Wednesday, 11 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      जलसंपदा विभागाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटी रुपये कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      येत्या २३ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन-सहा मार्चला अर्थसंकल्प

·      छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर, तर नांदेडच्या महापौरपदी भाजपच्या कविता मुळे यांची निवड

·      बारावीच्या परीक्षेला प्रारंभ-कन्नड तालुक्यात सामुहिक कॉपीचा प्रकार उघड

आणि

·      हिंगोली इथं १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान विधीनाट्य महोत्सवाचं आयोजन

****

जलसंपदा विभागाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्डकडून १५ हजार कोटी रुपये दीर्घ मुदतीचं कर्ज घ्यायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. अपूर्ण असलेले हे ४० प्रकल्प आणि १०० नाले पूर्ण झाल्यावर आठ लाख एकर जमीन ओलिताखाली येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या बैठकीत झालेल्या इतर निर्णयांबाबत माहिती आमच्या प्रतिनिधीकडून..

बाईट-कॅबिनेट मिटींग

‘‘नवी मुंबई विमानतळाच्या जवळ तिसरी मुंबई उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला विविध सवलती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण करण्याला आणि त्यासाठी निधी उभारण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

सार्वजनिक – खासगी भागीदारी –पीपीपी- धोरण २०२६ या बैठकीत जाहीर करण्यात आलं.

राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवण्यात येणार आहे. जीवनशैली आणि आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन, हे या अभियानाचे चार स्तंभ असून, या अभियानातून गावपातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर सरकारचा भर असेल. या अभियानासाठी सुमारे ऐंशी लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात इंद्राणी सहकारी सूतगिरणीला शासकीय अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

जमीन महसूल अधिनियमात सुधारणा करून, ई-मेलद्वारे बजावलेली नोटीसही कायदेशीर ठरवण्याला मंत्रिमंडळाने या बैठकीत संमती दिली.

याशिवाय, राज्यस्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनातल्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याला, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या ११ पदांच्या निर्मितीला तसंच सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आणि विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.’’

 

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार असून, सहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विधीमंडळाच्या कामकाज सलागार समितीची बैठक काल मुंबईत विधानभवनात झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.

****

लोकसभेच्या कामकाजातला अडथळा काल संपला आणि अर्थसंकल्पावरची चर्चा सदनात सुरू झाली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात केली. राज्यसभेतही अर्थसंकल्पावरच्या चर्चेत शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी काल भाग घेतला.

**

लोकसभेत विरोधी पक्षांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. या नोटिसीवर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी सह्या केल्या आहेत, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मात्र या प्रस्तावावर सही केली नाही. दरम्यान, या नोटीससंदर्भात निर्णय होईपर्यंत सदनात न जाण्याचा निर्णय लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे.

****

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं सत्तावीस आरोपींविरोधात दोषारोप निश्चित केले आहेत. २०२४ साली सिद्दिकी यांची मुंबईत बांद्रा इथं तीन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी सत्तावीस जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून, कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला फरार आरोपी दर्शवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत काल ही निवडणूक झाली. यावेळी राजूरकर यांना ७०, तर एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळे यांना ३३ मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहिले. उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली.

**

नांदेड महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कविता मुळे यांचा विजय झाला. त्यांना ८१ पैकी ५० मतं मिळाली. एमआयएमच्या अश्विनी धोंगडे यांना १४ तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या महेजबीन अब्दुल फहीम यांना १५ मतं मिळाली. उपमहापौर पदी भाजपचे दीपकसिंह रावत हे विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेनेच्या चार नगरसेवकांसह एका अपक्ष उमेदवारानंही भाजपाला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले.

**

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र आले आहेत. महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर, तर उपमहापौरपदी ठाकरे गटाचे प्रशांत दानव विजयी झाले. ६६ सदस्य असलेल्या या महापालिकेत काँग्रेसनं सर्वाधिक २७, भाजपनं २३, तर ठाकरे गटानं सहा जागा जिंकल्या. महापौरपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले, तर एमआयएमचे एक नगरसेवक तटस्थ राहिले.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १८ मार्चपर्यंत राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांत परीक्षा होणार आहे. विभागात या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

बाईट-१२ वी परीक्षा

 

‘‘छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ४५४ परीक्षा केंद्रावर, एक लाख ९० हजार ५९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व केंद्रांवर भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात ४५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारेही तपासणी केली जात आहे.

लातूर जिल्ह्यात १०१ केद्रांवर ही परीक्षा होत असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन अधिकाऱ्यांचं बैठं पथक तैनात करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेत या परीक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सगळ्या बैठ्या पथकांचा आढावा घेतला.

परभणी जिल्हयात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशासनासह शिक्षण आणि पोलीस विभागानं आवश्यक त्या उपयोजना केल्या आहेत. परीक्षा कक्षात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातल्या परीक्षा केंद्रांना भेट देऊन आवश्यक त्या सूचना केल्या.’’

 

हिंगोली जिल्ह्यात ४० परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू झाल्या असून, १५ हजार १३६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. प्रत्येक केंद्रावर बैठं पथक तसंच जिल्हाभरात चार भरारी पथकं नियुक्त करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या जैतापूर इथल्या राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्हीच्या पाहणीत हे विद्यार्थी कॉपी करताना दिसले. या प्रकरणी केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकासह इतर संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या केंद्रावरचे कर्मचारी तातडीने बदलण्यात आले असून, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निर्णय शिक्षण मंडळ घेईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना २०२४-२५ या वर्षाचा ‘ऊर्जा संवर्धन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. लातूर जिल्ह्याला गेल्या तीन वर्षांत मिळालेला हा आठवा राष्ट्रीय तथा राज्य स्तरावरील पुरस्कार ठरला आहे.

****

हिंगोली इथं १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विधीनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित या महोत्सवात संबळ-हलगी जुगलबंदी, वासुदेव, गोंधळ, पोतराज, आराधी, दिमडी-चोंडक जुगलबंदी, जागरण गोंधळ, भारुड, वाघ्या-मुरळी, कथाकथन, गजनृत्य अशा विविध लोककलांचं सादरीकरण करण्यात येणार आहे.

****

धाराशिव इथले माजी नगरसेवक श्रीकांत अनंतराव कुलकर्णी अंबेजवळगेकर यांचं काल राहत्या घरी निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. धाराशिव नगरपालिकेत ते १९६७ आणि १९७४ असे दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात डागपिंपळगाव इथले स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण उघडे यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उघडे यांचं परवा निधन झालं, ते १०२ वर्षांचे होते.

****

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल नेदरलँडने नामिबियाचा, न्यूझीलंडने युएईचातर पाकिस्तानने अमेरिकेचा पराभव केला. या स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया-आयर्लंड, आणि मुंबईत इंग्लंड-वेस्ट इंडिज सामना होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...