Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रनिर्माण
निरंतर प्रक्रिया असून प्रत्येक अर्थसंकल्प हा केवळ अल्पकालीन दस्तऐवज नाही तर ती एक
धोरणात्मक चौकट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी
आज ‘विकसित भारतासाठी
तंत्रज्ञान, सुधारणा आणि वित्त’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर ऑनलाईन परिसंवादाला संबोधित केलं.
त्यावेळी ते बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे आपल्यासमोर व्यापक
ध्येय आहे पण केवळ घोषणा करून चालणार नाही, तर धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक
असल्याचं ते म्हणाले. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता-
एआय आणि माहिती विश्लेषणासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन केलं. गेल्या दशकात
पायाभूत सुविधांवर सरकारनं विशेष भर दिला असून, सार्वजनिक भांडवली खर्च २ लाख कोटींवरून १२ लाख कोटी रुपयांच्या
पुढे नेला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी आज
राजस्थानच्या जैसलमेर वायुसेना तळावरुन स्वदेशी बनावटीच्या ‘प्रचंड’
हेलिकॉप्टर मधुन उड्डाण केलं. या उड्डाणापूर्वी सेनादलाच्या
अधिकाऱ्यांनी राष्ट्रपति मुर्मू यांना या नव्या हेलिकॉप्टरच्या सैनिकी क्षमतांबद्दल माहिती दिली. देशाच्या
उंच क्षेत्रात सैन्य कारवाईसाठी या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी यावेळी,
उच्च तत्रज्ञानावर आधारीत ‘प्रचंड’च्या निर्मितीबद्दल वैज्ञानिक, इंजिनियर आणि कर्मचाऱ्यांचं कौतूक केलं. दरम्यान, आज राष्ट्रपती मुर्मू पोखरण क्षेत्रीय गोळीबार सराव स्थळी वायुसेनेच्या
‘वायु शक्ती’या अभ्यास कसरतींना उपस्थित राहुन उच्च लढाऊ विमान,
परिवहन विमान आणि हेलीकॉप्टरच्या युद्ध सरावाचं
निरिक्षण करतील.
****
आम आदमी
पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया
यांना दिल्लीतील एका न्यायालयाने आज उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणातून
निर्दोष मुक्त केले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो–‘सीबीआय’ने दाखल केलेल्या आरोपपत्राची
दखल घेण्यास न्यायालयाने नकार दिला. आरोपपत्रात अनेक त्रुटी असून पुराव्यांद्वारे समर्थनीय नाहीत,
असे विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी म्हटले.
न्यायालयाने या प्रकरणात इतर २१ जणांनाही निर्दोष मुक्त केले. निर्दोष मुक्ततेनंतर
अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले. सत्य नेहमीच विजयी होते आणि आज न्यायालयाने
निर्दोष मुक्तता करून त्यावर शिक्कामोर्तब केलं असं केजरीवाल यांनी म्हटलं तसंच आम
आदमी पक्षाला संपवण्यासाठी रचलेले हे राजकीय षडयंत्र होते असंही केजरीवाल म्हणाले.
****
शक्तीपीठ
महामार्गाबाबत येत्या पाच मार्च रोजी बाधीत शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली जाईल,
असं आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी दिलं आहे. या महामार्गाबाबत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांनी
बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी भेट
दिली. जरांगे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं आणि महसूलमंत्री बावनकुळे यांच्याशी संपर्क
साधला. त्यावेळी महसूलमंत्र्यांनी येत्या पाच मार्चला बैठकीचं आश्वासन दिलं. यावेळी
उपोषण कर्त्यांनी मनोज जरांगे यांच्या हस्ते पाणी घेऊन हे उपोषण स्थगित केलं. यावेळी
खासदार संजय जाधव तसंच महापौर सय्यद इकबाल उपस्थित होते.
****
लातूर इथं
उद्या २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विधी सेवा आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण
यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर जिल्हा प्रशासन यांच्या
संयुक्त विद्यमानं महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात
आला आहे. सकाळी साडे दहा वाजता रुक्मिणी मंगल कार्यालय औसा-बार्शी रिंग रोड इथं हा
मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ५० दालनांद्वारे सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली
जाणार आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि
ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज
होबार्ट इथं सुरु आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर २५२ धावांचं
आव्हान दिलं आहे. भारतातर्फे कर्णधार हरमनप्रित कौर हिनं ५४ तर प्रतिका रावल हिनं
५२ धावा केल्या.
****
टी-२० वर्ल्ड
कपमध्ये भारतीय संघानं सुपर आठमधल्या ‘गट एक’च्या सामन्यात झिम्बाब्वेचा ७२ धावांनी
पराभव करत जोरदार पुनरागमन केलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट
इंडिजवर नऊ गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या पराभवामुळं भारतीय संघाच्या उपांत्य
फेरीत पोहचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ चार गुणांसह आधीच
उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांकडे प्रत्येकी
दोन गुण आहेत. १ मार्च रोजी कोलकाता इथं होणारा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना
जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे.
****
हवामान
– राज्यात हळूहळू तापमानाचा पारा चढत असून आज सर्वत्र हवामान कोरडं राहील,
असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment