Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 February 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१२ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात
आज लोकसभेत केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया औद्योगिक संबंध संहिता सुधारणा
विधेयक २०२६ विचारासाठी आणि मंजुरीसाठी मांडणार आहेत. तसंच, विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक
आणि जनविश्वास विधेयकाची तपासणी करणाऱ्या
संयुक्त समित्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्तावही लोकसभेत सादर केला जाणार आहे. राज्यसभेत
अर्थसंकल्पावरील चर्चा आज सुरू राहणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकिलांच्या
नियुक्तीसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आहेत. मे २०२५ च्या निर्णयानुसार
२०२३ मधल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात आला असून, ‘वरिष्ठ वकील नियुक्ती मार्गदर्शक
तत्त्वे २०२६’ या शिर्षकाखाली नव्या नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्या चौकटीनुसार
‘वरिष्ठ वकिलांच्या नियुक्तीसंदर्भातील समिती’ नावाची स्थायी समिती नियुक्ती प्रक्रियेची
सर्व कामं पाहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे या समितीचे अध्यक्ष असतील.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग घेत असलेल्या
नागरी सेवा परीक्षा आणि वन सेवा परीक्षेकरिता आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना त्यांच्या
अर्जात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ही संधी एकदाच मिळणार असून, उमेदवारांना सादर केलेल्या स्वतःच्या
माहितीत फेरबदल करता येतील. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर तीन दिवस ही
संधी मिळणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.
****
सार्वजनिक विद्यापीठांमधल्या अध्यापक
भरतीची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रकाशित
केली जाणार आहे. अशा विविध अनुषंगिक नाविन्यपूर्ण बदलांचा समावेश करून भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर करून भरती प्रक्रियेला
मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
दिली.
****
राज्यातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी
एका कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी विभागानं घेतला आहे. मानसिक
आरोग्य, सामाजिक समस्या, आर्थिक आव्हानं आणि हवामान बदलामुळे
उद्भवणाऱ्या आपत्तींबाबत उपाययोजनांची शिफारस आणि अंमलबजावणीचं काम हे कृती दल करेल.
कृषी विभागाच्या विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक रफीक नाईकवाडी या कृदी दलाचे
प्रमुख असतील.
****
पेसा भरती पूर्ण करण्यासाठी राज्य
शासनाने काल आदेश जारी केला. त्यानुसार ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा
अधिक किंवा २५ ते ५० टक्क्याच्या दरम्यान आहे तिथं ५० टक्के पदं अनुसूचित जमाती प्रवर्गातून
भरावीत असा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा क्षेत्रामधे ५० टक्के पदं ही खुली असतील.
ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या २५ टक्क्यापेक्षा कमी आहे तिथं २५ टक्के जागा
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, २५ टक्के इतर आरक्षित
प्रवर्गासाठी राखीव असतील. या आरक्षणानुसार पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदभरती
केली जाणार आहे.
****
निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित
ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालयांचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. १५० दिवसांच्या
सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयाने पहिला क्रमांक मिळवला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयाने राज्यात तिसरा, तर हिंगोली कार्यालयाने सहावा क्रमांक
पटकावला आहे.
****
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर
नाशिक जिल्ह्यातल्या पर्यटनक्षेत्रासह तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन
निधीतून १०० कोटी रुपयांची तरतूद करा, अशी मागणी जिल्ह्यातल्या
आमदारांनी केली आहे. काल यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून बैठक झाली. जिल्ह्यातल्या किल्ल्यांसाठी एक कोटीचा निधी, रामकाल पथसह अमृत पथदर्शन यात्रेसाठी
तीन डबलडेकर बस, गौतमी गोदावरीत भव्य
बेटावर शिवलींगाची स्थापना यासाठी वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे.
****
आयसीसी टी–ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत
आज दिल्लीत भारत आणि नामिबिया यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला
सुरुवात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेनं
अफगाणिस्तानचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. अन्य सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने
इंग्लंडचा ३० धावांनी, तर ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा
६७ धावांनी पराभव केला.
****
लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर
आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक काल
अतिरिक्त जिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या उपस्थितीत झाली. हा यात्रा महोत्सव १५ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment