Monday, 23 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.02.2026 रोजीचे सकाळी 10.45 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 February 2026

Time 10.45 to 10.50 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०२ सकाळी १०.४५-१०.५० वाजता

****

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं अभिभाषण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या सहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्र्यांनी काल आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. हे अधिवेशन चार आठवड्यांचं असेल. केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला भरीव आर्थिक मदत मिळाली असून त्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

****

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग – सीबीआयमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या विमान अपघाताशी संबंधित सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्न करेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

****

जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यातल्या नैदगाम भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. गुप्तचर विभागाकडून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्तपणे ही मोहीम राबवली. या कारवाईत दोन AK-47 रायफल्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आल्याचं सुरक्षा दलांच्या सूत्रांनी सांगितलं.

****

दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा एक कट उघडकीला आणला असून, कोलकाता आणि तामिळनाडूमध्ये एकाच वेळी केलेल्या कारवाईत आठ जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये सात बांगलादेशी नागरिक आहेत, तर एक जण पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. या कटाचा सूत्रधार बांगलादेशातून कार्यरत होता. या प्रकरणी पुढला तपास सुरु आहे.

****

संत निरंकारी मिशनच्या वतीनं ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचं आयोजन काल देशभरात विविध ठिकाणी करण्यात आलं होतं. देशातील ९३० शहरांमधल्या सोळाशे हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या अभियानाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

****

परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातल्या दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचा संकल्प जाहीर केला आहे. राज्य परिवहन महामंडळ नऊ मीटर लांबीच्या ३५ आसनी शंभर अत्याधुनिक मिनीबसेस खरेदी करत असून, त्यांचं नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असं केलं जाणार आहे. या बसमुळे अरुंद रस्ते, तीव्र चढउतार आणि वळणावळणाच्या घाट मार्गांवरही प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.

****

नागपूर इथं काल आयोजित राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराज विश्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला संत नामदेव महाराजांचे सोशावे वंशज विठ्ठल महाराज, श्रीदेवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, मुख्य संयोजक ईश्वर धिरडे उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्यासह सर्व संतांनी आपल्या वाङ्मयातून समाजाला अध्यात्मिक मूल्य दिले असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.

****

डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत सिंधुदुर्गातल्या विविध पिकांच्या चार वाणांना राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाल आहे. तेंडोली इथले शेतकरी अच्युत तेंडुलकर यांच्या जायफळाच्या दोन वाणांना, आरोस इथले शेतकरी रघुनाथ नाईक यांच्या जायफळाच्या वाणाला; तर मालवण-कुंभारमाठ इथले शेतकरी डॉक्टर उत्तम फोंडेकर यांच्या शेवग्याच्या वाणाला मानांकन मिळालं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रस्त्यांवर अनधिकृत फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा महानगर पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे. या फलकांमुळे घडणाऱ्या दुर्घटनेसंदर्भात संबंधितांवर फौजदारी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

लातूर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत विशेष मोहीम राबवली. यात विविध ठिकाणी अचानक वाहन तपासणी, संशयितांची चौकशी आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

****

लातूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला. अहमदपूर, निलंगा, औसा आणि उदगीर तालुक्यातल्या अनेक भागात पाऊस पडला असून, यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने आगामी काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...