Monday, 23 February 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. महाराष्ट्र देशातलं अग्रणी औद्योगिक राज्य असल्याचं, राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. विकसित महाराष्ट्रासाठी २०२६ ते २०३० या कालावधीसाठी महाराष्ट्र उद्योग सेवा धोरण राबवलं जाईल, ज्याद्वारे राज्यात ५० लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचं योगदान साडेतेरा टक्क्यांपेक्षाही जास्त असून, थेट परदेशी गुंतवणूकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक राज्यामध्ये झाली आहे, असं ते म्हणाले. यावर्षी स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या परिषदेत १८ देशांच्या विविध उद्योगांसोबत राज्याचे ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले असून, यामुळे ४० लाख रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीबद्दल माहिती देताना ते म्हणाले,

बाईट – राज्यपाल आचार्य देवव्रत

 

कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता प्रणालीचा वापर केला जात असून, बंदर विकास जहाज निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आखण्यात आल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देत, राज्याच्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्‍या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.

महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणूक धोरण, रोजगारनिर्मितीसाठी उपाययोजना, रत्ने आणि आभूषण धोरण २०२५, ॲनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स याबाबतचं धोरण, जागतिक सामर्थ्य केंद्र, गडचिरोलीला स्टील हब, विदर्भाला स्टील कॉरिडोर म्हणून विकसित करणं, भूखंडांचं पारदर्शक वितरण करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली, महाराष्ट्र स्टार्ट अप आणि उद्योग परिवर्तन धोरण, राज्यातल्या खेळाडुंच्या यशाबद्दल सरकारने केलेलं कौतुक, आदी मुद्यांवर राज्यपालांनी अभिभाषणातून प्रकाश टाकला.

****

त्यानंतर विधानसभेत कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय करुन दिला.

सभागृहात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या कार्याला उजाळा दिला. धाडसी स्वभाव, कामात सातत्य, कार्यमग्नता, नियोजनबद्ध काम या अजित पवार यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा त्यांनी उल्लेख केला. 

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, विधान भवनातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

****

नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात आज राजाजी उत्सव साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या उत्सवाचं उद्घाटन झालं. भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या राष्ट्रपती भवनातील पुतळ्याचं अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागेवर हा पुतळा उभारण्यात आला आहे. 

****

लंडन इथं काल एकोणऐंशी वा ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार - बाफ्टा २०२६ हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित 'बूंग' या मणिपुरी विनोदी-नाटक चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाच्या श्रेणीत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

संत गाडगे महाराज यांची दीडशेवी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजुरकर यांनी संत गाडगे महाराज यांना अभिवादन केलं. मनपा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह विविध प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते.

****

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारमार्फत करण्यात आलेल्या मानांकनात नंदुरबार जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. काल मुंबईत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात नंदुरबार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवआरोग्य मंत्री प्रकाश आबीटकरराज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...