Tuesday, 10 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीच्या भावनेनं काम करणारी युती हवी आहे, असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

या यशातून सरकारनं केलेल्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केल्याचं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

****

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये सायबर फसवणूक प्रतिबंध या विषयावर भाषण देणार आहेत. यावेळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या नवीन सायबर गुन्हे शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच ते गृहमंत्रालयाअंतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या राज्य डॅशबोर्डचं उद्घाटन करतील. या दोन दिवसांच्या परिषदेत केंद्रीय आणि राज्य कायदा अंमलबजावणी संस्था, दूरसंचार विभाग, आर्थिक सेवा विभाग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १८ मार्चपर्यंत राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांत परीक्षा होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या महापौर तसंच उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. महायुतीकडून महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज भरला आहे, तर एमआयएमने महापौर पदासाठी अशोक हिवराळे यांना रिंगणात उतरवलं आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँक ही जमिनी स्तरापासून दूर आहे, मात्र या बँकेने घेतलेले निर्णय सर्वांवर परिणाम करतात. त्यामुळे सर्वात खालच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांची आवश्यकता असल्याचं मत भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर शिरीषचंद्र मुर्मू यांनी व्यक्त केलं. आरबीआयच्या प्रमुख कार्यांवर प्रकाश टाकण्यासाठी काल नागपूरच्या भारतीय रिझर्व्ह बँकेत माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. ग्राहकांच्या तक्रारींचं त्वरित निवारण व्हावं यासाठी ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मुर्मू यांनी सांगितलं.

****

जागतिक अपस्मार दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा रुग्णालयात काल विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. अपस्मार एपिलेप्सी हा कोणताही दैवी कोप किंवा करणी - बाधा नसून तो मेंदूशी संबंधित एक वैद्यकीय विकार आहे. योग्य औषधोपचार आणि सकारात्मक जीवनशैलीच्या जोडीने ८० टक्के रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

बीड इथल्या सद्भावना प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राध्येशाम मुंदडा स्मृती सद्भावना पुरस्कार काल हरिभक्तपरायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांना हरिभक्तपरायण लक्ष्मणमहाराज मेंगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

स्थानिक इतिहास प्रचाराच्या दृष्टीने महाराष्ट्रात केवळ बीड जिल्ह्यात झालेल्या बीड जिल्हा इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा या उपक्रमात जवळपास दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. बीड जिल्हा इतिहास परिषदेच्या वतीनं आयोजित बीडचे प्रथम इतिहासकार डॉ. सतीश साळुंके यांच्या 'गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची' या पुस्तकावर ही परिक्षा आधारित होती.

****

नाशिक जिल्ह्यातल्या काही किन्नरांवर होत असलेले कथित अन्याय आणि बळजबरीने धर्मांतरणाच्या प्रकारांच्या विरोधात काल नाशिक शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किन्नर स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आमदार देवयानी फरांदे, सागर बेग यांच्यासह मोठ्या संख्येने किन्नर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

बी. एल. एफ. पाईम ओटीटी प्रायोजित आयकॉन भारत आणि भारत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार वितरण काल मुंबईत झालं. यावेळी बीड इथले कवी अनिलकुमार होळकर लिखित आणि दिग्दर्शित 'भुरळ डोळ्यांची ' या चित्रपटास सामाजिक संदेश देणारी सर्वोकृष्ट नाट्यकथा हा पुरस्कार देण्यात आला.

****

नांदेड तालुक्यात जुना कौठा इथल्या धर्मभूषण वटेमोड महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज डॉ. सायन्ना मठमवार लिखित अक्षरधारा या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने बालयोगी गोवत्स व्यंकट स्वामी महाराज, जनार्दन ठाकूर, कामाजी पवार निलंगेकर आणि विधिज्ञ अविनाश भोसीकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

****

पुरुषांच्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दिल्लीत नेदरलँड आणि नामीबिया या संघांमध्ये लढत होत आहे. दूसरा सामना चेन्नईमध्ये न्यूझीलंड आणि संयुक्त अरब अमीराती यांच्यात दुपारी तीन वाजता खेळला जाईल, तर तिसरा सामना संध्याकाळी सात वाजता पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या दरम्यान कोलंबो इथं होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...