Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 05 February 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात भारताचं हित साधण्यात
यश आल्याचं सरकारचं प्रतिपादन
·
अत्यल्प भूधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार
प्रयत्नशील; मात्र समृद्ध शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेऊ नये-महसूलमंत्र्यांचं आवाहन
·
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या सुमारे तीस तासांपासून
वाहतुक कोंडी
·
सहाव्या उमरी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.
पी. विठ्ठल यांची निवड
आणि
·
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानला
हरवत भारत अंतिम फेरीत दाखल
****
भारत -
अमेरिका व्यापार कराराबाबत उद्योग आणि वाणिज्य
मंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत निवेदन दिलं. या करारात भारताला आपल्या महत्त्वाच्या
क्षेत्रांचं हित साधण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी, दुग्धव्यवसाय
या क्षेत्रांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, सूक्ष्म,
लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं गोयल यांनी
नमूद केलं. ते म्हणाले…
बाईट- उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल
गोयल यांचं
हे निवेदन सुरू असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच
त्यांनी आपलं निवेदन पूर्ण केलं.
त्यापूर्वी
सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास
पुकारला. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत घोषणाबाजी
सुरू केली. सदनाची प्रतिमा कायम राखण्याचं आवाहन अध्यक्षांनी केलं. ते म्हणाले,
बाईट- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
वारंवारच्या
व्यत्ययानंतर सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर राष्ट्रपती अभिभाषणावरच्या
आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. भाजपा खासदार निशीकांत दुबे यांनी काँग्रेसच्या
दिवंगत नेत्यांबाबतच्या विविध पुस्तकांचा दाखला देत टीका केली. पीठासीन अधिकाऱ्यांनी
त्यांना पुस्तकांचा दाखल न देण्याविषयी सांगितलं, मात्र त्यांनी भाषण
सुरूच ठेवलं, यामुळे विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे सभागृहाचं
कामकाज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
राज्यसभेत
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर काल पुन्हा चर्चा सुरू झाली. केंद्रीय
मंत्री आणि सभागृह नेते जेपी नड्डा यांनी, राष्ट्रपतींचं हे अभिभाषण देशाच्या विकासगाथेचं
प्रतिबिंब असल्याचं सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख
अर्थव्यवस्था झाल्याचं, त्यांनी नमूद केलं.
माजी पंतप्रधान
एच डी देवेगौडा यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेने केलेली लक्षणीय प्रगतीचा
उल्लेख करत, सरकारचं अभिनंदन केलं.
****
परीक्षा
पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम उद्या
शुक्रवारी सकाळी १० वाजता प्रसारित होणार आहे. तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचं
महत्त्व तसंच मनाची शांतता, आत्मविश्वास वाढवणं आणि आव्हानांवर मात करणं यासाठीचे उपाय याविषयी
पंतप्रधान या कार्यक्रमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी
संवाद साधतात.
****
रिझर्व्ह
बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक कालपासून सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा
यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांची पत आणि वित्त धोरण समिती उद्या द्वैमासिक आढावा
जाहीर करेल.
****
अत्यल्प
भूधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, समृद्ध शेतकऱ्यांनी
कर्जमाफीचा लाभ घेऊ नये, असं आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी केलं. ते काल लातूर इथं बातमीदारांशी बोलत होते. शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी
प्रवीण परदेशी समिती काम करत असून, त्यांचा अहवाल लवकरच येईल,
असं त्यांनी सांगितलं. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे
कायापालट होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याच्या
मागणीचा विचार करत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. ते काल हरिद्वार इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल
मिटकरी यांनी यासंदर्भात मागणी केली होती.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच केली जाईल, असं प्रदेशाध्यक्ष
सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही
ते म्हणाले. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भाजपाशी चर्चा आवश्यक असल्याचा पुनरुच्चार तटकरे
यांनी केला.
****
मुंबई–पुणे
द्रुतगती मार्गावर गेल्या सुमारे तीस तासांपासूनची वाहतुक कोंडी सुटायला सुरुवात झाली
आहे. या मार्गावरच्या आडोशी बोगद्याजवळ परवा संध्याकाळी ज्वलनशील वायू वाहतूक करणारा
टँकर उलटल्याने वाहतुक ठप्प झाली. सध्या मुंबईच्या दिशेने एक मार्गिका सुरु असून, धीम्या गतीने
वाहतूक सुरू आहे. रस्त्यावर रसायन सांडल्यामुळे, रस्ता पूर्णपणे
स्वच्छ करूनच वाहतूक सुरळीत केली जाईल. अडकलेल्या प्रवाशांना पोलिसांकडून अन्नपाणी
वाटप करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक
आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, तसंच महामार्गावर
होणारी पथकर वसुली थांबवण्याचे आदेशही दिले आहेत.
****
अहिल्यानगर
जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यात सौंदाणे नावाचं गाव आपल्या अनोख्या निर्णयांमुळे आणि
त्या निर्णयांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे वेगळं ठरत आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या
प्रतिनिधीकडून…
बाईट- मनोज सात्पुते (अहिल्यानगर)
****
नांदेड
जिल्ह्याच्या उमरी तालुक्यात श्री क्षेत्र गोरटे इथल्या सहाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. पी. विठ्ठल यांची निवड झाली आहे. मराठी भाषा गौरव दिनाचं
औचित्य साधून या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं. गोरठे इथं अशोक भाऊराव फुलारी
यांच्या शिवारातील "काशिवन" या समाधी परिसरात आयोजित या साहित्य संमेलनात
कथाकथन, कवीसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
****
जालना महानगरपालिकेच्या
महापौर पदासाठी दहा तर उपमहापौर पदासाठी आठ नामनिर्देशपत्र काल वितरित करण्यात आले.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या नऊ फेब्रुवारीला महापालिकेच्या सभागृहात निवडणूक
प्रक्रिया होणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर महापौर तसंच उपमहापौर पदासाठी अर्जवाटप कालपासून सुरू झालं. काल या दोन्ही
पदांसाठी प्रत्येकी एका अर्जाची विक्री झाली. येत्या १० तारखेला ही निवडणूक होणार आहे.
नांदेड
महापालिकेतही महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक १० तारखेला होणार आहे. या दोन्ही पदासाठी
आज अर्ज वितरित केले जातील, तर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करता
येणार आहे.
****
१९ वर्षाखालील
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा पराभव करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली.
काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव
केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत, चार बाद ३१० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल
खेळतांना भारताने ४२ व्या षटकांत तीन गड्यांच्या बदल्यात हे आव्हान पार केलं. ११५ धावा
करणारा आरन जॉर्ज सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत उद्या भारत आणि इंग्लंड
यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
****
जागतिक
क्रिकेटची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने क्रिकेटच्या ७३ नियमांमध्ये
बदल केले आहेत. या बदलांमध्ये कनिष्ठ गटासाठी आणि महिला खेळाडूंसाठी चेंडूचा आकार वेगवेगळा
असणं, लॅमिनेटेड बॅटना परवानगी, अपूर्ण धावेसाठी
दंडात्मक कारवाई, आदी नियमांचा समावेश आहे. त्याखेरीज नो बॉल,
हिटविकेट, ओव्हर थ्रो यांमधल्या नियमांमध्येही
बदल करण्यात आले आहेत. यातले अनेक नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीने आधीच
स्वीकारले आहेत.
****
नवी दिल्लीत
सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं ४ सुवर्ण पदकांसह १ रौप्य
आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. पुरुष तसंच महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात
सांघिक तसंच वैयक्तिक गटात भारताने प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावलं.
****
No comments:
Post a Comment