Thursday, 19 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. शिवनेरी दुर्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्माचा सोहळा साजरा झाला. येत्या चार वर्षांनी महाराजांचा चारशेवा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलतांना, शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी विकास आराखड्यासह इतरही स्मारकांसंदर्भात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं, त्यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना शिवाजी महाराज हे काळाच्या पुढे विचार करणारे राजे असल्याचं सांगितलं.

****

शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर सह सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा नियोजन समिती छत्रपती संभाजीनगर यांच्याकडुन मिळालेल्या नऊ चारचाकी वाहनांचं आज लोकार्पण करण्यात आलं. पोलिस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी या वाहनांचं लोकार्पण केलं.

**

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्र - कुलगरू डॉ. अशोक महाजन, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांच्यासह विद्यापिठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

**

बीड इथं आज सकाळी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची शासकीय पूजा करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, आमदार संदीप क्षीरसागर, तहसीलदार शेळके यांच्यासह इतर अधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान राज्यात सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांत पुढील दोन महिन्यांत सहा दिवस राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी महसूल विभागातल्या महत्त्वाच्या १५ प्रकारच्या सेवा एका दिवसात मार्गी लावल्या जाणार आहेत. अभियानाची राज्यस्तरीय अंमलबजावणी मंत्र्यांच्या देखरेखीखाली होणार असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.

****

आर्टिफिशिल इंटेलिजन्स-एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेला खुल अवकाश देतांना, त्याचं नियंत्रण आपल्या हाती असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज दिल्लीत भारत मंडपम इथं भारत एआय शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. एआयच्या संदर्भात मानव ही नवी संकल्पना पंतप्रधानांनी सादर केली. ही संकल्पनाच २१ व्या शतकात मानवतेच्या कल्याणाचं मुख्य माध्यम ठरेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महाविद्यालयांच्या संलग्नता अर्ज प्रक्रियेसाठी ई-समर्थ पोर्टल कार्यान्वित केलं आहे. ज्या महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता अद्याप स्थगित आहे, त्यांनी दोन मार्चपर्यंत प्रस्ताव शैक्षणिक विभागाकडे सादर करावेत. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-बार्टी आणि छत्रपती संभाजीनगर इथलं महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातल्या युवक– युवतींसाठी अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विविध मुदतींचे हे कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातल्या युवक-युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा, हा या आयोजनाचा उद्देश आहे. इच्छुकांनी सदर संस्थांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

जालना इथं पोलिस भरतीसंदर्भात उमेदवारांची मैदानी चाचणी तसंच शारिरिक मोजमाप प्रक्रिया ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान पार पडली. या प्रक्रियेसाठी हजर राहू न शकलेल्या उमेदवारांसाठी उद्या २० तारखेला ही प्रक्रिया घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी या चाचणीसाठी पोलिस कवायत मैदानावर हजर राहण्याचं आवाहन, पोलिस विभागाने केलं आहे

****

६८ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठीची स्पर्धा १८ ते २२ मार्चदरम्यान पुण्यात वाघोली इथं होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुण्याच्या राष्ट्रीय तालीम संघ आणि रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेत राज्यातल्या ४२ संघांचे सुमारे ८४० कुस्तीपटू, गादी आणि माती विभागात आपलं कौशल्य दाखवणार आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...