Saturday, 28 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      खासगी शाळा आणि शिकवणी शुल्कावर मर्यादेसाठी लवकरच धोरणनिश्चिती

·      मराठी भाषा गौरव दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

·      सजावटीसाठी कृत्रीम फुलांच्या वापरप्रकरणी सरकारचा कठोर कारवाईचा इशारा

आणि

·      छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

****

राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गातल्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती, आरटीई आणि संबंधित विषयावर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांला ते उत्तर देत होते. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी एक किलोमीटरची मर्यादा आहे, पण जिथं शाळा नसतील तिथं ही मर्यादा शिथिल करण्याचा विचार करू असं आश्वासन भुसे यांनी यावेळी दिलं. राज्यातल्या सर्व माध्यमाच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही मंत्री भुसे यांनी सांगितलं.

****

प्रसिद्ध साहित्यिक वि.वा शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती, मराठी भाषा गौरव दिवस काल सर्वत्र साजरा झाला. मुंबईत विधानभवनात, जावे विनोदाच्या गावा' हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातल्याचं प्रतिपादन केलं. तत्कालीन मराठीवर असलेल्या फारसी, अरबी भाषांचा प्रभाव शिवरायांनी दूर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले....

बाईट-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलतांना, मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा करणार असल्याचं सांगितलं. मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले.

****

नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाचं काल उदघाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते यावेळी राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर शांतिब्रह्म, गुरूवर्य मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमलेनाच्या विशेष पुरस्कारानं गौरविण्यात आले. संत निवृत्तीनाथ महाराजांचे साहित्यासाठी नाशिकच्या  संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी ट्रस्टला ५० लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश यावेळी देण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी, यावेळी बोलतांना मराठी भाषेची समृद्धी आणि वैभव जोपासणं प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीचं कर्तव्य असल्याचं सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्य़े गेले तीन दिवस मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. काल गीत लेखन कार्यशाळा तसंच व्याख्यानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

****

धाराशिव इथं जिल्हा ग्रंथालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना कडवकर यांनी, दैनंदिन व्यवहार मराठीतूच संवाद साधण्याचं आवाहन केलं.

****

नांदेड महापालिकेत महापौर कविता संतोष मुळे यांच्या वतीने मराठी भाषा प्रतिज्ञेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह मनपातील अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भाषा, वाङ्गमय आणि संस्कृती अभ्यास संकुलात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

****

शिखांचे गुरु श्री तेग बहादुर यांच्या साडेतीनशेव्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईत खारघर इथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करून नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याबाबतच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काल हे निर्देश दिले. ज्या ठिकाणी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले असतील, त्या ठिकाणी सरपंचांनी पदभार स्वीकारु नये, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासक नियुक्त केलेल्या ग्रामपंचायतीमधल्या सरपंचांनी कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नयेत असे आदेश ही न्यायलयाने काल दिले आहेत.

****

जैव विघटनशील नसलेल्या कृत्रिम फुलांवर राज्यात बंदी असून अशी फुलं सजावटीसाठी वापरणाऱ्या सजावटकारांवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल विधानसभेत लक्षवेधीवरील चर्चेला उत्तर देत होते. यासाठी लवकरच शासन आदेश जारी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलं.  ते म्हणाले…

बाईट- आमदार विक्रम पाचपुते

दरम्यान राज्यात यासंदर्भात ९२ हजारांहून अधिक घटनांमध्ये २५ कोटी रुपये दंड ठोठावल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सदनात दिली. पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करणाऱ्या कार्यक्रमांना हरित दर्जा आणि प्रोत्साहन देण्याची शिफारस काही सदस्यांनी केली होती. या शिफारशीचा विचार करू असं आश्वासनही मुंडे यांनी यावेळी दिलं

****

परभणी जिल्हा बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी लवकरात लवकर करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात बोलत होते. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत विधानसभा सदस्य हरिष पिंपळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महविद्यालय घाटी रुग्णालयाला एम्स दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. सदस्य विक्रम काळे यांनी यासाठी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

 

अहिल्यानगर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन जागांची निवड करण्यात आली असून लवकरच या जागांबाबतचा निर्णय अंतिम करण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.

***

हिंगोली जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी काल विधान परिषदेत दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या क्रीडा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं. महापौर समीर राजुरकर तसंच मनपा आयुक्त जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पिल्ले यांनी, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना हॉकी शिकवण्यासाठी नक्की वेळ देणार असल्याचं सांगितलं. या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, खो-खो, कबड्डी, डॉजबॉल, शंभर मीटर धावणे, रस्सीखेच, दोरीवरच्या उड्या, गोळाफेक अशा आठ खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया ९ मार्चला पार पडणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी १६ मार्चला निवडणूक होणार आहे.

****

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच बीड इथं स्थापन करण्याच्या मागणीसाठी बीड इथल्या वकिल संघानं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बीड शहरात विविध प्राधिकरणं स्थापन करण्यासह ११ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या सर्व मागण्यांचं निवेदन वकील संघानं जिल्हा प्रशासनाला सादर केलं

****

धाराशिव नगरपरिषदेचा आगामी आर्थिक वर्षांचा ३१४ कोटी २१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.

****

 

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...