Saturday, 14 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 14 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

पुलवामा इथं २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्ष पुर्ण होत आहेत, या हल्ल्यातील हुतात्मा जवानांना देशभर अभिवादन करण्यात येत आहे.  उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा जवानांना  श्रद्धांजली वाहिली. "सुरक्षा दलांच्या जवानांचे सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मरणात सदैव जिवंत राहील. त्यांचे बलिदान प्रत्येक नागरिकाला सशक्त आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी सतत प्रेरित करत राहील." असं उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं. "हुतात्मा जवानांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा, संकल्प आणि सेवा देशवासियांच्या सामूहिक चेतनेत सदैव अमर राहील." अशा शब्दात पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहीली.

****

केंद्र सरकारच्या पी.एम. ई-बससेवा योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या ताफ्यात अत्याधुनिक आणि पूर्णपणे वातानुकूलित अशा ५० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरच्या पी.एम.ई-बस सेवा कोराडी आगार इथं आभासी पद्धतीनं या बसेसचं लोकार्पण करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील. या बसेस शहरातील एकूण ११ महत्त्वाच्या मार्गांवर चालवण्यात येणार आहेत.

****

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणासाठी नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं काल नाशिक शहरातील मिलिंदनगर झोपडपट्टीतील २७ घरं जमीनदोस्त केली, त्यात १० पक्की बांधकामं होती. या वस्तीजवळ नंदीनी नदी असून त्यावर कुंभमेळ्याच्या निमित्तानं पुल बांधण्यात येणार आहे तसंच याठिकाणी १०० फुटी रस्ता करण्याचं काम काही दिवसांत सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीनं शासकीय सेवा, योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. महाशिबिराचं उद्घघाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा परभणी पालक न्यायाधीश संदीपकुमार सी. मोरे यांच्या हस्ते होणार आहे. 

****

राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं लातूर इथं काल 'धरणे सत्याग्रह' आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध संघटनांच्या समन्वय समितीने, २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा रद्द करावा, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक भरतीवरील बंदी उठवून रिक्त पदं तातडीनं भरावीत, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय ६० वर्ष करण्यात यावं आदी मागण्यांचं सविस्तर निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

****

राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विज्ञान प्रेरणा अभियान अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमातींच्या आश्रमशाळांमधील शंभर गुणवंत विद्यार्थ्यांची, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भेटीसाठी निवड करण्यात आली आहे. १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान या विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचं आयोजन करण्या आलं असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल मुंबईत दिली.

****

अकोला जिल्ह्यातल्या मेळघाटातील ऐतिहासिक नरनाळा किल्ला, समृद्ध वनसंपदा आणि स्थानिक संस्कृती यांचं दर्शन घडवणारा नरनाळा महोत्सव उद्यापासून १७ तारखेदरम्यान साजरा होणार आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग, अकोट वन्यजीव विभाग यांच्या सहकार्यानं निसर्गप्रेमींसाठी नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नरनाळा किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व, स्थानिक संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि इको टुरिझमबाबत जनजागृती करण्याचा हेतू असून, साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच अनेकविध उपक्रम घेतले जाणार आहेत.

****

आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन सांघिक प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटानं प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकलं. तर पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटानं एक एक सुवर्णपदक पटकावलं. भारतानं या स्पर्धेत एकूण १३ सुवर्ण ११ रौप्य आणि ९ कांस्यपदकं मिळवली आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...