Saturday, 21 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रीय बांबू महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. नागपूर इथं येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचं आज सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महोत्सवातल्या “बॅम्बू बीट्स अँड बिर्याणी” या उद्घाटन सोहळ्यात बांबू ऑर्केस्ट्रा आणि बांबू फूड शो सादर केला जाणार आहे. या महोत्सवात बांबू बांधकाम, उत्पादन डिझाईन, दागिने निर्मिती अशा विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच शाश्वत बांबू शेती, कार्बन ऑफसेट आणि पाच दिवसांचा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमही होणार आहे. या महोत्सवात २५ तारखेला शेतभेट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून बांबू शेतीचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे.

****

एआयच्या मदतीनं तयार होणाऱ्या डिजिटल सामग्रीबाबत केंद्र सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वं लागू केली आहेत. गेल्या १० फेब्रुवारीला अधिसूचना जारी झाल्यानंतर हे नियम कालपासून अमलात आले. आता एखादं छायाचित्र, दृश्यफीत किंवा ध्वनिफित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं तयार केलेली असेल, तर त्यावर स्पष्टपणे तशी सूचना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रत्येक एआय-निर्मित सामग्रीच्या कोपऱ्यात 'एआय जनरेटेड' किंवा तत्सम सूचना स्पष्टपणे दाखवणं अनिवार्य असणार आहे. तसंच कोणत्याही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर सामग्रीबाबत तक्रार आल्यास समाज माध्यमांवरून ती सामग्री तीन तासांच्या आत काढून टाकावी लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ३६ तासांची होती.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम शृंखलेचा १३१ वा भाग असेल. सकाळी ११ वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप वरुन ऐकता येईल.

****

मुंबईत लवकरच नवीन, अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि संपूर्णपणे स्वदेशी वेगवान मोनोरेल पुन्हा सुरु होणार आहे. मोनोरेलला आपल्या नवीन रोलिंग स्टॉक आणि सीबीटीसी आधारित सिग्नलिंग प्रणालीसाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे. आता पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्यानंतर नवीन आणि सुधारित अद्ययावत मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.

****

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन परवा सोमवारी २३ तारखेपासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार असून, त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

****

महाराष्ट्रामध्ये एस आय आर म्हणजेच निवडणूक याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण एप्रिलमध्ये लागू होणार असून या माध्यमातून अचूक आणि पारदर्शक मतदार याद्या निर्माण होतील. यासाठी आवश्यक तो सर्व निधी राज्य सरकार देईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूरमध्ये महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

****

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ इथे पहिल्या तोरणमाळ फेस्टीवलला कालपासून सुरवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांना आदिवासी संस्कृती, बोलीभाषा आणि परंपराचं दर्शन इथल्या नृत्य तसंच लोककलेतून घडवून दिले जाणार आहे. आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी यांनी पारंपारीक आदिवासी वाद्य आपल्या हाताने वाजवत या महोत्सवला सुरवात केली. या महोत्सव स्थळी सर्व वस्तुमध्ये बांबुचा वापर करण्यात आला आहे.

****

अमेरिकेतील प्रसिद्ध साऊल आर्टिस्ट जर्नलया आंतरराष्ट्रीय मासिकाने आपल्या ताज्या अंकात अहिल्यानगरच्या प्रख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या अजोड कलाकृतींना विशेष स्थान दिलं आहे. आदिवासी जीवनातील रसआणि त्यांचा अदम्य उत्साह ठाकूर यांच्या १८ चित्रांच्या माध्यमातून या मासिकाच्या तब्बल २५ पानांवर दिमाखात झळकला आहे.

****

लातूर शहरात वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांनी व्यापक मोहीम राबवत मोठा आवाज करणाऱ्या ६१ दुचाकींवर कारवाई केली. यामध्ये अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे सायलेन्सर नष्ट करण्यात आले.

****

छत्रपती संभाजीनगर इथे येत्या २६ फेब्रुवारी पासून ५ दिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.

शहरातल्या जटवाडा रस्त्यावरील भीमटेकडी परिसरात विश्वशांती बुद्ध विहार परिसरामध्ये २ मार्च पर्यंत होत असलेल्या या परिषदेसाठी ३० देशातील भिक्खू येत असून ते बौद्ध उपासक उपासिकांना धम्मदेसना देणार आहेत.

****

शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने देण्यात येणारे प्राचार्य रां रं बोराडे शेतकरी साहित्य पुरस्कार तसंच संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले जाणार आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...