Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 20
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
ग्लोबल साऊथमधल्या देशांसाठी शेती केवळ आर्थिक क्षेत्र नाही, तर
उपजीविका, सामाजिक स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत आज एआय फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजन्स फॉर फूड ॲण्ड क्लायमेट
रेजिलिअन्स, या विषयावरच्या सत्रात ते संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने डिजिटल
सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जबाबदार एआय राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी
ठेवलं असल्याचं फडणवीस म्हणाले. अंदाजे ५० कोटी भारतीय शेतकऱ्यांवर, शेतीवर
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबित्व आहे, त्यामुळे एआयचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचणं आवश्यक असल्याचं त्यानी नमूद केलं.
या सत्रानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाविस्तार ॲप चा शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, यामध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी
यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आरोग्य, सायबर
सुरक्षा, अंतराळ अशा विविध क्षेत्रातील एआय आणि डीपटेक स्टार्टअप्सच्या मुख्य
कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आज पॅक्स सिलिका उपक्रमाद्वारे भारताने
औपचारिकरित्या सहभाग नोंदवला, ज्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या
उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या. हा उपक्रम देशाच्या सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, चिप डिझाईन
आणि वस्तुनिर्माणसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं वैष्णव म्हणाले.
****
‘जी राम जी’ अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजिविका अभियान
हमी ग्रामीण योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी तीन कोटी वाढीव
मनुष्यदिवसांच्या श्रमिक बजेटला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या
संदेशात ही माहिती दिली. राज्याच्या
श्रमिक बजेटमध्ये १३ कोटी मनुष्यदिवसांवरून १६ कोटी मनुष्यदिवसांपर्यंत वाढ
करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज
सिंह चौहान यांचे आभार मानले. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण
भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला गती
मिळेल. विशेषतः अकुशल कामगारांच्या उपजीविकेला भक्कम आधार मिळेल, असं
मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात निवडणूक याद्यांचा सुधारणा कार्यक्रम एस आय आर एप्रिल मध्ये लागू
होणार असून, या माध्यमातून अचूक आणि पारदर्शक मतदार याद्या निर्माण होतील, अशी माहीती, राज्याचे महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी
ते आज माध्यमांशी बोलत होते. यासाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकार देईल, असंही बावनकुळे
यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले गुंतवणूकदार, निर्यातदार आणि निर्यातक्षम उद्योग घटक यांच्यासाठी
आज महानिर्यात इग्नाईट कव्हेंशन २०२६ चं आयोजन करण्यात आलं आहे. ही कार्यशाळा
रेल्वे स्टेशन एमआयडीसीतल्या सी आय एम ए सभागृहात होत आहे. या कार्यशाळेत
जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणूकीच्या संधी, इतर क्षमता
असलेल्या क्षेत्रातील गुंतवणूक, व्यवसाय संधीबाबत चर्चा आणि उद्योजकांचे अनुभव या बाबींवर
चर्चा होत आहे.
****
गोंदिया इथल्या खासगी दवाखान्यातून बाळाची विक्री केल्या प्रकरणी डॉ. नितेश
वाजपेयी या मुख्य आरोपीला आज भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलं. लक्ष हॉस्पिटल या दवाखान्यातून
नवजात बाळ अडीच लाखांना विक्री केल्याचं नुकतच समोर आलं होतं. यापूर्वी दोन आरोपींना
अटक करण्यात आली असून चार जण अद्याप फरार आहेत. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे तपासाला वेग
आला असून बाळ विक्री प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांना यश येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठी कालगणना आणि मराठी नवीन वर्ष यासंदर्भात नागरीकांना माहिती होण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित आयाम आणि साईबाबा मंदिर ट्रस्ट
ने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाळुज इथं
काल पंचांगाची ओळख ही कार्यशाळा घेतली. ज्योतिषाचार्य पंडित ऋषिकेश चौधरी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
No comments:
Post a Comment