Sunday, 15 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 15 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ फेब्रुवारी २०२ सकाळी.०० वाजता

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हर्बालाइफ कंपनी आणि 'फार्मर्स फॉर फॉरेस्ट' संस्था यांच्यात ३०५ एकरांवर फळबाग आणि देशी वृक्षलागवडीसाठी दीड कोटी रुपयांचा करार झाला आहे. बीड आणि पुणे जिल्ह्यांत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. जैवविविधतेचे क्षेत्र वाढविणे आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्न देणारी फळबाग आणि वृक्षलागवड करण्यास प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. हा उपक्रम मातीची सुपीकता वाढविणे, कार्बन शोषण क्षमता वाढविणे तसेच स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करण्यास उपयुक्त ठरणार आहे. फळ उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच याआधारे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा पर्यायी स्रोत उपलब्ध होणार आहे. 

****

भारतीय रेल्वेतर्फे, देशांतर्गत लांब पल्ल्यांत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आता प्रत्येक दीड तासांनी स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. नवी दिल्लीत रेल्वे सुधारणांबाबत आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सफाईसाठी नियुक्त विशेष आस्थापनेचे कर्मचारी शौचालयं, कचऱ्याचे डबे आणि आसनकक्षांची लक्षपूर्वक स्वच्छता करतील. आतापर्यंत, बिछाने तसंच स्वच्छतेचं काम वेगवेगळ्या कंपन्यांना दिलं जात होतं, मात्र आता ते एकाच कंपनीला दिलं जाईल, जेणेकरून जबाबदारी निश्चित करून कार्यक्षमता वाढवता येईल, असंही वैष्णव म्हणाले. तसंच, रेल्वेच्या सामान्य श्रेणीतल्या डब्यांची सफाईसुध्दा प्रथम श्रेणीच्या डाब्यांप्रमाणेच केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव आज देशभरात भक्तीभावात  साजरा होत आहे. भगवान शिवशंकर आणि महादेवी पार्वती यांच्या विवाहाची आख्यायिका असलेल्या या उत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवभक्त आज दिवसभर उपवास करुन महादेवाची आराधना करतात. देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणांसह प्रमुख पुरातन शिव मंदीरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक-महापूजा करण्यात येत असून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

मराठवाड्यात परळी-वैजनाथ, औंढा-नागनाथ तर वेरुळच्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी रांगा लागल्या होत्या. औंढा नागनाथसह गोंदिया नजिक अडीचशे वर्षांहून जास्त प्राचीन अशा नागराधाम पंचमुखी शिव लिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवळं आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या खडकेश्वरच्या महादेव मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सिडको एन-वन परिसरातल्या नर्मदेश्वर मंदिरात आज संध्याकाळी भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लातूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री निमित्त यात्रा आजपासून सुरु झाली. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित पहिल्या वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलनाचा आज समारोप होत आहे. संमेलनात आज सिनेदिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या प्रकट मुलाखतीसह विविध कार्यक्रम होणार आहेत.

****

पुरुषांच्या टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बहुचर्चित भारत-पाकिस्तान  लढत होणार आहे. श्रीलंकेत कोलंबो इथं सायंकाळी सात वाजता सामना सुरू होईल.  यासह स्पर्धेत आज मुंबई इथं वेस्ट इंडीज- नेपाळ सामना नुकताच सुरु झाला आहे.तर,दुपारी तीन वाजता अमेरिका - नामिबिया सामना चेन्नई इथं खेळला जाईल.

दरम्यान,महिला क्रिकेटमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला प्रारंभ होत आहे. आज पहिला सामना सिडनी इथं थोड्याच वेळात पावणे तीन वाजता सुरु होत आहे.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल शासकीय योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिर पार पडलं. शासकीय योजना एकाच छताखाली वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हा मेळावा घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कपिलधार इथं सुरू असलेल्या ‘आपदा मित्र–सखी’ प्रशिक्षण शिबीराचा आज समारोप होत आहे. गेल्या ११ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या शिबीरात प्रथमोपचार, हृदय सक्रीयतेसाठीचं सी.पी.आर. तंत्र, पूरस्थितीतलं बचावकार्य, बचावनौकेचा वापर आणि आपत्तीच्या वेळी नागरिकांचं स्थलांतर आदीबाबत प्रशिक्षण देण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दशसूत्री उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी बुक बँक संकल्पना राबवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

****

वाशीमच्या  शासकीय वैद्यकीय रुग्णालय-महाविद्यालयाचं नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम असं करण्यात आलं आहे. राज्य शासनानं याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी केला. वाशिम इथं शंभर विद्यार्थी क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न ४३० खाटांचं रुग्णालय सुरू करण्यासाठी याआधीच मान्यता मिळालेली आहे. ग्रामीण- आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका असणार आहे.

शासन निर्णयात संत सेवालाल महाराज यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करतांनाच त्यांच्या विचारांमुळे समाजात जागृती आणि सदाचाराला चालना मिळाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...