Sunday, 8 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

दहशतवादावर भारताची भूमिका स्पष्ट असून, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुआलालंपुर इथं मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी त्यांनी हे भाष्य केलं. या चर्चेत संरक्षण, सुरक्षा आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. दहशतवादाविरुद्ध लढा, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

या ऐतिहासिक दौऱ्यात भारत आणि मलेशिया यांच्यात सेमीकंडक्टर विकास, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि डिजिटल अर्थव्यवस्था यांसह अनेक महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विशेषतः ऑडिओ-व्हिज्युअल करारामुळे तमिळ चित्रपट आणि संगीताच्या देवाणघेवाणीला चालना मिळणार आहे. भारत आणि मलेशिया हे हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी एकत्र काम करतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधानांनी क्वाललंपूर इथं आझाद हिंद फौज सेनेच्या माजी सैनिकांची भेट घेतली. ही भेट भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदर दर्शवते आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना अधोरेखित करते असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळानं येत्या एक एप्रिल पासून लागू होत असलेल्या आयकर आधिनियम-२०२५ संबंधित प्रस्तावित आयकर नियम आणि विविध अर्ज यांबाबत सूचक अभिप्राय देण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे. यानुसार, संबंधित भाषा सोपी करणं, दाव्यांची संख्या कमी करणं, संबंधित पुर्तताविषयक प्रक्रीया कमी करणं आणि अप्रचलित नियम- अर्ज शोधणं यांबाबत सूचना नागरिकांना करता येणार आहे. संबंधित मजकूर  इन्कम  टॅक्स ऑफ इंडिया डॉट जीओव्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

मुंबई इथं बनावट कागदपत्रांद्वारे अवैधरित्या राहणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या मालाड परिसरातून पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनंतर दहशतवादविरोधी कक्षाने ही कारवाई केली, या चौघांचं बांग्लादेशात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.

****

धाराशिव इथं कर्करोगाच्या जनजागृतीसाठी साडी वॉकॅथॉनचं आज सकाळी  आयोजन करण्यात आलं. यात शहराच्या सर्वच प्रमुख मार्गांवरुन साडी परिधान करुन महिलांनी कर्करोगाबाबत जनजागृतीचे फलक हातात घेऊन पायी टप्पा पूर्ण केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरात विविध क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान महिलांना धाराशिव नारीशक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच कर्करोग पथनाट्याचही सादरीकरण झालं.

****

संत श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रगट दिन सोहळा आज साजरा होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी असलेल्या संत नगरी शेगाव इथं विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. सकाळपासूनच शेकडो दिंड्या हरी नामाच्या गजरात शेगावात दाखल झाल्या असून राज्य भरातून भक्तगण संत गजानन महाराज समाधी दर्शनासाठी येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथल्या गजानन महाराज मंदीरातही सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असून याठिकाणी प्रसादाचं वाटपही सुरु आहे.

****

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. दरम्यान, काल सांगली जिल्हा परिषदेच्या ६१ गट आणि पंचायत समितीच्या १२२ गणांसाठी शांततेत मतदान पार पडलं. जिल्ह्यात सरासरी ६९ पुर्णांक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीत पलूस तालुक्यात सर्वाधिक ७५ पुर्णांक ७५ टक्के मतदान झालं.

****

टी- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत चेन्नई इथं सुरु झालेल्या अफगाणिस्तान –न्युझीलंड दरम्यानच्या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६ बाद १८२ धावा केल्या असून न्युझीलंडसमोर १८३ धावांचं आव्हान ठेवलं आहे.  या स्पर्धेत आज दुपारी तीन वाजता इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात तर श्रीलंका आणि आयर्लंड या संघादरम्यानचा सामना सायंकाळी सात वाजता खेळवला जाणार आहे.

****

दक्षिण एशियाई फुटबॉल महासंघाच्या १९ वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेचं अजिंक्यपद भारतानं पटकावलं आहे. नेपाळला चार-शुन्य असं पराभूत करत भारतानं हा किताब पटकावला.

****

दिल्लीत आयोजित आशिया रायफल -पिस्तुल अजिंक्यपद स्पर्धेच्या काल चौथ्या दिवशी भारतानं दहा सुवर्णपदकं जिंकली, यासह भारताच्या पदकांची संख्या ४३ वर पोहचली आहे.

****

राज्यभरात येत्या २४ तासांत हवामान कोरडं असणार आहे, हवामान विभागानं ही माहीत दिली आहे.

****

बीसीसीआय अर्थात भारत क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील भारतीय पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला साडेसात कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. भारताने सहाव्यांदा हा विश्वचषक पटकावला आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...