Tuesday, 24 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन आज मुंबईत लोकभवन इथं राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर उद्या बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं केंद्रीय आय़ुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्यालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

****

देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी अर्थात राजाजी यांच्या, राष्ट्रपती भवनात उभारलेल्या पुतळ्याचं अनावरण काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातला अशोक मंडपाजवळचा एडविन ल्युटिन्स यांचा पुतळा काढून त्याठिकाणी राजाजींचा पुतळा बसवण्यात आला आहे. राजाजींच्या जीवनातून प्रेरणा घेऊन राष्ट्र प्रथम या भावनेनं नागरिक काम करत राहतील अशी आशा राष्ट्रपतींनी यानिमित्त आयोजित राजाजी उत्सवात व्यक्त केली. याप्रसंगी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्यासह केंद्रिय मंत्री आणि राजगोपालाचारी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्या जे. जयललिता यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. जयललिता यांनी त्यांच्या नेतृत्व, दृढनिश्चय आणि जनहिताच्या निर्णयांद्वारे असंख्य लोकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटवला, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनीही जयललिता यांना आदरांजली वाहिली असून, जनसेवेसाठीचं जयललिता यांचं समर्पण नेहमी प्रेरणादायक राहील, असं म्हटलं आहे.

****

भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांचे आयुक्त, यांची राष्ट्रीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे होत आहे. सत्तावीस वर्षांच्या खंडानंतर या स्वरूपाची परिषद होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार या परिषदेचे अध्यक्ष असून, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित आहेत. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणूक आयुक्तांसह मुख्य निवडणूक अधिकारीही या परिषदेत सहभागी होत आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे निलंगा आणि रेणापूर तालुक्यांमधल्या काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. फळबागांनाही या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी तसंच बीड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला असून, बीडच्या धारूर तालुका परिसरात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता असून मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

****

राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनांचं ग्रामपंचायतींकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. त्यानुसार काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात रिधोरा देवी या गावात पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचं ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात आलं. यानिमित्त गावात जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला. गावातल्या महिलांनी जलपूजन करून डोक्यावर जलकलश घेऊन शालेय विद्यार्थ्यांसोबत फेरी काढली.

****

मुंबईत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान २०२६ वितरण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर इथल्या जयविश्वकर्मा सूर्योदय संस्थेला राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं.

****

२०२५-२६ या वर्षात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरावर एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामाचं मूल्यमापन करण्यात आलं, सर्व बाबींची योग्य पूर्तता केल्यामुळे जिल्ह्याने हे यश साध्य केलं.

****

बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या कान्नापूर इथे येत्या २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत शेतकरी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या चार वर्षांपासून, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवानिमित्त २५ गावं एकत्र येऊन या महोत्सवाचं आयोजन करतात. या महोत्सवात पारंपरिक कीर्तनासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य, पर्यावरणाचा शेतीवर होणारा परिणाम, तसंच शेतकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती यावर प्रबोधन केलं जाणार आहे.

****

लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर–रत्नेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त काल चक्रीभजनाचा सोहळा पार पडला. यावेळी सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांनी हरिनामाची महती सांगितली.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...