Friday, 6 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      संपूर्ण जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू – पंतप्रधानांचं प्रतिपादन; रीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

·      व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय

·      १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान

·      छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपचे समीर राजुरकर, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांचे अर्ज दाखल

आणि

·      १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत भारताचं इंग्लंडला ४१२ धावांचं आव्हान

****

परीक्षेमधले गुण हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नसून, संपूर्ण जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. परीक्षा पे चर्चा या नवव्या आवृत्तीत आज ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. जीवन हे केवळ परीक्षांसाठी नसून आयुष्य सर्वोत्तम बनवण्यासाठी शिक्षण हे एक माध्यम आहे. व्यावसायिक कौशल्ये आणि जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्ये या दोन्हींमध्ये संतुलन असणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ज्ञान प्राप्तीसाठी नेहमी जिज्ञासू राहणं, शिक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन विचार करण्याची सवय लावणं, तसंच उद्दिष्टे आव्हानात्मक पण साध्य असावीत, हा मंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्यावं, त्यावर विचार करावा आणि स्वतःचे अनुभव आणि आकलन यांची सांगड घालून आत्मविश्वासानं परीक्षांना सामोरं जावं, असा सल्ला त्यांनी दिला. योग्य अभ्यास, निरीक्षण आणि ज्ञानाचा वापर केल्याशिवाय कोणतंही कौशल्य मिळवता येत नाही यावर त्यांनी भर दिला.

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

लोकसभेत विविध मुद्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ कायम ठेवल्यामुळे सदनाचं कामकाज आजही बाधित झालं. या अधिवेशनात गदारोळामुळे आतापर्यंत १९ तास १३ मिनिटांचं कामकाज वाया गेल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. सदस्य सतत सदनाचं कामकाज विस्कळीत करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीनं संसद चालू शकत नाही, असं स्पष्ट करत त्यांनी, जनतेनं सदस्यांना प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलं आहे, घोषणाबाजी करण्यासाठी नाही, असं सांगितलं.

****

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं आज व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम राहणार आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या समितीच्या बैठकीतले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज जाहीर केले. सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे किरकोळ चलनवाढीचा दर आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चार टक्के राहील, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. अवैध इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमुळे ग्राहकांना होणाऱ्या नुकसानीवर मर्यादा आणण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. त्यानुसार छोट्या रकमेच्या नुकसानीसाठी ग्राहकांना २५ हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव असल्याचं गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितलं.

****

नागपुरात आज ॲडव्हांटेज विदर्भ २०२६ या खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं नागपुरात १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली असून, याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथं वाहन उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस असून, २०२८ पर्यंत उत्पादन सुरू करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, ते अत्यंत चुकीचं आणि खालच्या स्तराचं असल्याची तीव्र प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. अशा प्रकारचं राजकारण तात्काळ थांबवावं, असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले-

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सरकारनं ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती, त्यावेळी काही लाभार्थ्यांनी कुटुंबातला सदस्य सरकारी नोकरीत असल्यासंदर्भात चुकीच्या पर्यायाची निवड केली होती. या लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्यासाठी ३१ मार्चपर्यंत सरकारनं मुदतवाढ दिली आहे. त्यांना ऑनलाइन पद्धतीनं योग्य पर्याय निवडण्याची शेवटची संधी सरकारनं उपलब्ध करुन दिली आहे.

****

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार आहे. सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी, नऊ फेब्रुवारीला होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी दोन हजार ६२४ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समित्यांच्या एक हजार ४६२ जागांसाठी ४ हजार ८१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक २९४ उमेदवार धाराशिवमध्ये तर पंचायत समित्यांसाठी सर्वाधिक ४९६ उमेदवार पुण्यातून निवडणूक रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सुमारे १८ लाख ७३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गट आणि आठ पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात तेराशे आठ मतदान केंद्रावर अकरा लाख ४५ हजार ८८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात सहा तालुक्यातले १५ आठवडे बाजार उद्या बंद राहणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपचे समीर राजुरकर यांनी, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी आज अर्ज दाखल केले. भाजप नेते, बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पदासाठी इतर अर्ज दाखल न झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. याबाबात येत्या दहा तारखेला महानगरपालिकेत अधिकृत घोषणा केली जाईल, असं सावे यांनी सांगितलं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गट नेते पदी गणेश लोखंडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

****

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी भाजपच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदासाठी भाजपाचे राजेश राऊत यांनी आज अर्ज दाखल केले. या पदासाठी एकच अर्ज आल्यानं ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृय घोषणा येत्या नऊ तारखेला करण्यात येणार आहे. 

****

नांदेड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, एमआयएम आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आज उमेदवारी दाखल केली. भाजपकडून महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दीपकसिंह रावत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

झिम्बाब्वे इथं सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत ५० षटकांत नऊ बाद ४११ धावा केल्या. वैभव सुर्यवंशीने ८० चेंडुत प्रत्येकी १५ चौकार आणि षटकार मारत १७५ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या आठव्या षटकांत एक बाद २९ धावा झाल्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...