Thursday, 19 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

आर्टिफिशिल इंटेलिजन्स-एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेला खुलं अवकाश देतांना, त्याचं नियंत्रण आपल्या हाती असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज दिल्लीत भारत मंडपम इथं भारत एआय शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. एआयच्या संदर्भात मानव ही नवी संकल्पना पंतप्रधानांनी सादर केली. ही संकल्पनाच २१ व्या शतकात मानवतेच्या कल्याणाचं मुख्य माध्यम ठरेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत पंतप्रधान म्हणाले..

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे.

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. राधाकृष्णन यांनी, शिवाजी महाराज हे स्वराज निर्माता, धर्म रक्षक, निडर योद्धा असल्याचं आपल्या समाजमाध्यमांवरिल संदेशात म्हटलं आहे. तर पंतप्रधानांनी महाराजांना दूरदर्शी नेता, असाधारण प्रशासक, रणनीतिकार आणि स्वराज योद्धा म्हणत नमन केलं आहे.

दरम्यान, शिवनेरी दुर्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्माचा सोहळा साजरा झाला. शिवरायांची पालखी पूजन तसंच पाळणा उत्सवात मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झाले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात येत्या चार वर्षांनी महाराजांचा चारशेवा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले…

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलतांना, शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी विकास आराखड्यासह इतरही स्मारकांसंदर्भात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं, त्यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना शिवाजी महाराज हे काळाच्या पुढे विचार करणारे राजे असल्याचं सांगितलं.

****

शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर सह सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दुचाकी, चारचाकी वाहन फेरी काढण्यात येत आहेत. विविध ठिकाणी रक्तदान शिबीरं तसंच आरोग्य तपासणी शिबीरासह, विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाला जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या नऊ चारचाकी वाहनांचं पालकमंत्री संजय सिरसाट यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलं.

ही शिवजयंती शिस्तबद्ध आणि कायदेशीर बाबीचं पालन करून डीजे मुक्त वातावरणात साजरी करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांनी केलं आहे.

**

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्र - कुलगरू डॉ. अशोक महाजन, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांच्यासह विद्यापिठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

**

बीड इथं आज सकाळी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, आमदार संदीप क्षीरसागर, तहसीलदार शेळके यांच्यासह इतर अधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

**

धाराशिव शहरातील कलाकार कलायोगी राजकुमार कुंभार यांच्या कलाविष्कारातूनछत्रपती शिवाजी महाराज यांची 2D आणि 3D प्रकारातील अद्भुत कलाकृती साकारण्यात आली आहे. कुंभार यांच्या १६ कलाकृतींची विक्रमी नोंद असून, या कलाकृतीची नोंद प्रक्रिया सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान राज्यात सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांत पुढील दोन महिन्यांत सहा दिवस राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी महसूल विभागातल्या महत्त्वाच्या १५ प्रकारच्या सेवा एका दिवसात मार्गी लावल्या जाणार आहेत.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. राज्यभरातील सोळा लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. १८ मार्च पर्यंत दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...