Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 February 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०५ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
सहकारातून समृद्धीच्या दिशेने केंद्र
सरकारने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं असून, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज देशातली पहिली सहकार
आधारित भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ करणार आहेत. देशातल्या सहकार क्षेत्राला बळकटी देणं
तसंच सर्वसमावेशक आणि नागरी केंद्रित परिवहन उपाययोजनांना चालना देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारत टॅक्सी मंचात
चालकांना “सारथी” म्हणून मालकी, संचालन आणि मूल्यनिर्मितीच्या
केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. भारत टॅक्सी सेवा शून्य कमिशन आणि कोणतंही अतिरिक्त
शुल्क नसलेल्या किंमत मॉडेलवर कार्यरत राहणार असून, यामधल्या नफ्याचा थेट लाभ चालकांना मिळणार आहे. तसंच आरोग्य
विमा, अपघात विमा, सेवा निवृत्ती बचत योजना आणि समर्पित
चालक समर्थन प्रणालीद्वारे सारथींच्या सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे.
याशिवाय बाईक दीदीसारखे उपक्रमही राबवले जात असून, आतापर्यंत १५० हून अधिक महिला चालक भारत टॅक्सी सेवेत सहभागी
झाल्या आहेत.
****
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि
१२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा पत्रचार आज संपत आहे. यात सात तारखेला मतदान होणार
असून, नऊ तारखेला मतमोजणी होईल. या निवडणुकांसाठी
मतदारांना आपलं नाव आणि मतदान केंद्र सहज शोधता यावं, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध
करून दिलं आहे.
**
दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारार्थ काल उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी धाराशिव इथं सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या योजना, विकासकामं, शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामीण भागासाठी घेतलेल्या
निर्णयांचा सविस्तर लेखाजोखा मांडला. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना यावेळी
श्रद्धांजली वाहण्यात आली.
****
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी
बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने निर्माण झालेली मोठी वाहतूक
कोंडी सुमारे ३५ तासांनंतर अखेर संपली. रात्री दीड वाजल्यापासून धीम्या गतीने वाहतूक
सुरू करण्यात आली असून, अजूनही सुमारे १५ किलोमीटरपर्यंत
वाहनांची रांग लागलेली आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे पूर्वपदावर येईपर्यंत महामार्गावरील
टोलवसुली थांबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत संवेदना
व्यक्त करताना, मोठा धोका टाळण्यासाठी
ही खबरदारी आवश्यक होती, असं सांगितलं.
****
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या
महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम
यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. काल अर्ज भरण्याची मुदत संपली त्यावेळी दोन्ही
पदांसाठी एक-एकच अर्ज दाखल झाला होता. दहा फेब्रुवारीला निवडीची अधिकृत घोषणा केली
जाणार आहे.
मालेगावच्या महापौरपदासाठी तीन, तर उपमहापौरपदासाठी पाच उमेदवार रिंगणात
आहेत.
**
नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी
वरिष्ठ पातळीवर ठरलेले उमेदवार बदलण्यात आल्याचा आरोप करत नाशिक शहर भाजप अध्यक्ष सुनील
केदार यांनी राजीनामा दिला होता. मात्र नंतर नगरसेवकांची बैठक बोलावून ज्येष्ठ नेते
गिरीश महाजन यांनी समजूत काढल्यावर केदार यांनी राजीनामा मागे घेतला.
****
राज्यात राबवण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी
नदीजोड प्रकल्पांतल्या कामांना गती देण्याच्या दृष्टीनं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-
पाटील यांनी काल मुंबईत सविस्तर आढावा घेतला. दमणगंगा-वैतरणा-गोदावरीन दीजोड प्रकल्प, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प
तसंच कृष्णा खोऱ्यातलं पुराचं पाणी भीमा नदी खोऱ्यात वळवण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या
प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. कोकणातल्या
जलसमृद्ध खोऱ्यांमधलं अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक आणि मराठवाडा भागातली
पाणीटंचाई दूर करण्याचं लक्ष्य असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.
****
वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पाला
गती मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री
अशोक उईके यांनी दिली. ते काल यवतमाळ इथं वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्याच्या विकासाला
गती मिळावी, उद्योग, रोजगार, व्यवसाय वाढीस यावे यासाठी मुख्यमंत्र्यांपुढे
नियोजन मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
मराठी भाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती
आवश्यक असल्याचं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं.
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात ‘वनस्पतीविज्ञान आणि भौतिकविज्ञान’ नोंदलेखन कार्यशाळेच्या
उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. प्राचार्य डॉ. पंकजा वाघमारे यांनी कार्यशाळेचा
अध्यक्षीय समारोप केला.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली इथं जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांनी विना क्रमांकाचे चार हायवा वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई केली.
ही वाहने अनधिकृतरीत्या वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात
आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भू-विकास बँकेच्या
पाच हजार १०६ कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आहे. या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील
कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परिपत्रक जारी केलं.
****
No comments:
Post a Comment