Wednesday, 11 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 11 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा सचिवालयाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या सूचनेतील काही त्रुटी ओळखल्या आहेत. या नोटिशीत विरोधी पक्षांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये घडलेल्या चार घटनांबद्दल उल्लेख केला होता आणि त्या आधारे नियमांनुसार नोटिस फेटाळता आली असती. तथापि, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सचिवालयाला नोटिशीत असलेल्या त्रुटी दूर करण्याचे आणि स्थापित प्रक्रियेनुसार पुढे जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी नियमांनुसार या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. विरोधी पक्षांनी काल बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटिस दिली होती.

****

देशाची सौरऊर्जेच्या माध्यमातून उर्जानिर्मितीची क्षमता १४४ गिगा वॅट इतकी झाली आहे. नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. या आधी देशात केवळ सहा ते सात टक्क्यांपर्यंत सौर ऊर्जानिर्मिती होत होती, यात वाढ झाली असून आता देश ऊर्जाक्षेत्रात निर्यातीकडे वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

**

अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात, वंदे भारत गाड्यांची वाढती संख्या पाहता त्यांची तांत्रिक देखभाल आणि विश्वसनीयतेसाठी विशेष पायाभूत सुविधांची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधलं. वंदे भारत साठी अहिल्यानगरमध्ये मेन्टेनन्स अर्थात देखभाल डेपो उभारण्यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारला, तसंच या गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ समाविष्ट करण्यासंदर्भात आणि या खानपान आणि व्यवस्थापनात महाराष्ट्रातले स्थानिक बचत गट आणि तरुणांना रोजगार देण्यासंदर्भात सरकार धोरण तयार करेल का, यासंदर्भात लंके यांनी प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, राज्यातल्या रेल्वेसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

****

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, एकात्म मानववादाचे प्रणेते, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहिली. दूरदर्शी विचारवंत आणि राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलं, समाजातल्या शेवटच्या घटकाच्या सेवेला प्राधान्य देण्याचा आणि नैतिक सार्वजनिक जीवनाचा त्यांचा संदेश विकसित भारताच्या प्रवासाला सतत प्रेरणा देत असल्याचं, उपराष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे मूल्य आधारित सिद्धांत आणि विचार देशाच्या प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक असतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर येणार्या अनेक पिढ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रनिर्माणाचे शाश्वत प्रेरणास्त्रोत राहतील असं गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं.

नांदेड इथं भाजप कार्यालयात माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, नवनिर्वाचित महापौर कविता मुळे, यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली अर्पण केली.

****

मुंबईत येत्या १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हवामान परिषदेचं प्रथमच आयोजन करण्यात येणार आहे. देश परदेशातले प्रमुख नेते, उद्योग जगतातले आघाडीचे प्रतिनिधी, हवामान क्षेत्रातले नवोन्मेषक, आणि प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. बिल गेट्स, हिलरी क्लिंटन आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. एका सत्रामध्ये निसर्ग, अन्न प्रणाली आणि मानव यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. मुंबई हवामान परिषद ग्लोबल साउथमधील हवामान नेतृत्वासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. हा कार्यक्रम शहर पातळीपासून जागतिक व्यासपीठापर्यंत हवामान कृतीसाठी भारताची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी जगभरातील भागीदारांसोबत सहकार्य करण्याची महाराष्ट्राची तयारी अधोरेखित करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने गरीब कुटुंबातल्या सुमारे तीन हजार मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तकं विनामूल्य उपलब्ध करुन दिली आहेत. त्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी दिला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते काल या पुस्तकांचं वितरण करण्यात आलं. ग्रामीण भागात शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी अभ्यास तसंच सराव करण्यासाठी ही पुस्तकं तयार करण्यात आली आहेत.

****

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अहमदाबाद इथं दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान दरम्यान सामना सुरु आहे. आजचा दुसरा सामना कोलंबो इथं ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड दरम्यान, तर तिसरा सामना मुंबईत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...