Tuesday, 24 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      तीन बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; गोंदिया –जबलपूर मार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश

·      जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती, या देशव्यापी मोहिमेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

·      चालु आर्थिक वर्षासाठी अकरा हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर

·      कायद्यात डिजिटल अटक नावाची कुठलीही तरतूद नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

आणि

·      राज्यातल्या अनेक भागांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील, महसूलमंत्र्यांची माहिती

****

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधल्या आठ जिल्ह्यांमध्ये तीन बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामध्ये गोंदिया –जबलपूर रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, बिहारमधल्या पुनारख आणि किउल दरम्यान तसंच झारखंडमधल्या गमरिया आणि चंदिल दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका, या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत सुमारे नऊ हजार ७२ कोटी रुपये असून, २०३०-३१ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. या तीन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे ३०७ किलोमीटरची वाढ होणार आहे. गोंदिया –जबलपूर रेल्वे मार्गाबाबत माहिती देताना वैष्णव म्हणाले,

बाईट – रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

 

२०२६-२७ च्या हंगामात कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत पाच हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल ठेवण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली तसंच केरळ राज्याचं नाव केरलम करण्याचा प्रस्तावही मंजूर झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

दरम्यान, नवीन पंतप्रधान कार्यालय संकुल सेवा तीर्थ इथं आज केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक झाली. राष्ट्रनिर्मितीच्या नव्या पर्वाची सुरुवात आणि “लोकशाहीची जननी” म्हणून भारताच्या अभिमानाला बळकटी देणारा हा ऐतिहासिक क्षण असल्याचं वैष्णव यावेळी म्हणाले.

****

मुंबईत लोकभवन इथं हिंदुजा हॉस्पिटलनं आयोजित केलेल्या जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती, या देशव्यापी मोहिमेचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. राष्ट्रपती दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर असून, आज दुपारी त्यांचं मुंबईत आगमन झालं.

****

चालु आर्थिक वर्षासाठी अकरा हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केल्या. महसुली तूट भरून काढण्यासाठी पुरवणी मागण्या कमी ठेवण्यात आल्या आहेत. कृषी पंप आणि यंत्रमागावरच्या अनुदानासाठी तीन हजार एकशे बारा कोटी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आठशे तीन कोटी, तर जलजीवन अभियानासाठी एक हजार ४३१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यावर ९ कोटी ३२ लाख रुपये कर्जाचा बोजा वाढण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.

****

आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबवण्यासंदर्भात कायद्यात बदल केला असून, आता राज्यातली सर्व ४७९ धर्मादाय रुग्णालयं सरकारच्या पूर्णपणे अखत्यारीत आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस दिली. ते आज विधानसभेत बोलत होते. यापुढे या योजना न राबवणाऱ्या पात्र रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

****

कायद्यात डिजिटल अटक नावाची कुठलीही तरतूद नाही, असं फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

या प्रकरणात कुणी पैसे दिले असतील तर १९३० या क्रमांकावर फोन करावा, त्यानंतर पैसे हस्तांतरण थांबवता येऊ शकतं, अशी माहितीही त्यांनी दिली.

सरकार घरोघरी जाऊन नागरिकांना तसंच शाळा महाविद्यलयांत जाऊन विद्यार्थ्यांना डिजिटल अटकेविषयी माहिती देऊन जागरूक करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

****

सरकारची राज्याला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची घोषणा मृगजळ आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेत बोलत होते. भाजप आमदार संजय कुटे यांनी चर्चेत सहभाग घेताना, दावोस दौऱ्यात तीस लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली असून, गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असल्याचं सांगितलं. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

विधान परिषदेतही राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आज सुरू झाली.

****

मराठवाडा, विदर्भासह राज्यातल्या अनेक भागांत कालच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेत हा मुद्दा उपस्थित करत, तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली होती.

****

विदर्भ आणि आणि मराठवाड्यात काल झालेली गारपीट आणि दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर होणारा कथित अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं नियम-निकष बाजूला ठेवून तातडीनं रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या म्हणण्याची दखल घेत, सरकारला याबाबत निवेदन करण्याचे निर्देश दिले.

****

२०२५-२६ च्या हंगामातल्या कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी ही अंतिम मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस काढणीला अनेक ठिकाणी उशीर होत असून, राज्यातला कोणताही कापूस उत्पादक शेतकरी किमान आधारभूत किंमतीपासून वंचित राहू नये, यासाठी ही मुदत वाढवावी, असं मुनगंटीवार यांनी यासंदर्भातल्या पत्रात म्हटलं आहे.

****

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. राज्यातल्या सगळ्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंदणी आणि प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढच्या दोन तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली.

****

बीड जिल्ह्यात काल गेवराई, बीड आणि अंबाजोगाई तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीनं आज बीड इथं असहकार आंदोलन करण्यात आलं. प्रलंबित लिपीक संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतनत्रुटी दूर करुन सुधारीत वेतन श्रेणी लागू करणं, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणं, यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

शासकीय मुद्रणालय कर्मचारी महासंघाच्या वतीनं वीस फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनात रोज दोन तास धरणे आंदोलन सुरू आहे. आकृतिबंध - मंजुरी; सेवाप्रवेश नियम, रिक्त पदे सरळसेवेने भरणं यासह अन्य मागण्या मान्य न झाल्यास उद्या लाक्षणिक संप करण्याचा इशारा या संघटनेनं दिला आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...