Saturday, 7 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान सर्वत्र शांततेत सुरु आहे. सकाळी साडेसात वाजेपासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी इथं मतदानाचा हक्क बजावला. उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदान करण्याचं आवाहन त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना केलं आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड तालुक्यातल्या जामगे या आपल्या मूळ गावी सहकुटुंब मतदान केलं. तर सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मिरज तालुक्यातील पदमाळे गावात मतदानाचा हक्क बजावला.

****

परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत जवळपास नऊ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दरम्यान, मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदान सुरळीतपणे पार पडावं यासाठी, विविध गावातले आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आले आहेत. उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधल्या कामगार तसंच कर्मचाऱ्यांना आज भर पगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तिथं दोन ते तीन तासांची सवलत देण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत.

भारतानं 'अग्नी-३' या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 'स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड'च्या देखरेखीखाली यशस्वी चाचणी घेतली.

या चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने सर्व तांत्रिक निकष पूर्ण केले असून ते सर्व बाजूंनी यशस्वी ठरले आहे. सुमारे ४८ हजार ३०० किलोग्रॅम वजन असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे भारताची सामरिक सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

****

भारत आणि अमेरिका व्यापार कराराची रुपरेषा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी दोन्ही देशांचे संबंध मजबूत होण्यामध्ये वैयक्तिक कटिबद्धतेसाठी अमेरिकेचे राष्ट्राधयक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. कराराची ही रुपरेषा दोन्ही देशातील भागीदारी, विश्वास आणि गतिमानता दर्शवते असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या करारामुळे महिला आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

****

बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाकं वेगानं फिरतील, असा सल्ला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नवाढ आढावा बैठकीत काल ते बोलत होते. या बैठकीला महामंडळाच्या उपाध्यक्षांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. प्रवाशांना ताटकळत ठेवणं म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणं आहे असं सरनाईक यावेळी म्हणाले. आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीनं काम करून एसटीची प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवरील अबुजमाडच्या घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये २५ लाखांचं बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी प्रभाकर याचाही समावेश आहे. ठार झालेल्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला नक्षलवादी आहेत. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून नक्षलवाद्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये ए-के-47 आणि एसएलआर रायफल्सचा समावेश आहे. या जंगल परिसरात नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहिम सुरू केली होती. याचदरम्यान ही चकमक झाली. दरम्यान, या कारवाईत सी-६० पथकातील जवान दीपक मडावी यांना वीरमरण आलं आहे. तसंच एक जवान जखमी असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

राज्य शासनाने २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण हे उद्दिष्ट निश्चित केले असून त्या अनुशंगानं अकोला शहरातल्या नवीन बसस्थानकावर आज कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवलं जात आहे. आरोग्य सेवा कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबवण्यात येत आहे.

****

रत्नागिरीतले तरुण क्रिकेटपटू प्रवीण पवार यांचा काल सामना खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चिंचखरी इथं सुरू असलेल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्यात ते मैदानावर कोसळले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या बुधवारी ११ तारखेला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ गरजू तरुणांनी घ्यावा, असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश बहुरे यांनी केलं आहे.

****

वाशिम इथं कुतुहल विज्ञान प्रदर्शनाचं काल जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावे, त्यांना विज्ञानाचे सखोल ज्ञान मिळावे, शरीरातील प्रत्येक अवयवाची माहिती मिळावी या हेतूने विज्ञान भारती नागपूर आणि वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने हे तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...