Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली देशाच्या अद्भुत क्षमतेची जगाला प्रचिती–
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं मन की बातमध्ये प्रतिपादन
· शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वाटचाल करत असल्याबद्दल
पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
· विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावर
बहिष्कार.
आणि
· टीट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात
सामना
****
नवी दिल्लीत नुकतीच झालेली भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषद ही
जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला जाईल हे दर्शवणारा असल्याचं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवरील
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हा
या कार्यक्रमाचा १३१ वा भाग होता. या परिषदेत प्राण्यांवर उपचार आणि देखरेखीसाठीचं
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरण तसंच आपले प्राचीन ग्रंथ, प्राचीन ज्ञान, आपली हस्तलिखितांच्या जतनासंदर्भातलं
ॲप्लिकेशन,
या भारताच्या दोन उत्पादनांनी जगभरातील नेत्यांना प्रभावित
केल्याचं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील अद्भुत क्षमता पाहायला मिळाली असल्याचं पंतप्रधान
म्हणाले.
परदेशातील भारतीय नागरिक सुद्धा देशाच्या विकासात हातभार
लावत असल्याचं सांगत सध्या सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
सहभागी विविध देशांच्या संघातील भारतीय खेळाडूंचं उदाहरण मोदी यांनी दिलं. कॅनडा, ओमान,
अमेरिका, न्युझीलंड, इटली या देशांकडून खेळणारे भारतीय वंशाचे खेळाडू मनापासून त्या देशांचं
प्रतिनिधीत्व करत असताना आनंद होत असल्याचं सांगत पंतप्रधान म्हणाले…
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
राष्ट्रपती भवन इथं उद्या राजाजी उत्सवा दरम्यान सी.
राजगोपालाचारी यांच्या प्रतिमेचं अनावरण होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी
यावेळी दिली. ब्रिटीश वास्तुविशारद एडविन यांच्या प्रतिमेऐवजी राजाजींची प्रतिमा
तिथे लावली जाईल असं त्यांनी सांगितलं.
देशात अवयवदानाविषयीची जागरूकता सातत्यानं वाढत असल्याचं
सांगत केरळमध्ये अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी
अवयवदानाचा निर्णय घेतल्याच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला.
ऑनलाईन फसवणुकीबद्दल देशात जागरूकता वाढली असली, तरी आजही अशी प्रकरणं घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत सगळ्यांनी सतर्क
राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. यादृष्टीनंच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं पार
पडलेल्या आर्थिक साक्षरता सप्ताहाची माहितीही त्यांनी दिली.
देशातला शेतकरी पारंपरिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून
वाटचाल करत असल्याचं सांगत याबाबतची
यशस्वी प्रयोगांची उदाहरणंही त्यांनी दिली. आगामी रमजान ईद आणि होळी सणानिमित्त
पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
उत्तर प्रदेशात नमो भारत ट्रेन आणि मीरत मेट्रो सेवेला आज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पंतप्रधानांनी शताब्दीनगर
रेल्वे स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. यावेळी त्यांनी
विकसीत भारताचं स्वप्न साकारताना शहरांचाही विकास होत असल्याचं सांगितलं ते
म्हणाले….
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
****
राज्यात सत्ताधारी पक्ष बहुमताच्या मस्तीत असून लोकशाही आणि
संविधानाचा कोणताही सन्मान राखला जात नसल्यानं या सरकारच्या आज संध्याकाळच्या
चहापानावर आपण बहिष्कार टाकल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. मुंबईत राज्य
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्याच्या
पुर्वसंध्येला पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्यासह आदित्य ठाकरे आणि सतेज पाटील यांनी
माध्यमांशी बोलताना यासंदर्भातली माहिती दिली. आपणा सर्वांना चहापानासाठी
वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे. परंतु, आपण त्या पत्रांवरून त्यांच्या चहापानाला जाणार नाहीत. जिथं मान सन्मान नाही
अशा ठिकाणी आपण चहापानाला जाणार नसल्याचं जाधव यांनी यावेळी सांगितलं. तसंच
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात, अशी ठाम शंका संपूर्ण राज्याच्या मनात आहे. सरकार यावर कुठंही स्पष्ट नाही.
त्यामुळं राज्याच्या एका जबाबदार नेत्याचा घात की अपघात, अशाप्रकारची
जेव्हा चर्चा असते, त्यामुळं आपण चहापानाला जायचं नाही, असा निर्णय घेतल्याचं भास्कर जाधव म्हणाले.
****
चेन्नई इथं गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या
महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या गटातील एका विद्यार्थीनीचा काल समुद्रात बुडून
मृत्यू झाला असून अन्य एकाचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत आणि बचाव
कार्यावर देखरेख ठेवून असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यातल्या
२६ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा
जिल्ह्यातल्या मयुरी चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. तर विद्यार्थी जय पाटील याचा शोध
युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुःखद घटनेबद्दल चौधरी कुटुंबीयांप्रती
तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. तामिळनाडू सरकारनं शोध आणि बचाव
कार्य अधिकगतीनं राबवून सर्वतोपरी मदत करावी, अशी
विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या
सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचं मुख्यमंत्री
कार्यालयातर्फे नमुद करण्यात आलं आहे.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठ फेरीत आज
भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. सायंकाळी सात वाजता अहमदाबादच्या नरेंद्र
मोदी क्रीडा संकुलावर सामना सुरू होईल. सुपर आठ फेरीत पहिल्या गटात भारतासह
जिम्बाब्वे,
वेस्ट इंडीज आणि दक्षिण अफ्रीका तर, दूसऱ्या
गटात पाकिस्तान,
श्रीलंका, इंग्लैंड आणि न्यूजीलंडचा समावेश असून प्रत्येक संघ आपल्या गटात तीन सामने खेळत आहे. दरम्यान, श्रीलंकेत सुरू असलेला सुपर
एट गटातील अन्य एका सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेसमोर १४७ धावांचं लक्ष्य ठेवलं
आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या आठ गडी बाद ८७ धावा झाल्या होत्या.
****
राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवीसाठी घेण्यात येणारी
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीसाठीच्या पूर्व माध्यमिक
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ५३ हजार १०५
विद्यार्थ्यांनी नोदणी केली होती. यात पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १८८
केंद्रांमध्ये ३१ हजार ५९३ विद्यार्थी तर इयत्ता आठवीसाठी १४३ केंद्रांत २१ हजार
५१२ विद्यार्थ्यांची परीक्षा आज घेण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांवर अनधिकृत फलक
लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा महानगर पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत
यांनी दिला आहे. या फलकांमुळं घडणाऱ्या दुर्घटने संदर्भात संबंधितांवर फौजदारी आणि
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही श्रीकांत यांनी यावेळी दिला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र
विभागातील प्राध्यापक बापू शिंगटे यांना नुकतंच मुंबईत मराठी विज्ञान परिषदेच्या
अखिल भारतीय अधिवेशनात प्राध्यापक मनमोहन शर्मा विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कारानं
गौरवण्यात आलं. सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
प्राध्यापक मनमोहन शर्मा, मराठी विज्ञान परिषदेचे
अध्यक्ष प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी आणि अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. आशिष लेले यांच्या
हस्ते शिंगटे यांना रसायनशास्त्रातील संशोधन कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
****
परभणी इथं खगोलशास्त्रीय संस्थेतर्फे ‘विज्ञान वारी भाग
तिसरा’ उपक्रम आज घेण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातल्या
या उपक्रमामध्ये उपप्राचार्य पांडुरंग निळे यांनी विद्यार्थ्यांना संशोधन
क्षेत्रातल्या संधींबाबत मार्गदर्शन केलं.
****
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज नागपूर इथं संत
नामदेव महाराज विश्व पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय
एकात्मता विश्व महासंमेलनात गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी
परराज्यातील चार आरोपींना आज अटक केली. त्यांच्याकडून एका गावठी पिस्तूललासह काही
मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान दोन आरोपी पळून गेले असून ते मध्य
प्रदेशातील सहजापूर जिल्ह्यातले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अहिल्यानगर इथं आज श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या
३५० व्या हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सायकल फेरी
काढण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या फेरीला हिरवा झेंडा
दाखवून रवाना केलं.
****
No comments:
Post a Comment