Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
वास्तविक जगातल्या प्रणाली कशा कार्य करतात हे समजून घेण्यासाठी
आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योग
क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
दिला. परीक्षा पे चर्चा २०२६ च्या नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात आज त्यांनी देशभरातल्या
विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना लहान स्टार्टअप्सद्वारे
आपला उद्योजकतेचा प्रवास सुरू करण्यास प्रोत्साहित केलं. ते म्हणाले -
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि सर्जनशील आवडीनिवडींना वेगळे
किंवा परस्परविरोधी मार्ग मानू नये, असं पंतप्रधानांनी, अभ्यास आणि आवड यामध्ये संतुलन राखण्याबद्दल बोलताना सांगितलं.
कला आणि सर्जनशील छंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक दबावामुळे निर्माण होणारा ताण आणि थकवा
कमी करण्यास मदत करू शकतात, असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधानांनी नागरी जबाबदारीच्या महत्त्वावरही भर दिला, आणि विद्यार्थ्यांना कचरा न टाकणं, रस्त्यावर थुंकणे टाळणं, वाहतूक नियमांचं पालन करणं आणि अन्नाची नासाडी टाळणं यासारख्या
मूलभूत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. शिस्तबद्ध दैनंदिन वर्तन राष्ट्र उभारणीत
महत्त्वाची भूमिका बजावते, असं ते म्हणाले.
शिस्त आणि प्रेरणा दोन्हींचं महत्व आवश्यक असल्याचं सांगून
पंतप्रधानांनी, शिस्तीशिवाय केवळ प्रेरणा निरुपयोगी
असल्याचं नमूद केलं. तंत्रज्ञानाला घाबरण्याची गरज नाही आणि त्याऐवजी विद्यार्थ्यांनी
तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता त्याचा शहाणपणाने वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
या भागात तामिळनाडुतल्या कोइम्बतूर, छत्तीसगडमधल्या रायपूर, गुजरातमधल्या देव मोगरा आणि आसाममधल्या गुवाहाटी इथले परीक्षा
योद्धे सहभागी झाले होते.
****
राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांसाठीच्या
मतदानाची आज मोजणी होत आहे. मतमोजणीसाठी राज्य निवडणूक आयोगानं सुरक्षेसह सर्व व्यवस्था
केली आहे.
काही ठिकाणचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.
लातूर जिल्हा परिषदेतल्या ५९ गटांमधून आतापर्यंत काँग्रेसनं
सहा, भाजपनं पाच, राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसंच अपक्ष उमेदवारानं प्रत्येकी एक जागा जिंकली.
लातूर तालुक्यातल्या आर्वी गटातून काँग्रेसच्या राजश्री
देशमुख, महाराणा प्रताप नगर गटातून काँग्रेसचे
महादेव मस्के, पाखर सांगवी गटातून काँग्रेसच्या
सोनाली थोरमोठे तर भातांगळी गटातून भाजपचे पांडुरंग बालवाड विजयी झाले. तर दोन्ही पंचायत
समिती काँग्रेसच्या ताब्यात गेल्या. अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी इथल्या गटातून भाजपच्या
रेखा हाके, हाडोळती गटातून भाजपचे अजिंक्य देशमुख, निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा गटातून भाजपचे चंद्रकांत
हरे, तर जळकोट तालुक्यातल्या माळहिप्परगा
गटातून काँग्रेसच्या नागेश्वरी केंद्रे विजयी झाल्या.
रेणापूर तालुक्यातल्या पानगाव गटातून महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे डॉक्टर सुनील नागरगोजे तर पंचायत समितीच्या गणातून मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी
आणि श्रीदेवी गालफाडे विजयी झाल्या.
****
धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गटांमधून भाजप सात, शिवसेना सहा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी चार, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या एरंडेश्वर गटात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रितेश काळे आघाडीवर आहेत. टाकळी आणि पिंगळी
या दोन्ही गटातून शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांमध्ये
आठव्या फेरी अखेर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात भाजप चार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीन, एमआयएम तीन तर कॉग्रेस पक्षाचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत.
****
लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री
सोनकांबळे, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे स्नेहल
उटगे यांची आज बिनविरोध निवड झाली. वंचित बहुजन
आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या राष्ट्रीय पात्रता आणि
प्रवेश परीक्षा – नीट यूजी २०२६ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना आठ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
आहे. ही परीक्षा तीन मे रोजी होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय
पातळीवरील ही एकमेव प्रवेश परीक्षा असून ही १३ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.
****
जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेअंतर्गत
शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी येत्या ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात
येणार आहे.
****
No comments:
Post a Comment