Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 21 February 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
कृत्रीम बुद्धिमत्तेच्या बळावर सर्वांगीण समृध्दीसाठी
राज्यशासन प्रयत्नरत- इंडिया एआय इम्पँक्ट समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं
प्रतिपादन
·
एआय फॉर ॲग्री या दोन दिवसीय परिषदेचं उद्यापासून मुंबईत
आयोजन
·
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्रं
तसंच एका ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर
·
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला कालपासून
प्रारंभ
आणि
·
टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजपासून सुपर एट
गटाचे सामने
****
कृत्रीम
बुद्धिमत्तेच्या बळावर सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नरत असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथं सुरू
असलेल्या इंडिया एआय इम्पँक्ट समिट -२०२६ मधे एआय इन अँग्रिकल्चर' या विषयावरच्या
चर्चासत्रात काल ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि
चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केली. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नव्या तंत्रज्ञानाच्या
मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भारत सरकार, जागतिक संशोधन
संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी राज्य सरकार सहकार्य करण्यासाठी
तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रातल्या विविध समस्यांवर कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या सहाय्याने मात करू शकतो, असं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील
अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षासाथी’ या एआय आधारित टूलची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी
केली. नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित 'कुंभदूत'
या एआय-आधारित ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरणही यावेळी करण्यात
आलं.
माहिती-तंत्रज्ञान
विभाग आणि भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन यांच्यात एआय आणि प्रशासकीय यंत्रणांचं डिजिटायझेशन
यासंदर्भात करार काल करण्यात आला.
दरम्यान, एआय फॉर ॲग्री
या कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर परिषदेचं उद्या
आणि परवा मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती
दिली. या परिषदेत विविध विषयांवरील चर्चासत्रांसह अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
राज्य विधीमंडळाचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन परवा सोमवारी २३ तारखेपासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपालांच्या
अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार असून, त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी
राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि एका ग्रामीण रुग्णालयाला
राज्यस्तरीय ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव प्राथमिक
आरोग्य केंद्र, पैठण तालुक्यातल्या बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करमाडचं
ग्रामीण रुग्णालय यांनी बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान
२०२६ हे पुरस्कार पटकावले आहेत. येत्या २२ फेब्रुवारी रोजी मुंबई इथं या पुरस्कारांचं
वितरण होणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. हा या कार्यक्रम शृंखलेचा १३१ वा भाग असेल. सकाळी ११ वाजता प्रसारित होणारा
हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, तसंच
न्यूज ऑन ए आय आर ॲप वरुन ऐकता येईल.
****
अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी जगभरातल्या बहुतांश देशांवर लादलेलं व्यापार
शुल्क, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं आहे. असं एकतर्फी
व्यापार शुल्क लावण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रॅम्प यांना अधिकार नसल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. ट्रॅम्प यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत,
इतर कायद्यांच्या आधारे नवीन दहा टक्के जागतिक कर लावणार असल्याचं सांगितलं.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला कालपासून प्रारंभ झाला. छत्रपती
संभाजीनगर विभागात एक लाख ९१ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली
आहे.
**
नांदेड
जिल्ह्यातल्या १७८ केंद्रांवर ४३ हजार ९४९ परीक्षार्थी काल उपस्थित होते. प्रत्येक
परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत वेबकास्टद्वारे तसच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या
सहाय्याने निरीक्षण करण्यात आलं.
**
बीड जिल्ह्यात
एकूण १५६ केंद्रांवर ४३ हजार विद्यार्थी १० वीची परीक्षा देत आहेत.
दरम्यान, बीड तालुक्यातल्या
कुर्ला इथल्या यशवंत माध्यमिक विद्यालयात परीक्षार्थ्यांसाठी पुरेशा सोयी सुविधा नसल्याप्रकरणी
शिक्षण अधिकारी प्रिया राणी पाटील यांनी केंद्र संचालक यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव
वरिष्ठांकडे सादर केला आहे. तसंच इथल्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेतल्या परीक्षा
केंद्रावर व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
**
जालना जिल्ह्यातल्या
१०२ केंद्रांवर काल २८ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ५१२ विद्यार्थी
गैरहजर राहिले.
लातूर जिल्ह्यातील
१५२ परीक्षा केंद्रांवर एकूण ३९ हजार २४२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा
सुनिश्चित करण्यासाठी भरारी पथकं तसंच कायमस्वरूपी बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात
आली आहे.
****
केंद्रीय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि हिंदयान यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या
हिंदयान दिल्ली ते पुणे वार्षिक सायकल मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याची छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीदिनी सांगता झाली, शनिवारवाडा ते सिंहगड किल्ला ही या सायकल
आणि चढाई मोहीम यशस्वी झाली आहे.
****
टी ट्वेंटी
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट गटाचे सामने आजपासून सुरु होत आहेत. पहिला सामना
पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान कोलंबो इथं होणार आहे. भारत, पाकिस्तान
वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड,
श्रीलंका, न्यूझीलंड, आणि
झिम्बॉब्वे, हे देश सुपर एटमधे पोहोचले आहेत. उद्या रविवारी अहमदाबाद
इथं भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेत
ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीची काल विजयी सांगता झाली. कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने
ओमानचा ९ गडी राखून पराभव केला.
****
बीड जिल्ह्यातील
परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे याना २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. तक्रारदाराला ७ लाख रुपयांचं ऐपतदार
प्रमाणपत्र देण्यासाठी मुंडे यानी ही लाच मागितली होती.
****
डॉ बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या 'विद्यार्थी
समुपदेशन आणि व्यवसाय मार्गदर्शन' या कार्यशाळेला कालपासून प्रारंभ
झाला. प्रसिद्ध कवी डॉ दासू वैद्य यांनी यावेळी बोलतांना, भाषा
आणि विचाराने माणूस प्रगत झाला, भाषेमुळेच माणसं यशस्वी झाल्याचं
सांगितलं. विभागाचे संचालक डॉ सुधाकर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेचा
आज समारोप होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या
कायदा सुव्यवस्थेचा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल दूरदृष्य प्रणालीच्या
माध्यमातून आढावा घेतला. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर कठोर कार्यवाही
करावी, अंमली पदार्थांसह नशेसाठीच्या औषधांची विक्री होणार नाही,
यासाठी तातडीने मोहीम हाती घेण्याची सूचना भोसले यांनी केली.
****
कुणबी, मराठा-कुणबी
आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात स्थापन समितीने काल जालना इथं जिल्हाधिकारी
कार्यालयात आढावा बैठक घेतली. पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया
अधिक सुलभ आणि गतिमान करण्याच्या सूचना, समितीचे अध्यक्ष माजी
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी केल्या.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या पक्षी प्रेमींसाठी एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल
अकॅडमीच्या वतीने ११ वा पक्षी महोत्सव आजपासून सुरू होत आहे. २२ फेब्रुवारी रोजी पैठण
इथल्या सोनेवाडी इथं पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात
पोलीस पाटील पदांच्या रिक्त असलेल्या १ हजार १७९ जागांसाठी उद्या लेखी परीक्षा घेण्यात
येणार आहे. जिल्ह्यात ३३ परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी साडेबारा या वेळेत ही
लेखी परीक्षा होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय तसंच सरस्वती भुवन विज्ञान
महाविद्यालयाला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत A प्लस श्रेणी
प्राप्त झाली आहे.
****
No comments:
Post a Comment