Tuesday, 10 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजुरकर यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी दीलिप स्वामी यांच्या उपस्थितीत आज ही निवडणूक झाली. यावेळी राजुरकर यांना ७०, तर एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळे यांना ३३ मतं मिळाली. त्यामुळे राजुरकर यांची महापौर पदी निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहिले.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १८ मार्चपर्यंत राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांत ही परीक्षा होणार आहे.

बीड जिल्ह्यात  ४५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारेही तपासणी केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आजही सदनाचं कामकाज बाधित झालं. आज कामकाज सुरु होताच पीठासीन अधिकारी पी.सी.मोहन यांनी कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक सहित अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. मोहन यांनी वारंवार विनंती करूनही हा गदारोळ न थांबल्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

**

दरम्यान, विरोधी पक्षांना सदनाच्या प्रतिष्ठेबद्दल काहीही आदर नाही, हे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येतं, अशी टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या महिला खासदारांनी मागच्या आठवड्यात पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन केलेला गोंधळ म्हणजे लज्जास्पद कृत्य होतं, असं ते म्हणाले. भाजपनं, विशेषत: भाजपच्या महिला खासदारांनी याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे गंभीर तक्रार नोंदवल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.

****

आज जागतिक कडधान्य दिन आहे. कडधान्याबद्दल जनजागृती करणं आणि शाश्वत कृषी अन्न प्रणालीमधली त्यांची मूलभूत भूमिका समजून घेणं, या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. या दिनाचं या वर्षीचं घोषवाक्य ‘जगातली कडधान्यं- पारंपरिक साध्या धान्यांपासून उत्कृष्ट पौष्टिकतेपर्यंत’, हे आहे.

****

राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात आपला पदभार स्वीकारला. त्याआधी त्यांनी सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तसंच चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण केलं.

****

आगामी राज्य अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या तयारीला वेग आला आहे. उद्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या आणि विभागीय आढाव्याच्या बैठका सुरू होणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यांच्या गरजा ओळखून विकासकामांना गती देण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमधली तपासणी तसंच उपचार हे २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयानुसार नि:शुल्क असल्याचा निर्वाळा राज्य सरकारने दिला आहे. या वैद्यकीय सेवेसाठी शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसारित केलं होतं. मात्र, नागरिकांच्या सनदेत अनावधानाने समाविष्ट झालेले २०१५ सालचे दर, हटवण्यात आल्याचं, सार्वजनिक आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातलं शुद्धीपत्रकही शासनाकडून जारी करण्यात आलं आहे.

****

राज्यभरात अनेक ठिकाणी उद्या पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसंच अकोला जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती १८ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होणार असल्याची माहिती नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.

बीड पोलीस दलात १७४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक असणार असून, प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी केलं आहे.

****

राज्यातल्या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे हेल्थकार्ड बनवण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. ते काल नाशिक इथं आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. आश्रमशाळेवर नियुक्त नर्सद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्यविषयक सर्व माहिती डिजिटल हेल्थकार्डमध्ये संकलित केली जाईल, असं उईके यांनी सांगितलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...