Wednesday, 25 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आरोग्य मेळ्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या चार दिवसीय आरोग्य मेळ्यात आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींतर्गत नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला, तपासण्या आणि औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. औषधी वनस्पतींची लागवड आणि कृषी वनीकरणाच्या माध्यमातून आयुष पद्धतींबाबत जनजागृती करणे, सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवणे आणि शेतकऱ्यांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या मेळ्याचा उद्देश आहे. संध्याकाळी राष्ट्रपती नागपूर इथं ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या इस्रायल दौऱ्यासाठी आज रवाना झाले. या भेटीमुळे दोन्ही देशांतील दीर्घकालीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील, असं पंतप्रधानांनी दिलेल्या निवेदनात सांगितलं. या दौऱ्यातून सामरिक भागीदारीस नवे उद्दिष्ट मिळेल आणि समृद्ध भविष्यासाठी दोन्ही देशांचा समान दृष्टीकोन अधिक बळकट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांची भेट घेणार असून इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार आहेत. तसंच पंतप्रधान इस्रायलमधील भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत.

****

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन केलं. दोन दिवसीय कृषी मेळाव्याची संकल्पना विकसित कृषी, आत्मनिर्भर भारतअशी आहे. चौहान यांनी गहू, मोहरी, कोबी, फळबागा तसंच विविध फुलपिकांच्या शेतांना भेट दिली, यावेळी त्यांनी शेतकरी आणि उत्पादकांशी संवाद साधला.

****

बारामतीमध्ये गेल्या महिन्यात २८ तारखेला झालेल्या लीयरजेट 45 विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं म्हणजेच D G C A नं VSR व्हेंचर्स या कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीचं विशेष सुरक्षा  लेखापरीक्षण केल्यानंतर त्यात विमानाची उड्डाण करण्याची क्षमता, हवाई सुरक्षा आणि फ्लाइट ऑपरेशन्स यासंदर्भात अनेक त्रुटी आढळल्या. देखभाल प्रक्रियेत गंभीर उणिवा असल्यामुळे VSR व्हेंचर्सच्या चार विमानांची उड्डाणं पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. कंपनीनं या त्रुटींबाबत सविस्तर अहवाल आणि कारणमीमांसा सादर करण्याच्या सूचनाही डी जी सी ए नं दिल्या आहेत. बारामतीमध्ये गेल्या महिन्यात २८ तारखेला झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

****

बीड जिल्हा न्यायालयातील वकीलाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील ११ तालुक्याचं न्यायालयीन कामकाज बंद ठेवणार असल्याचं वकील संघटनांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे. काल ॲड. राम डोंगरे हे आपले कामकाज करत बसले असताना दुपारी काही महिला आणि पुरुष त्यांच्याकडे आले. त्याच्यांत शाब्दिक वाद झाला आणि शिवीगाळ करत वकील डोंगरे यांना त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीच्या निषेधार्थ हा निर्णय घेतला असल्याचं वकील संघटनेनी सांगितलं.

****

अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेली खतांची वितरण प्रणाली राज्यभर राबविण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालकांनी  राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. मुंबई येथील मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी याबाबत बैठकीत माहिती दिली.

****

नांदेड इथं माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. लातूरचे डॉ. राम बोरगावकर यांना या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. आज या कार्यक्रमात अनुपमा जोशी यांचे सरोद वादन, रुचिरा केदार आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे.

****

टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान सुपर आठ फेरीतील सामना खेळवण्यात येणार आहे. काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तान संघाचा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. कर्णधार हॅरी ब्रुकच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं १६४ धावांचं आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण केलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान महिला क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला. २१५ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियन संघानं ३९ व्या षटकांत पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुढचा सामना २७ तारखेला होबार्ट इथं खेळवला जाणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...