Monday, 9 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      जिल्हा परिषद निवडणूक निकालात महायुतीची सरशी तर महाविकास आघाडीची पीछेहाट

·      भाजपच्या वंदना मगरे जालन्याच्या पहिल्या महापौर तर काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे लातूरच्या बिनविरोध महापौर

·      राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून प्रारंभ

·      व्यावहारिक अनुभवासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिकांशी संपर्क साधावा-परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधानांचा सल्ला

आणि

·      केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी मोठी तरतूद-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

****

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्हा परिषदांमध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार महायुतीतल्या घटक पक्षांची सरशी दिसून येत आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपने पावणेदोनशेहून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेचे १०९ उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही सव्वाशेपेक्षा अधिक जागांवर वर्चस्व सिद्ध केलं आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पिछेहाट झाल्याचं चित्र दिसत आहे.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजप २३ आणि शिवसेना २१ जागांवर आघाडीवर असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक, काँग्रेस पक्षाने एक जागा जिंकली आहे.

****

परभणी जिल्हा परिषदेत ५४ जागांपैकी भाजप २४, राष्ट्रवादी काँग्रेस १५ शिवसेना पाच, काँग्रेस तीन, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सहा, आणि एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे. जिल्ह्यात पंचायत समितीच्या १०८ गणांपैकी भाजप ४४, राष्ट्रवादी काँग्रेस ३५, शिवसेना सात, काँग्रेस सात, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष नऊ, तर सहा जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत.

****

लातूर जिल्हा परिषदेत ५९ जागांपैकी काँग्रेसनं सर्वाधिक २३ जागा जिंकल्या. महायुतीच्या घटकपक्षांपैकी भाजपनं १८, राष्ट्रवादी काँग्रेसनं १२ तर शिवसेनेनं एक जागा जिंकली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रत्येकी एक, तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. दरम्यान, हा विजय दिवंगत नेते अजित पवार यांना समर्पित असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली.

****

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गटांमध्ये आणि ११० पंचायत समिती गणांमध्ये महायुतीचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. भारतीय जनता पक्षानं १९, शिवसेनेनं १५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सात, राष्ट्रवादी काँग्रेसनं सहा, काँग्रेसनं तीन, समाजवादी पक्षानं एक, तर चार जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या.

****

जालन्याच्या पहिल्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या वंदना मगरे यांची निवड झाली असून उपमहापौरपदी भाजपाचे राजेश राऊत यांची निवड करण्यात आली आहे. महापौरपदी निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांनी आजच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

****

लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे स्नेहल उटगे यांनी आज बिनविरोध निवड झाली. वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

****

छत्रपती संभाजीनगरच्या महापौर तसंच उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. महायुतीकडून महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज भरला आहे, तर एमआयएमने महापौर पदासाठी अशोक हिवराळे यांना रिंगणात उतरवलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा उद्यापासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात ४४९ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. विभागातून एक लाख ९० हजार ५९२ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आहे.

या परीक्षेच्या दरम्यान राज्यभरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याकरता आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्याकरता राज्यस्तरीय दक्षता समिती नेमण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी परीक्षार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात निर्भयतेने परीक्षा देण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले -

बाईट - डॉ विनयकुमार राठोड

****

राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबवण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या समितीने राज्यभरात दौरे करत राजकीय नेत्यांसह शैक्षणिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद कार्यक्रम, जनसुनावणी घेतली. त्यानंतर समितीनं हा अहवाल सरकारला सादर केला, लवकरच हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

****

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याबद्दल, संविधानाच्या कलम ९४ क अन्वये हा ठराव मांडण्यात येणार आहे.

दरम्यान, संसदेत विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही, असा आरोप करत आजही विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ केला. या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज प्रथम दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी द्यावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

त्याआधी दोन्ही सभागृहांनी १९ वर्षांखालील पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं.

****

पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. परीक्षा पे चर्चा २०२६ च्या नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात आज त्यांनी लहान स्टार्टअप्सद्वारे उद्योजकतेचा प्रवास सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहावी, बारावीच्या परीक्षा जवळ येत असल्यानं, परीक्षेचा ताण, परीक्षेची तयारी, वेळ व्यवस्थापन यासोबतच, या परीक्षांना आत्मविश्वासानं कसं सामोरं जावं यावर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि आवड यामध्ये संतुलन राखावं, असं सांगतानाच, पंतप्रधानांनी नागरी जबाबदारीच्या महत्त्वावरही भर दिला. कचरा न टाकणं, रस्त्यावर थुंकण्याची सवय टाळणं, वाहतूक नियम पाळणं, आणि अन्नाची नासाडी टाळणं यासारख्या मूलभूत नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.

या भागात तामिळनाडुतल्या कोइम्बतूर, छत्तीसगडमधल्या रायपूर, गुजरातमधल्या देव मोगरा आणि आसाममधल्या गुवाहाटी इथले परीक्षा योद्धे सहभागी झाले होते.

****

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या अर्थसंकल्पात राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात नवीन राष्ट्रीय जलमार्ग, हायस्पीड रेल्वेसोबतच सी प्लेनसाठी तरतूद केल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ते म्हणाले-

बाईट - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

****

अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हज यात्रेकरुंसाठी तपासणीची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे.

****

जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेअंतर्गत शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी येत्या ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी ही माहिती दिली.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...