Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 25 February 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
निरोगी लोकसंख्या ही विकसित भारताच्या स्वप्नाची पायाभरणी
असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
·
गोंदिया-जबलपूर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह रेल्वेच्या
तीन प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
·
चालु आर्थिक वर्षासाठी ११ हजार ९५५ कोटी रुपयांच्या पुरवणी
मागण्या विधानसभेत सादर
·
कायद्यात डिजिटल अटक नावाची कुठलीही तरतूद नाही, मुख्यमंत्र्यांचं
स्पष्टीकरण
आणि
·
श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा शुभारंभ
****
निरोगी
लोकसंख्या ही विकसित भारताच्या स्वप्नाची पायाभरणी असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी केलं. त्या काल मुंबईत लोकभवन इथं जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती
या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन करताना बोलत होत्या. देशातल्या नागरिकांचं आरोग्य ही
सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी खासगी क्षेत्रानंही सहकार्य करावं,
असं त्यांनी सांगितलं. शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही तितकेच महत्त्वाचे
असल्याचं अधोरेखित करत राष्ट्रपतींनी, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष
न करण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या,
बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यावेळी
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
देशभरातल्या
७५ जिल्ह्यांमध्ये चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांची आरोग्य तपासणी, तसंच आरोग्याच्या
विविध समस्यांविषयी जनजागृती केली जाणार असल्याचं हिंदुजा रुग्णालयाचे अध्यक्ष ए. पी.
हिंदुजा यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रपती
आज शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्याला
उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन त्या पुढे शेगावला रवाना होतील.
****
गोंदिया-जबलपूर
रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह रेल्वेच्या तीन प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं
काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ
बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या तीन प्रकल्पांवर एकूण नऊ हजार ७२ कोटी
रुपये खर्च होणार आहे. नवी दिल्लीत नव्यानं उभारण्यात आलेल्या सेवा तीर्थ संकुलात काल
प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. केरळ राज्याचं नाव ‘केरलम्’ असं करण्याच्या
प्रस्तावाला, तसंच २०२६-२७ च्या हंगामात कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत
पाच हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल ठेवण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
****
बारामती
विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय – डीजीसीएनं, अपघातग्रस्त
विमान मालकीच्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या चार लिअरजेट विमानांचं उड्डाण तात्काळ
स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. २८ जानेवारी रोजी झालेल्या अपघातानंतर या विमानांचं
विशेष सुरक्षा परीक्षण करण्यात आलं. तपासणीत देखभाल प्रक्रियेत त्रुटी, उड्डाण सुरक्षेचे नियम आणि तांत्रिक निकषांचं उल्लंघन आढळल्याचं डीजीसीएनं
स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत कंपनी या त्रुटींचं मूळ कारण शोधून दुरुस्ती करत नाही आणि
सर्व सुरक्षा निकष पूर्ण करत नाही, तोपर्यंत विमानांना पुन्हा
उड्डाणाची परवानगी दिली जाणार नाही. नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर्ससोबतच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर
डीजीसीएनं विमान कंपन्यांसाठी नव्या कडक सुरक्षा आदेशांची घोषणा केली आहे.
****
चालु आर्थिक
वर्षासाठी अकरा हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल विधानसभेत सादर केल्या. महसुली तूट भरून काढण्यासाठी पुरवणी मागण्या
कमी ठेवण्यात आल्या आहेत. कृषी पंप आणि यंत्रमागावरच्या अनुदानासाठी तीन हजार एकशे
बारा कोटी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आठशे
तीन कोटी, तर जलजीवन अभियानासाठी एक हजार ४३१ कोटींची तरतूद करण्यात
आली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यावर ९ कोटी ३२ लाख रुपये कर्जाचा बोजा वाढण्याचा
अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.
****
आयुष्यमान
भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबवण्यासंदर्भात कायद्यात
बदल केला असून, आता राज्यातली सर्व ४७९ धर्मादाय रुग्णालयं सरकारच्या पूर्णपणे
अखत्यारीत आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस दिली. ते
काल विधानसभेत बोलत होते. यापुढे या योजना न राबवणा-या पात्र रुग्णालयांवर कठोर कारवाई
करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
**
कायद्यात
डिजिटल अटक नावाची कुठलीही तरतूद नाही, असंही फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात सांगितलं. ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या प्रकरणात
कुणी पैसे दिले असतील तर १९३० या क्रमांकावर फोन करावा, त्यानंतर
पैसे हस्तांतरण थांबवता येऊ शकतं, अशी माहितीही त्यांनी दिली.
****
विधीमंडळाच्या
दोन्ही सभागृहात काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात
झाली.
सरकारची
राज्याला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची घोषणा मृगजळ आहे, अशी टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी यावेळी केली. भाजप आमदार
संजय कुटे यांनी चर्चेत सहभाग घेताना, दावोस दौऱ्यात तीस लाख
कोटींची गुंतवणूक राज्यात आली असून, गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र
हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असल्याचं सांगितलं. मराठवाड्यात सिंचनाच्या योजना
रखडल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी
द्यावं अशी मागणी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केली. चेतन तुपे यांनीही चर्चेत
भाग घेतला.
****
मराठवाडा, विदर्भासह
राज्यातल्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण
करण्याचे आदेश दिले जातील, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी आज विधानसभेत सांगितलं. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेत हा मुद्दा
उपस्थित करत, तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली
होती.
****
विद्यार्थ्यांसाठी
शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी सर्व
शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावेत,
असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या
आढावा बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या सगळ्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधल्या
विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंदणी आणि प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही
त्यांनी यावेळी दिले.
****
राज्य शासनाचा
कृषी विभाग, आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा काल तुळजापूर इथं शुभारंभ झाला. पालकमंत्री
प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या महोत्सवाचं उद्घाटन झालं. महोत्सवात
एकूण ७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यात शासकीय, निमशासकीय विभाग, महिला बचत गट तसंच विविध संस्थांचा
सहभाग आहे.
****
जालना इथं
काल राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या
संयुक्त विद्यमाने 'वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव' हा सांस्कृतिक
कार्यक्रम होत आहे. १०० हून अधिक कलाकार या महोत्सवात पारंपारिक लोककलांचं सादरीकरण
करणार आहेत.
दरम्यान, जालन्यात
'प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रदर्शन आणि विक्री'चं आयोजन करण्यात आलं असून, आज महापौर वंदना मगरे यांच्या
हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल.
****
नांदेड
इथं माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या संगीत शंकर
दरबार कार्यक्रमाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे.
लातूरचे डॉ. राम बोरगावकर यांना या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात
येणार आहे. आज या कार्यक्रमात अनुपमा जोशी यांचे सरोद वादन, रुचिरा केदार
आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे.
****
उमेद महाराष्ट्र
राज्य जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून एक मार्च पर्यंत विक्री
आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या जिल्हा परिषद प्रांगणात भरणा-या
या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या
गेवराई तालुक्यातल्या तळपट बोरगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची
जागतिक स्तरावरील सायबर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. बंगळुरु
इथल्या स्ट्रॅटाबिझ व्हेंचर्स अंतर्गत कार्यरत असणारी राष्ट्रविद्या गीत ही स्वयंसेवी
संस्था आणि सायबर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या
निमित्ताने जागतिक स्तरावरील राष्ट्रगीत गायन कार्यक्रम घेण्यात आला. यात शाळेतले ४९
विद्यार्थी आणि तीन शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. या जागतिक नोंदीचं प्रमाणपत्र
शाळेला नुकतच प्रदान करण्यात आलं.
****
जय महाराष्ट्र
शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीनं काल बीड
इथं असहकार आंदोलन करण्यात आलं. प्रलंबित लिपीक संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना चौथ्या
वेतन आयोगापासूनची वेतनत्रुटी दूर करुन सुधारीत वेतन श्रेणी लागू करावं, आदी मागण्यांचं
निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment