Thursday, 12 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भात केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

·      यंदाच्या अर्थसंकल्पात २०५० पर्यंतचा दीर्घकालीन विकास दृष्टिकोन-अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

·      मुंबईत संगीतमय रस्त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

·      नांदेड जिल्ह्यात मुखेड परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

आणि

·      बीड तसंच जालना जिल्ह्यात बारावी परीक्षेत कॉपीचे प्रकार उघड-कारवाई सुरू

****

केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सरकारी कार्यक्रम, शैक्षणिक संस्था तसंच इतर महत्त्वाच्या कार्याक्रमांमध्ये, जन–गण–मन या राष्ट्रगीतानंतर लगेच वंदे मातरम् गीत वाजवणं अनिवार्य असेल, यापूर्वी वंदे मातरम् गीताची दोनच कडवी प्रचलित होती, आता मात्र या गीताची सर्व कडवी वाजवावीत, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या आगमन-प्रस्थानाच्या वेळी, त्यांच्या भाषणापूर्वी आणि नंतर तसंच राष्ट्रध्वजारोहणाच्या वेळी हा नियम लागू राहील, असंही या सूचनांमध्ये म्हटलं आहे.

****

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींशी सुसंगत असून, त्यात २०५० पर्यंतचा दीर्घकालीन विकास दृष्टिकोन मांडण्यात आला आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल लोसकभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत होत्या. धोरणात्मक आणि भविष्याभिमुख गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करत सर्व क्षेत्रांना बळकटी देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

त्यापूर्वी लोकजन शक्ती पार्टी रामविलासचे अरुण भारती यांनी चर्चेत सहभागी घेत, हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाचा संकल्प असून, २०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा अर्थसंकल्प आधारभूत ठरेल असं म्हटलं आहे.

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे इंद्र हांग सुब्बा यांनी अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदी स्वागतार्ह असल्याचं म्हटलं आहे.

शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी, हा अर्थसंकल्प शेतीला पाणी, युवकांना रोजगार, महिलांना सन्मान, आणि गरीबांना राशन देणारा असल्याचं नमूद केलं.

भाजपाचे सुधीर गुप्ता यांनी हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं मत व्यक्त केलं. तर केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या जनतेसाठी काहीही ठोस तरतुदी नसल्याचं मत आम आदमी पार्टीचे डॉक्टर राजकुमार छब्बेलाल यांनी व्यक्त केलं.

**

राज्यसभेतही काल अर्थसंकल्पावर चर्चा झाली. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी, हा अर्थसंकल्प फक्त आकड्यांसाठी नाही, तर अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी घेतलेल्या निर्णयांकरता स्मरणात राहिल, असं नमूद केलं. तर भाजपचे अशोक चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प युवक केंद्रीत असून, उद्योजक, शेतकरी, महिला, तसंच वंचित घटकांना सशक्त करणारा असल्याचं नमूद केलं.

काँग्रेसचे राजीव शुक्ला यांनी, अमेरिकेसोबतचा करार झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर झाल्याची टीका करत, सुधारित अर्थसंकल्प किंवा पूरक अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी केली.

****

इंडिगो विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक संचालनालयानं नियमात दिलेली सवलतीची मुदत मंगळवारी संपली. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे गेल्या डिसेंबर महिन्यात इंडिगोच्या वाहतुकीत गोंधळ होऊन प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्यामुळे कंपनीला नियमातून तात्पुरती सूट देण्यात आली होती, ती मुदत आता संपल्याचंसंचालनालयानं म्हटलं आहे.

****

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची संबंधित यंत्रणांकडून संपूर्ण तपास आणि चौकशी सुरू आहे, तरी याचा राजकीय हेतूने वापर होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, देशातली सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होते आणि ही गुंतवणूक जगभरातले विक्रम मोडणारी ठरत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. आर्थिक व्यवस्थेला उत्सवाचं स्वरूप दिल्यामुळेच राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार झालं असल्याचं ते म्हणाले.

****

मुंबईत एका संगीतमय रस्त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले,

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यात गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ केल्याचा शासन निर्णय सरकारनं काल जारी केला. ही सवलत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी लागू असून सर्व विद्यापीठं, परीक्षा मंडळं आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना ही शुल्क माफी लागू असेल.

****

नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातल्या हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज आणि जामखेड या गावांमध्ये, काल दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा हा धक्का अतिसौम्य प्रकारचा असून, यामुळे कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचं मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी सांगितलं.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं.

****

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती आणि इतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचा दौरा आज होत आहे. आपत्तीनंतरच्या गरजांच्या मूल्यांकनासाठी हा पाहणी दौरा होत असून या दौऱ्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या चौसाळा या गावात, परीक्षा केंद्रामध्ये पालकांकडूनच बारावीच्या विद्यार्थ्याला कॉपी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बीड जिल्हा प्रशासनाच्या पथकाने संबंधित केंद्रातले सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले असून, महसूल विभागाच्या पथकाच्या अहवालानुसार संबंधित केंद्र प्रमुख आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

**

जालना जिल्ह्यातही १२ वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परिक्षार्थींकडे कॉप्या आढळून आल्याचं भरारी पथकाच्या निदर्शनास आलं. याची गंभीर दखल घेत अंबड तालुक्यातल्या शहागड, गोंदी, रोहीलागड आणि बदनापूर तालुक्यात वाकुळणी इथल्या सहा शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिले.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात जैतापूर इथं सामुहिक कॉपीचा प्रकार उघड झाला, या प्रकरणी २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आस्थापनेवरील पर्यवेक्षक, शिक्षक, तसंच बैठ्या पथकातल्या सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संबंधित प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

****

हिंगोली जिल्हा पोलीस दलातल्या ६४ पदांसाठीच्या भरती प्रक्रियेत काल पहिल्याच दिवशी सुमारे ९०० उमेदवाराची चाचणी घेण्यात आली. संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबवण्यात येत असून कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी केलं आहे.

**

बीड इथंही पोलीस भरतीच्या चाचणीदरम्यान दीपक वाव्हळे या २६ वर्षीय उमेदवाराची प्रकृती बिघडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान सर्व उमेदवारांनी पुरेसा आहार आणि पुरेसं पाणी प्यावं, आणि आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिल्या.

****

धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं काल नागपूर इथं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सद्गुरूदास महाराजांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी एकूण प्रचार खर्चाचा तपशील १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयोगाकडे सादर करणं अनिवार्य आहे. विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास संबंधित सदस्याची सदस्यता रद्द होऊ शकते, असा इशारा महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे.

****

लातूर जिल्ह्याचा २०२६-२७ या वर्षाचा ५११ कोटी ५४ लाख रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परभणी इथंही काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी ३११ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

****

बावीसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या २०२५-२६ च्या प्राथमिक फेरीला कालपासून बीड इथं सुरुवात झाली. उद्या १३ तारखेपर्यंत ही प्राथमिक फेरी शहरातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडणार आहे. या ठिकाणी या तीन दिवसांत जिल्ह्यातल्या विविध बालनाट्य संस्था, शाळा तसंच विद्यालयांतून एकूण १५ बालनाट्य सादर होणार आहेत.

****

आयसीसी टी–ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज दिल्लीत भारत आणि नामिबिया यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. श्रीलंकेत बालागोला इथं श्रीलंका  – ओमान, तर मुंबईत नेपाळ – इटली हे सामने देखील आज होणार आहेत.

दरम्यान, या स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. अन्य सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडचा ३० धावांनी, तर ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा ६७ धावांनी पराभव केला.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...