Sunday, 8 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियाच्या दौऱ्यावर असून त्यांची मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि मलेशिया यांच्यात राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सेमीकंडक्टर, डिजिटल क्षेत्रासह एकूण अकरा मुद्द्यांवर करार झाले. दोन्ही देश सांस्कृतिक सभ्यतेने जोडलेले असून इंडो-पॅसेफिक क्षेत्रात शांततेसाठी भारत कटीबद्ध असल्याचं यावेळी पंतप्रधांनानी सांगितलं.

दरम्यान, काल दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी क्वालालंपूरमध्ये 'सेलामत दातंग मोदी जी' नावाच्या प्रवासी भारतीय समुदायाच्या मेळाव्याला संबोधित केले. मेळाव्यात बोलताना मोदींनी भारत आणि मलेशियातील सखोल वैयक्तिक आणि परस्पर लोकसंबंधांवर प्रकाश टाकला. यावेळी भारताचे युपीआय हे डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म लवकरच मलेशियात सुरू होईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. त्याशिवाय प्रवासी भारतीयांसाठीच्या कार्डाची सुविधा सहाव्या पिढीपर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगून, भारतात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिरुवल्लुवर शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणाही केली. त्याबरोबर मलेशियामध्ये नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

****

भारत आणि अमेरिकेदरम्यान परस्पर फायद्याच्या व्यापार कराराच्या अंतरिम आराखड्यावर दोन्ही देशांनी काल सहमती दर्शवली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दोन्ही देशांचं संयुक्त निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. यानुसार, अमेरिका भारतीय वस्तूंवर १८ टक्के आयात शुल्क लागू करेल तर भारत, अमेरिकन बनावटीच्या सर्व औद्योगिक वस्तू आणि अमेरिकेच्या अन्न आणि कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवरील शुल्क रद्द करणार आहे किंवा ते कमी करणार आहे. या करारातून भारतातील कष्टकरी शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म, लघु,मध्यम उद्योजक, स्टार्टअप - नवोन्मेषी तरुण, मच्छिमारांसह अधिकाधिक लोकांना नव्या संधी उपलब्ध होऊन मेक इन इंडियाला बळकटी मिळेल तसंच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असं  मोदी यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

या करारामुळे देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं संपूर्ण संरक्षण निश्चित होत असून कराराचा उद्देश निर्यातवृद्धी, रोजगार निर्मिती आणि विकसित भारत २०४७ च्या उद्देशाला गती देणे हे असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे आहे.

****

मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यात खदान दुर्घटनेनंतर बचाव कार्य अद्याप सुरू असून, मृतांची संख्या आता २७ वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल तसंच स्थानिक प्रशासनाच्या चमू घटनास्थळी तैनात आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अवैध खाणकामाविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत उमलावांग आणि सखैन भागात छापे टाकून सुमारे ६,९०० मेट्रिक टन कोळसा आणि खाणकामाचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

****

नागपूर इथं आयोजित तिसऱ्या तीन दिवसीय ॲडव्हांटेज विदर्भ औद्योगिक परिषदेचा आज समारोप होत आहे. या परिषदेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुंतवणुकीचे तीन पथदर्शी असे सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे विदर्भात ६ हजार नवे रोजगार आणि उद्योग वाढीस मोठी चालना मिळणार आहे.

****

आज संत गजानन महाराजांचा प्रकट दिन असून, या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. शेगाव नगरी भाविकांनी फुलून गेली असून, राज्याच्या विविध भागांतून अनेक दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्या आहेत. दरम्यान, वाशिम शहरातील बाकलीवाल कॉलनीतून श्री संत गजानन महाराजांची दिंडी आज सकाळी ६ वाजता रिठाकडे रवाना झाली.

****

'हिंदू' हा शब्द बाहेरून लादलेली ओळख म्हणून पाहिला जाऊ नये, तर 'भारताच्या मूल्यांशी जोडलेल्या लोकांसाठी एक सर्वसमावेशक विशेषण' म्हणून पाहिले पाहिजे, ज्यामध्ये भूमीचा अभिमान, तिच्या संस्कृतीची प्रशंसा आणि पूर्वजांचा सामायिक गौरव यांचा समावेश आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ते काल मुंबईत संघाच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते.

****

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या येडेश्वरी साखर कारखाना परिसरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही घोषणा केली. येडेश्वरी साखर कारखाना परिसरात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

****

आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरु झाली. भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात अमेरिका संघाचा २९ धावांनी पराभव करत, विजयी सलामी दिली. भारताचा पुढचा सामना १२ तारखेला नामिबियासोबत होणार आहे. या स्पर्धेतील चौथा सामना आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात नुकताच सुरु झाला आहे. तर इंग्लंड-नेपाळ या संघादरम्यानचा सामना दुपारी तीन वाजता आणि श्रीलंका-आयर्लंड यांच्यातला सामना सायंकाळी सात वाजता खेळवला जाणार आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...