Friday, 20 February 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० फेब्रुवारी २०२ सकाळी.०० वाजता

****

जी राम जी’ अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजिविका हमी अभियान ग्रामीण योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी तीन कोटी वाढीव मनुष्यदिवसांच्या श्रमिक बजेटला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. राज्याच्या श्रमिक बजेटमध्ये १३ कोटी मनुष्यदिवसांवरून १६ कोटी मनुष्यदिवसांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल. विशेषतः अकुशल कामगारांच्या उपजीविकेला भक्कम आधार मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ड्रोन पॅराशूटची, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था – डीआरडीओनं यशस्वी चाचणी घेतली. चंदीगड इथं पार पडलेल्या या चाचणीत पॅराशूटवर त्याच्या कमाल उड्डाण क्षमतेपेक्षा अधिक भार टाकून त्याची मजबुती आणि विश्वासार्हता तपासण्यात आली. या प्रक्रियेत पॅराशूटच्या संरचनेतील सुरक्षिततेचे निकष यशस्वीरित्या सिद्ध झाले. ही प्रणाली भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ, भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इसरो आणि संबंधित उद्योगांचं अभिनंदन केलं आहे. 

****

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह २२ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विशेष संक्षिप्त पुनरावलोकन संदर्भातल्या सर्व तयारीची कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या राज्यांमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा असून, त्यासाठी प्रारंभिक कामांना गती देण्यास सांगितलं आहे.

****

बारामती विमान अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो – ए ए आय बी मार्फत काटेकोरपणे सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या नियमांनुसार, घटनेनंतर ३० दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला जाईल, तर अंतिम अहवाल योग्य वेळी सादर करण्यात येईल. या विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. L3 कम्युनिकेशन्स निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर नवी दिल्लीतील ए ए आय बी च्या सुविधेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला तीव्र उष्णतेमुळे नुकसान झालं असून, तो हनीवेल कंपनीने तयार केलेला आहे. त्यामुळे उत्पादक कंपनीकडून तांत्रिक सहाय्य मागवण्यात आलं आहे. तपास पूर्णपणे तांत्रिक आणि पुराव्यावर आधारित असल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

****

मुंबईत आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषदेत महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पायाभूत आणि औद्योगिक संस्थांच्या प्रमुखांनी उद्योगविकास, गुंतवणूक वाढ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या ध्येयपूर्तीसाठी ठोस दिशा मांडली. यावेळी राज्यात सुरू असलेले आणि नियोजित पायाभूत सुविधा, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक्स, स्मार्ट शहरे आणि गुंतवणूक प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महाराष्ट्राला देशातलं अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून बळकटी देण्यासाठी समन्वित नियोजन आणि धोरणात्मक अंमलबजावणीवर भर देण्यात आला.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. राज्यभरातील सोळा लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा दे आहेत. या परीक्षेत शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातल्या जंगलात नक्षल्यांनी उभारलेली ४४ स्मारकं पोलिसांनी बुधवारी उद्ध्वस्त केली. पोलिसांची सी-60 पथकं, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं आणि जिल्हा पोलिसांच्या १८ पथकातल्या ८०० जवानांनी विशेष अभियान राबवून जंगलाच्या वेगवेगळ्या भागात उभारलेली ही स्मारकं एकाच दिवशी नष्ट केली. जिल्ह्यातली नक्षल चळवळ जवळपास संपली असून, ही स्मारकं उद्ध्वस्त केल्यानं आता सामान्य नागरिकांच्या मनात असलेली भीती नष्ट होण्यास मदत झाली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस दल प्रयत्नशील असल्याचं पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिस दलाचं अभिनंदन केलं आहे.

****

चंद्रपूरमध्ये संख्याबळ असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच ही समिती स्थापन केली जाईल अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं दिली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणाची चौकशी करायला सहमती दर्शवल्याचं त्यांनी सांगितलं.

****

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या पल्लेकेले इथं ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात सामना होईल. दोन्ही संघा याआधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. या स्पर्धेत सुपर आठ मधले सामने उद्यापासून सुरु होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...