Wednesday, 25 February 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राष्ट्रपतींचं यावेळी स्वागत केलं. इथून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल आचार्य देवव्रत भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं बुलडाणा जिल्ह्यातील शेगावकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

शेगाव इथं पोहोचल्यानंतर राष्ट्रपतींनी संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. शेगाव इथं राष्ट्रपतींच्या हस्ते आरोग्य मेळ्याचं उद्घाटन करण्यात येत आहे. या चार दिवसीय आरोग्य मेळ्यात आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींतर्गत नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला, तपासण्या आणि औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. औषधी वनस्पतींची लागवड आणि कृषी वनीकरणाच्या माध्यमातून आयुष पद्धतींबाबत जनजागृती करणे, सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवणे आणि शेतकऱ्यांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या मेळ्याचा उद्देश आहे. संध्याकाळी राष्ट्रपती नागपूर इथं ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

****

रोजगार हमी योजनेतील कोणत्याही रोजगार सेवकाला कामावरून कमी केले जाणार नाही, असं मंत्री भरत गोगावले यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. मागणीनुसार काम देण्याचं धोरण कायम राहील आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, असं गोगावले म्हणाले. तसंच केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून ही योजना अधिक सक्षमपणे राबवली जाईल. सर्व मजुरांचे पैसे देखील दिले जातील, असं आश्वासन मंत्र्यांनी सभागृहात दिलं. दरम्यान, रोजगार हमी योजना आणि घरकुल योजना यासंदर्भातील निधीसंदर्भात मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच यासंदर्भात पाठपुरावा करुन अधिवेशन काळात माहिती सभागृहासमोर ठेवण्याची सूचना केली.

बाईट - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

****

राज्य परिवहन महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा थकीत वेतनवाढीचा हप्ता देण्यात आला आहे. महामंडळानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे २१० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे एस टी महामंडळानं सांगितलं आहे.

****

सर्वोच्च न्यायालयानं इयत्ता ८ वीच्या NCERT च्या पाठ्यपुस्तकात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या उल्लेखाबाबत स्वतःहून दखल घेत, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. मुख्य न्यायमूर्ती सरन्यायाधीश सुर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं या प्रकरणाची नोंद घेतली. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात नमूद केलं की, इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराबाबत शिकवले जात आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. संबंधित मजकूर संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती बागची यांनी नोंदवलं. सरन्यायाधीशांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. सामाजिक शास्त्राच्या एनसीईआरटी पाठ्यपुस्तकात न्यायव्यवस्थेसमोर भ्रष्टाचार, प्रलंबित खटल्यांचा मोठा भार आणि न्यायाधीशांची कमतरता ही प्रमुख आव्हानं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

****

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आरेखनामुळे जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणी ऑब्जर्व्हेटरीच्या अँटेनाला व्यत्यय येत असल्यामुळे केंद्र सरकारनं या मूळ मार्गाला आक्षेप घेतला असून सध्या हा विषय तिथंच थांबला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळात दिली. या प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलून तो शिर्डीमार्गे नेण्यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. मूळ मार्गात असलेली ऑब्जर्व्हेटरी ही ३२ देशांची असल्यानं ती हलवता येणार नाही, किंवा तिच्या नियमावलीत बदल करता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकारची भूमिकाही आधीच्या मार्गाला अनुकूल असून यातून मार्ग काढण्यासाठी हा मार्ग कमीत कमी बदलावा लागेल या दृष्टीने तज्ज्ञांची नियुक्ती करून त्यांच्याकडून पर्यायी आखणी करून घेऊ आणि त्यानुसार काम करू, जेणेकरून या मार्गातून सुटलेला भाग आणि गावंही याच्याशी जोडली जाऊ शकतील, असं आश्वासन त्यांनी दिलं.

****

मराठीचे व्याकरणकार, भाषांतरकार आणि मराठी विरामचिन्हाचे आद्य प्रणेते मेजर थॉमस कँडी यांच्या दीडशेव्या स्मृतीदिनाच्या निमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं उद्या सांयकाळी मराठी विरामचिन्हे दिवस साजरा करण्यात येणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...