Monday, 9 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांमध्ये आज मतमोजणी

·      औद्योगिक विकासाचे सामंजस्य करार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी उद्योग विभाग कार्यरत-मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

·      रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक साक्षरता सप्ताहाला आजपासून प्रारंभ

·      छत्रपती संभाजीनगर इथं आयुष तसंच सीजीएचएस वेलनेस सेंटरचं उद्घाटन

आणि

·      यंदाचा अर्थसंकल्प विकसित देशांच्या स्पर्धेत भारताला बळकटी देणारा असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं प्रतिपादन

****

राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांसाठीच्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी राज्य निवडणूक आयोगानं सुरक्षेसह सर्व व्यवस्था केली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६८ पूर्णांक २८ शतांश टक्के मतदान झालं. सर्वाधिक सुमारे ७५ टक्के मतदान परभणी इथं तर रत्नागिरीत सर्वात कमी सुमारे ५६ टक्के मतदान झालं.

दरम्यान, या मतमोजणीच्या पूर्वतयारीचा काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर इथं प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर जाऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या पूर्वतयारीची पाहणी करून, संबंधित अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

लातूर जिल्ह्यात मतमोजणीसाठी एकूण १४२ टेबल उभारण्यात आले असून, एक हजार २९१ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

येत्या १३ मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये ठाकरे यांच्यासह डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते, आणि रमेश कराड यांचा समावेश आहे.

विधान परिषदेच्या या निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सात जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे.

****

औद्योगिक विकासासाठीचे सामंजस्य करार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याकरता उद्योग विभाग कार्यरत असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल अहिल्यानगरमध्ये एका ॲल्युमिनियम कास्टिंग कंपनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कंपनीचे कार्यकारी संचालक भरत गीते यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्याच्या सर्व भागातल्या उद्योग क्षेत्राची प्रगती होण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या गुंतवणूक करारांमधून उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या ७५ हजार संधी उपलब्ध झाल्या असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या करारांच्या माध्यमातून होणार असलेल्या ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकी पैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात ११ हजार ५१९ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक साक्षरता सप्ताहाला आजपासून प्रारंभ होत आहे. १३ तारखेपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहाची या वर्षाची संकल्पना ‘के वाय सी – सुरक्षित बँकिंगकडे जाण्याचे पहिले पाऊल’ अशी आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल मुंबई इथं या सप्ताहाचं उद्घाटन केलं. दरम्यान आरबीआय कडून केवायसी पालनाचं महत्त्व आणि सुलभता, केंद्रीय केवायसी चे फायदे तसंच, केवायसी संदर्भातील फसवे दूरध्वनी, संदेश आणि लिंकपासून सावध राहण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

****

‘‘आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून ती एक संपूर्ण जीवनशैली असल्याचं, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत आयुष तसंच सीजीएचएस वेलनेस सेंटरचं उद्घाटन जाधव यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.

या सुविधेमुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आर्थिक भार कमी झाला असून, खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व घटलं आहे, असंही जाधव यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव

****

'मंकी फिव्हर' या आजारावर भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने पूर्णतः स्वदेशी लस विकसित केली आहे. या लसीच्या मानवी वैद्यकीय चाचणीच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला. ही लस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्षमपणे जागृत करण्यास मदत करते. या लसीच्या दोन मात्रा, २८ दिवसांच्या अंतराने दिल्या जातील. चाचणीचा हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर मोठ्या स्तरावर चाचण्या घेऊन ही लस सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समाविष्ट केली जाईल. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये काम करणारे वन कर्मचारी, शेतकरी आणि लाकूडतोडे यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यांच्यासाठी ही लस दिलासा ठरणार आहे.

****

परीक्षा पे चर्चा २०२६ च्या दुसऱ्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरून प्रसारित होईल. या भागात तामिळनाडू, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील परीक्षा योद्ध्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत.

****

यंदाचा अर्थसंकल्प विकसित देशांच्या स्पर्धेत भारताला बळकटी देणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया- SAI च्या ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’चं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. खेळाडूंच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला बळकटी देण्यासाठी ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचं खडसे यांनी नमूद केलं. ई स्पोर्टस् हे तरुणांसाठी रोजगार निर्मितीचं साधन होऊ शकतं, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या

बाईट - केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे

 

आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सीएसआर उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या क्रीडा विज्ञान उपकरणांचंचे लोकार्पणही यावेळी खडसे यांच्या हस्ते करण्यात आलं. विविध क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेल्या खेळाडूंचा राज्यमंत्री खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीच्या ताफ्यात पुढच्या महिन्यात राजमाता जिजाऊ श्रेणीच्या नवीन बस दाखल होणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. तीन बाय दोन आसन रचनेच्या या ५५ आसनी बस, भगव्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन काल सर्वत्र साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथल्या गजानन मंदिरात, महापालिकेचे महापौर पदाचे उमेदवार समीर राजूरकर तसंच उप महापौर पदाचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा लावत दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. विविध धार्मिक कार्यक्रम तसंच कीर्तन महोत्सव यावेळी घेण्यात आला.

****

बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या चंपावती महोत्सवातून, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांचे कलाकारप्रेम जिवंत ठेवण्याचं काम, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप करत असल्याचं प्रतिपादन, शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांनी केलं आहे. या महोत्सवाच्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकरंडक समूह गीत गायन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. कलेचे संस्कार रुजवण्याचं काम या महोत्सवातून होत असल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं.

****

आयसीसी क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत चेन्नई इथं काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. मुंबई इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात, इंग्लडनं नेपाळचा अवघ्या चार धावांनी तर कोलंबो इथं झालेल्या सामन्यात यजमान श्रीलंकेनं आयर्लंडचा २० धावांनी पराभव केला.

मालिकेत आज स्कॉटलंड - इटली, झिम्बाब्वे - ओमान आणि दक्षिण आफ्रिका -  कॅनडा यांच्यात सामने होणार आहे. भारताचा पुढचा सामना १२ तारखेला नामिबियासोबत होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...