Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 February
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· राज्य विधिमंडळाचं
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, सहा मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प
· छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या दोन आरोग्यकेंद्रांचा आरोग्यरत्न पुरस्काराने गौरव
· २८फेब्रुवारी
रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांची प्रशासकपदी होणार नियुक्ती
· कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली देशाच्या अद्भुत क्षमतेची जगाला प्रचिती– पंतप्रधान नरेंद्र
मोदी याचं मन की बातमध्ये प्रतिपादन
आणि
· टी – ट्वेंटी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर आठ फेरीत इंग्लंडचा श्रीलंकेवर आणि दक्षिण आफ्रिकेचा
भारतावर विजय
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय
अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या सहा मार्चला
राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, या अधिवेशनात १५ विधेयकं मांडली
जाणार असून, त्यापैकी दोन प्रलंबित असल्याचं सांगितलं. विरोधक किंवा सत्ताधारी सर्वांना चर्चेसाठी
पुरेसा वेळ दिला जाईल, असं ते म्हणाले. एक महिना हे अधिवेशन चालणार असून, महाराष्ट्र
विधानमंडळ हे देशातलं एकमेव विधिमंडळ आहे, जिथे अधिवेशनाचं कामकाज सर्वाधिक
काळ चालतं, असंही त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून राज्याला मिळणाऱ्या
निधीत २० हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे, याशिवाय कर परताव्याच्या माध्यमातून
९८ हजार ३०६ कोटी मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले,
बाईट –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. दावोसमध्ये ३० लाख कोटी रुपयांचे
औद्योगिक करार झाले असून, त्यातून ४० ते ५० लाख रोजगारनिर्मिती होणार आहेत, राज्यात
पायाभूत सुविधांवर सुमारे एक लाख कोटी रुपयांची कामं सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी
दिली. तर अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न
शासन करत असल्याचं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.
**
दरम्यान, अधिवेशनाच्या
पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं काल आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार
टाकला. प्रचंड बहुमतामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यपणाचं नाही, जिथं लोकशाहीचा
मान राखला जात नाही तिथं आपण चहापानाला जाणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितलं. काल मुंबईत विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या
वार्ताहर परिषदेत बोलताना ते म्हणाले,
बाईट –
भास्कर जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते
राज्यातली बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा
प्रश्न, रखडलेले विकास प्रकल्प, शेतमालाला मिळणार अल्प मोबदला या आणि इतर मुद्द्यांवर
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी टीका केली. माजी मंत्री आदित्य ठाकरे, सतेज पाटील
यावेळी उपस्थित होते.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता
– एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारं महाराष्ट्र
हे पहिलं राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त
केला. मुंबईत आयोजित जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाच्या
उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं डिजिटल
प्लॅटफॉर्म ३० लाखांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं असून, त्याचा
विस्तार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र
सिंह यावेळी उपस्थित होते.
****
मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण
केंद्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान २०२६ वितरण
सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ
आणि मेनोपॉज क्लिनिक उपक्रमाचं राज्यस्तरीय लोकार्पण करण्यात आलं. आरोग्यमंत्री प्रकाश
आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड ग्रामीण रुग्णालय, दौलताबाद इथलं प्राथमिक आरोग्य
केंद्र आणि तिसगाव इथल्या उपकेंद्रातल्या आशा स्वयंसेविका मीरा तिरछे यांना आरोग्यरत्न
पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान यावेळी प्रदान करण्यात आला.
****
राज्यातल्या २८ फेब्रुवारी
रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त
केलं जाणार आहे. त्यांच्या मदतीसाठी उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती कार्यरत
राहाणार असून, ही नियुक्ती पुढच्या सहा महिन्यांसाठी किंवा निवडणुका पूर्ण होईपर्यंत लागू राहणार
आहे. या संदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले.
****
नवी दिल्ली इथं नुकतीच पार
पडलेली भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषद ही आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जगभरात
कसा केला जाईल, या दिशेनं एक महत्त्वाचं वळण ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून काल त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.
हा या कार्यक्रमाचा १३१ वा भाग होता. या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील अद्भुत क्षमता पाहायला मिळाली असं ते म्हणाले.
देशात अवयवदानाविषयीची जागरूकता
सातत्यानं वाढत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. अवयवदानामुळे गरजूंना नवं आयुष्य
मिळाल्याची देशभरातली अनेक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली.
ऑनलाईन फसवणुकीबद्दलही पंतप्रधानांनी
संवाद साधला. डिजिटल अरेस्ट विषयी देशात जागरूकता वाढली असली, तरी आजही
अशी प्रकरणं घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत सगळ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन
त्यांनी केलं.
बाईट -
पंतप्रधान नरेंद्र मोदी
शेतकऱ्यांच्या नवकल्पनांचं
कौतुक, आगामी रमजान आणि होळीच्या सणात व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपण्याचं आवाहन, महाकुंभ
आणि केरळ कुंभाचा सांस्कृतिक संदेश, टी-२० विश्वचषकातील भारतीय वंशाचे खेळाडू, राजाजी
उत्सव आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी मन की बात मधून भाष्य केलं.
****
राज्य परीक्षा परिषदेतर्फे
इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा काल घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून
पाचवीसाठी १८८ केंद्रांमध्ये ३१ हजार ५९३ विद्यार्थी तर इयत्ता आठवीसाठी १४३ केंद्रांत
२१ हजार ५१२ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.
****
टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत काल सुपर आठ मधल्या पहिल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी
पराभव झाला. अहमदाबाद इथं झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी
करत निर्धारित षटकात सात बाद १८७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला भारतीय संघ १९व्या
षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला.
काल सुपर आठ मधल्या अन्य एका
सामन्यात इंग्लडनं श्रीलंकेवर ५१ धावांनी विजय मिळवला.
****
राज्य शासनाने हिंगोली जिल्ह्यात
स्थापन केलेलं हळद संशोधन केंद्र, शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. या केंद्राच्या
माध्यमातून संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन मिळत असल्याने बुलढाणा जिल्ह्यात हळद लागवडीचा
प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहे. शिरजगाव देशमुख इथले दीपक देशमुख यांच्या
शेतामध्ये यशस्वीपणे हळदीची लागवड झाल्याने आता त्यांना आर्थिक उत्पन्नही चांगलं मिळणार
आहे. खामगावचे तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी या उपक्रमाबाबत माहिती देत, शेतकर्यांना
राज्य शासनाचं महाविस्तार ॲप वापरण्याचं आवाहन केलं.
बाईट- सुनील
पवार तालुका कृषी अधिकारी
****
अभिनेते भाऊ कदम यांनी काल
जालना जिल्ह्यात सावरगावसह भोकरदन तालुक्यातल्या दगडवाडी आणि परतूर तालुक्यातल्या लोणी
इथल्या विकासकामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. स्वच्छता, वृक्षारोपण, शिक्षण, आरोग्य
आणि महिला सक्षमीकरण या घटकांवर भर दिल्यास गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असं त्यांनी
यावेळी नमूद केलं
****
लातूर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या
पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल
आऊट’ अंतर्गत विशेष मोहीम राबवली. यात विविध ठिकाणी अचानक वाहन तपासणी, संशयितांची
चौकशी आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत वाहतूक
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात २२ प्रकरणं नोंदवून सुमारे ३५ हजार रुपयांचा दंड
आकारण्यात आला.
****
No comments:
Post a Comment