Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचा पाया
छत्रपती शिवरायांनी घातल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन-विविध कार्यक्रमांनी मराठी
भाषा गौरव दिन साजरा
· खासगी शाळा आणि शिकवणी वर्गातल्या
शुल्कावर मर्यादेसाठीचं धोरण लवकरच जाहीर होणार
· सजावटीसाठी कृत्रीम फुलांचा वापर केल्यास
सरकारकडून कारवाईचा इशारा
आणि
· छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या क्रीडा
महोत्सवाला प्रारंभ
****
मराठी
भाषेच्या शुद्धीकरणाचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवनात झालेल्या, ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री
बोलत होते. शिवकालीन मराठीवर असलेल्या फारसी, अरबी भाषांचा प्रभाव शिवरायांनी
दूर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले -
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलतांना, मराठीला रोजगार आणि जागतिक
ओळखीची भाषा करणार असल्याचं सांगितलं. मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण
आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटीबद्ध असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांच्यासह विधिमंडळातील सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
****
मराठी
भाषा दिनानिमित्त आज नाशिक इथं चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा शुभारंभ झाला. या वेळी
काढलेल्या ग्रंथदिंडी वेळी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. या ग्रंथदिंडीत आळंदी इथल्या
जोग महाराज कीर्तन वारकरी शिक्षण संस्थेच्या तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त
सहभाग घेतला. यावेळी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात
आलं. त्यानंतर शासनाच्यावतीनं प्रतिष्ठानला पुस्तकं भेट देण्यात आली. यावेळी महापौर
हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं आज ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन
जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी, यावेळी बोलतांना मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा असल्याचं सांगत, या भाषेची समृद्धी आणि वैभव जोपासणं प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तिचे कर्तव्य असल्याचं
सांगितलं. यावेळी युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी रवी कोर्डे, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी
उपस्थित होते.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्य़े मागील तीन दिवसांपासून मराठी भाषा गौरव
दिनानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. आज मराठी गौरव महोत्सवात गीत लेखन कार्यशाळा
तसंच व्याख्यान घेण्यात आलं.
****
धाराशिव
इथंही “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा ग्रंथालयात कुसुमाग्रजांच्या
प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे
उद्घाटन करण्यात आलं. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह इतर अधिकारी
यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी मराठी भाषेचा
अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचं आवाहन केलं.
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात
मराठी भाषा दिनानिमित्त छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्कार वितरण करण्यात आलं. यावेळी
ज्येष्ठ लेखक सीताराम सावंत यांच्यासह प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या
संखेनं उपस्थित होते.
****
नांदेड
महापालिकेत महापौर कविता संतोष मुळे यांच्या वतीने मराठी भाषा प्रतिज्ञेचं सामुहिक
वाचन करण्यात आलं. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह मनपातील अधिकारी कर्मचारी
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भाषा, वाङ्गमय आणि
संस्कृती अभ्यास संकुलात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाषा संकुलाचे
संचालक प्रा.दिलीप चव्हाण, मराठी विभागाचे प्रा.वैजनाथ अनमुलवाड
यांच्यासह अनेक प्राध्यापक तसंच विद्यार्थी उपस्थित होते.
****
राज्यातल्या
खासगी शाळा आणि शिकवणी वर्गातल्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर
करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत केली. राज्यातल्या
शाळांची परिस्थिती, आरटीई आणि संबंधित विषयावर सदस्यांनी
विचारलेल्या प्रश्नांला ते उत्तर देत होते. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी १ किलोमीटरची
मर्यादा आहे, पण जिथं शाळा नसतील तिथं ही मर्यादा शिथिल करण्याचा विचार करू
असं आश्वासन भुसे यांनी यावेळी दिलं. गेल्या काही वर्षांत आधार प्रमाणिकरणामुळे ९ लाख
दुबार विद्यार्थी कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातल्या सर्व माध्यमाच्या
आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही मंत्री भुसे यांनी
सांगितलं.
****
येत्या
एक मार्चपासून राज्यभरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. या अनुषंगानं आज विधानभवनात
बोलावलेल्या बैठकीत सरनाईक बोलत होते. ऑनलाइन आणि पारदर्शक परवाना प्रक्रियेच्या माध्यमातून
कायदेशीर वाहतूक सुलभ करणं, तसंच प्रवाशांनीही परवानाधारक सेवांचा
वापर करण्याची जबाबदारी स्वीकारणं, ही काळाची गरज असल्याचं मंत्री सरनाईक
यांनी या बैठकीत सांगितलं.
****
जैव
विघटनशील नसलेल्या कृत्रिम फुलांवर राज्यात बंदी असून अशी फुलं सजावटीसाठी वापरणाऱ्या
सजावटकारांवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ते आज विधानसभेत विचारलेल्या लक्षवेधीवरील चर्चेला उत्तर देत होते. गेल्या काही वर्षात
राज्यात हानीकारक पदार्थांचा वापर केलेली ४ हजार टनांहून अधिक फुलं जप्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. यासाठी लवकरच शासन आदेश जारी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट
- आमदार विक्रम पाचपुते
दरम्यान, राज्यात यासंदर्भात ९२ हजारांहून अधिक घटनांमध्ये
२५ कोटी रुपयांचा दंड केला असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सदनात
दिली. पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करणाऱ्या कार्यक्रमांना हरित दर्जा आणि प्रोत्साहन
देण्याची शिफारस काही सदस्यांनी केली होती. या शिफारशीचा विचार करू असं आश्वासनही मुंडे
यांनी यावेळी दिलं.
****
थोर
स्वातंत्र्यसैनिक, चंद्रशेखर आझाद यांच्या हौतात्म्यदिनानिमित्त
आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आझाद यांना
आदरांजली वाहताना, ब्रिटिश सत्तेच्या पायाला हादरे देण्याचं
धाडस चंद्रशेखर आझाद यांनी दाखवल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही
समाजमाध्यमावर आझाद यांना आदरांजली वाहिली आहे.
दरम्यान, थोर सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न सन्मानित नानाजी
देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महापालिकेच्या क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. भारतीय हॉकी संघाचे
माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं.
महापौर समीर राजुरकर तसंच मनपा आयुक्त जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या
भाषणात पिल्ले यांनी, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना हॉकी
शिकवण्यासाठी नक्की वेळ देणार असल्याचं सांगितलं. या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, खो-खो, कबड्डी, डॉजबॉल, १०० मीटर धावणे, रस्सीखेच, दोरीवरच्या उड्या, गोळाफेक अशा आठ खेळांचा समावेश करण्यात
आला आहे.
****
मुंबई
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच बीड इथं स्थापन करण्याच्या मागणीसाठी बीड इथल्या वकिल
संघानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. न्याय आपल्या दारी या तत्वाचे पालन
समान न्यायाने करण्यात यावे तसंच बीड शहरात विविध प्राधिकरणं आणि न्यायालये स्थापन
करण्यासह ११ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या सर्व मागण्यांचं निवेदन वकील संघानं जिल्हा प्रशासनाकडे सादर केलं.
****
टी
– ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतल्या सुपर आठ फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात
सामना होणार आहे. श्रीलंकेत कोलंबो इथं आर प्रेमदासा मैदानावर सायंकाळी सात वाजता हा
सामना सुरू होणार आहे.
****
No comments:
Post a Comment