Tuesday, 24 February 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातील एकूण ४७९ धर्मादाय रुग्णालयांपैकी केवळ १३४ रुग्णालये सध्या आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबवत आहेत. उर्वरित रुग्णालयांनी या प्रक्रियेला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नसतानाही काही रुग्णालये सहकार्य करत नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने आता कायद्यात बदल केला असून ही सर्व रुग्णालये सरकारच्या पूर्णपणे अखत्यारीत आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधासभेत दिली. यापुढे सर्व पात्र रुग्णालयांना या योजना राबवणे बंधनकारक असेल. जे रुग्णालय टाळाटाळ करतील, त्यांच्यावर कायद्यानुसार सुनावणी घेऊन कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिले.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

कायद्यात डिजिटल अटक नावाची कुठलीही तरतूद नाही, त्यामुळे असा फोन आल्यास हा खोटेपणा आहे असं समजावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. अशा प्रकरणात गुन्हेगार विदेशात बसून ही कारवाई करत असतात, त्यामुळे त्यांना पकडणं अनेकदा अवघड होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रकरणात कुणी पैसे दिले असतील तर १९३० या क्रमांकावर फोन करावा, असं केलं तर पैसे हस्तांतरण थांबवता येऊ शकतं, त्यामुळे लगेच तक्रार करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकार घरोघरी जाऊन नागरिकांना तसंच शाळा महाविद्यलयांत जाऊन विद्यार्थ्यांना डिजिटल अटकेविषयी माहिती देऊन जागरूक करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आणि आशुतोष काळे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

****

अंमली पदार्थांच्या वापराबाबत सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत, कुरिअर द्वारे अमली पदार्थ पाठवले जात असल्याचं आढळलं आहे. अशा कुरिअरवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे पोलीस अंमली पदार्थ विक्रीत दोषी असतील त्यांना बडतर्फ केलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. नसिम खान, वरूण सरदेसाई या सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

****

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजासाठी योगेश सागर, संजय केळकर, दिलीप लांडे, चंद्रकांत नवघरे, सुनिल प्रभू, राजू खरे, अमित झनक आणि समाधान आवताडे यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

****

२०२५-२६ च्या हंगामातल्या कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस काढणीला अनेक ठिकाणी उशीर होत असून, राज्यातला कोणताही कापूस उत्पादक शेतकरी किमान आधारभूत किंमतीपासून वंचित राहू नये, यासाठी ही मुदत वाढवावी, असं मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

जल सिंचनामध्ये राज्याला समृध्द करण्याच्या दृष्टीनं महायुती सरकारनं मागच्या एक वर्षाच्या कार्यकाळात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा आणि त्यानुसार सुरू झालेल्या अंमलबजावणीचा कार्य अहवाल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण‍ विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या विभागाचा कार्यअहवाल प्रकाशित करणारे राज्यातले पहिले मंत्री ठरले आहेत. दुष्काळमुक्त महाराष्ट्राची संकल्पना कृतीत उतरवण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्याचं काम मिशन मोडवर सुरू करण्यात आलं असून, याबाबतचा सर्वसमावेशक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

****

निर्दोष मतदार याद्या हा कोणत्याही लोकशाहीचा पाया असतो, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या, भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक पात्र उमेदवार मतदारयादीत असावा आणि प्रत्येक अपात्र उमेदवार मतदारयादीतून वगळला जावा, यासाठी मतदारयाद्यांचं विशेष पुनरीक्षण आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...