Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 26 February
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची
अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या सात जागांचा
समावेश आहे. कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पाच मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. सहा मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर नऊ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आवश्यक ठरल्यास १६
मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी केली जाणार आहे. शरद
पवार यांच्यासह राज्यातल्या सात सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या
दिवशी आज विविध महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धात
होलोकॉस्टमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना ते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यानंतर
पंतप्रधान इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेर्झोग यांची भेट घेणार असून, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चाही करणार
आहेत. संरक्षण,
शेती, जलव्यवस्थापन, नवोन्मेष आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावर या चर्चेचा भर
असेल.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी काल
इस्रायलच्या संसदेला संबोधित करत, दहशतवादाविरोधात भारत
इस्रायलच्या सोबत खंबीरपणे उभा असल्याचा पुनरुच्चार केला.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या
पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकरांनी देशाला
गुलामगिरीच्या साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत
राहील,
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर लढा
देणाऱ्या वीर सावरकरांच्या त्याग, समर्पण आणि वीरतेच्या गाथा
अनंत काळापर्यंत प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी 'राष्ट्रप्रथम' विचारांचा दीपस्तंभ ठरतील, अशा शब्दात गृहमंत्री अमित
शहा यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली.
****
एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या सामाजिक विज्ञान
पाठ्यपुस्तकात न्यायपालिकेत भ्रष्टाचाराचा उल्लेख करण्यात आल्याच्या मुद्द्याची
सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. हा विषय अत्यंत गंभीर असल्याचं
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती ज्योयमाला
बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पांचोली यांच्या पीठानं नमूद केलं. वरिष्ठ विधिज्ञ
कबिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर हा मुद्दा उपस्थित करत, इयत्ता
आठवीच्या विद्यार्थ्यांना न्यायपालिकेत भ्रष्टाचार असल्याचं शिकवलं जात
असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी न्यायपालिकेला बदनाम करण्याची परवानगी
कुणालाही दिली जाणार नसल्याचं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं.
****
प्रधानमंत्री इ–ड्राईव्ह योजनेअंतर्गत यावर्षी चालू
महिन्यापर्यंत २८ लाखाहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. केंद्रीय अवजड
उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली. इलेक्ट्रिक वाहनं या
विषयावर नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. विक्री झालेल्या
वाहनांमध्ये २० लाखांहून जास्त इलेक्ट्रिक दुचाकी असून सुमारे ३ लाख इलेक्ट्रिक
तीनचाकी आहेत.
****
अवैध सावकारीवर निर्बंध आणण्यासाठी विद्यमान कायद्यात
दुरुस्ती करण्याचं आश्वासन सरकारनं काल विधानसभेत दिलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या
एका शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी मूत्रपिंड विकावं लागल्याप्रकरणी उपस्थित प्रश्नावर
गृहराज्यमंत्री पंकज भोयर बोलत होते. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली
जाईल,
पीडित शेतकऱ्याला सरकार शक्य ती मदत देईल असं त्यांनी
सांगितलं.
****
महाराष्ट्रातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या
उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन आणि ब्रिस्टॉल
विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधानभवन इथं सामंजस्य करार
करण्यात आला. ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणं
ही अभिमानाची बाब असून, या सहकार्यामुळे
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या राज्यातल्या
विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी
सांगितलं. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण
कालावधीसाठी १०० टक्के शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल.
****
राज्यातल्या ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी द्वितीय योजनेच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी महावितरणला काल नवी दिल्ली इथं गौरवण्यात आलं. केंद्रीय नवीन आणि
नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मुख्य अभियंता ज्ञानेश
कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जगातला सर्वांत मोठा विक्रेंद्रीत सौर
ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना दोन मध्ये आतापर्यंत एक
हजार ९८५ कृषीवाहिन्यांचं सौर ऊर्जीकरण करण्यात आलं असून, राज्यातल्या
१० लाख २५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला
आहे.
****
No comments:
Post a Comment