मतदारांना प्रशासनाच्या वतीने मतदानासाठी टोकन देण्यात आले, त्यामुळे
सायंकाळी उशीरापर्यंत मतदान सुरू होतं.
****
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काटेवाडी
इथं मतदानाचा हक्क बजावला. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या
शिरूर ताजबंद इथं,
आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार शिरशी इथं तर आमदार संभाजी
पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजनी इथं मतदान केलं. आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी बाभळगाव इथं मतदानाचा हक्क
बजावला.
परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर
तालुक्यातील बोर्डी इथं आपला मतदानाचा हक्क बजावला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आमदार विलास भुमरे यांनी पैठण
इथं, आमदार अनुराधा चव्हाण यांनी, तसंच जालन्याचे खासदार कल्याण काळे
यांनी फुलंब्री इथं तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड इथं मतदानाचा हक्क
बजावला.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव तालुक्यातल्या
गोवर्धन वाडी इथं,
आमदार तानाजीराव सावंत यांनी परंडा तालुक्यातल्या मुगाव इथं, आमदार
कैलास पाटील यांनी सारोळा इथं तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तेर इथं सपत्नीक
मतदानाचा हक्क बजावला.
उमरगा तालुक्यातल्या कोथळी इथं ९१ वर्षीय आजी सुमनबाई
नेमीनाथ गुरव यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. तर परभणी
जिल्ह्यात विश्रांती भोसले या नव मतदार तरुणीने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
आपल्या भावना तिने आकाशवाणीकडे या शब्दांत व्यक्त केल्या..
बाईट-विश्रांती भोसले
****
नांदेड महानगरपालिकेत काल महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज
दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या महापालिकेत भाजपा - शिवसेना युती, काँग्रेस
- वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीसाठी येत्या
मंगळवारी महानगरपालिकेत विशेष सभा होईल.
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदी इस्लाम पक्षाच्या
नसरीन बानो खालिद शेख तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांचा विजय
झाला. काल झालेल्या विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
****
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता
पार्टीने रितू तावडे यांचं नाव काल जाहीर केलं, तर उपमहापौर पदासाठी
शिवसेनेने संजय घाडी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम
यांनी रितू तावडे यांच्या,
तर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांच्या
उमेदवारीची घोषणा केली.
****
सेशेल्स या देशाचे राष्ट्रपति पैट्रिक हर्मिनी याचं काल
मुंबई इथं भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यासाठी
आगमन झालं. त्यांनी काल, केंद्रीय बंदरं आणि जलमार्ग मंत्री
सर्वानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली. तसंच ते भारतीय उद्योग महामंडळ –सी.आय.आय.
तर्फे आयोजित भारत-सेशेल्स व्यापार गोलमेज संमेलनात सहभागी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
परिसरात संवर्धन प्रयोगशाळा उभारणीसाठी इंटॅक आणि महापालिका यांच्यात काल सामंजस्य
करार झाला. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत आणि इंटॅकच्या छत्रपती
संभाजीनगर चॅप्टरच्या समन्वयक, ज्येष्ठ वास्तुविशारद माया वैद्य यांनी
या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे छत्रपती संभाजीनगर इथे जुन्या
ऐतिहासिक वस्तू,
हस्तलिखिते तसंच चित्रांचे
शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन करणं शक्य होणार आहे. इंटॅकच्या देशभरात पाच ठिकाणी
संवर्धन प्रयोगशाळा आहेत. महाराष्ट्रातील ही पहिलीच प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर
इथं होणार आहे.
****
जालना जिल्ह्यात अंबड शहरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची
खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचा अंबड पोलिसांनी काल पर्दाफाश केला. या कारवाईत
पोलिसांनी १ लाख २२ हजार रुपयांच्या २४४ बनावट नोटा जप्त करत पाच आरोपींना अटक
केली, या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग उघडकीस आला असून, बनावट
नोटांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं
आहे. संशयितांविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं देण्यात येणारा
कार्यक्षम खासदार पुरस्कार यंदा धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना
जाहीर झाला आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते पत्रकार माधवराव लिमये यांच्या
स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणाऱ्या देणगीतून
कार्यक्षम आमदार आणि कार्यक्षम खासदार हे पुरस्कार एका वर्षाच्या आड दिले जातात.
५० हजार रूपये आणि स्मृती चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
संत श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रगट दिन उत्सव आज साजरा
होत आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यातून अनेक दिंड्या बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं
दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर गजानन महाराज मंदिर आज २४ तास खुलं राहणार आहे.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने शेगाव इथं येत्या
२५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६ घेतला जाणार आहे, केंद्रीय
आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल शेगाव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन जाधव यांनी केलं.
****
आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धा कालपासून सुरु झाली. भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात अमेरिका संघाचा २९
धावांनी पराभव करत,
विजयी सलामी दिली. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या या
सामन्यात अमेरिका संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडत, भारताला
फलंदाजीसाठी पाचारण केलं. अभिषेक वर्मा तसंच शिवम दुबे शून्यावर बाद झाले. ईशान
किशन २०, तिलक वर्मा २५ तर रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्या अनुक्रमे सहा आणि पाच धावांवर
बाद झाले. सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी करत, १०
चौकार आणि चार षटकार झळकावत ८४ धावा करून, भारताची धावसंख्या १६१
पर्यंत नेली. भारताने दिलेलं हे आव्हान गाठतांना अमेरिका संघ २० षटकांत आठ बाद १३२
धावाच करू शकला. अमेरिकेकडून खेळणारा दिल्लीचा मिलिंदकुमार, पुण्याचा
शुभम रांजणे,
आणि संजय कृष्णमूर्ती वगळता अन्य फलंदाज खेळपट्टीवर तग धरू
शकले नाहीत. दरम्यान अमेरिकेकडून खेळणारा मुंबईचा सौरभ नेत्रावळकर काल गोलंदाजीत
फारशी चमक दाखवू शकला नाही,
सौरभने चार षटकांत ६५ धावा दिल्या.
नाबाद ८४ धावांची खेळी करणारा भारताचा कर्णधार सूर्यकुमार
यादव सामनावीर ठरला
तत्पूर्वी, काल कोलंबोत झालेल्या पहिल्या सामन्यात
पाकिस्तान संघाने नेदरलँड संघाचा तीन गडी राखून पराभव केला तर कोलकत्ता इथं
झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने स्कॉटलँडचा ३५ धावांनी पराभव केला.
मालिकेत आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान, इंग्लंड-नेपाळ, आणि
श्रीलंका-आयर्लंड सामने होणार आहेत. भारताचा पुढचा सामना १२ तारखेला नामिबियासोबत
होणार आहे.
****
देशाला महासत्ता करायचं असेल तर देशाचे शेतकरी आर्थिक सक्षम
झाले पाहीजेत,
असं मत नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांनी व्यक्त केलं
आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या परळी इथं बोलत होते.
****
No comments:
Post a Comment